भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


*परिशिष्ट 20

कल्याणप्रिय माणसाने प्रज्ञेला महत्त्व देऊन तीं विघ्नें सहन करावीं, एकान्तवासांत असंतोष वाटला, तर तोही सहन करावा, आणि चार शोकप्रद गोष्टी सहन कराव्या. १५

(त्या ह्या -) मी आज काय खाईन वा कोठे जेवीन, गेल्या रात्रीं झोप न आल्यामुळे त्रास झाला, आज कोठे झोपावें? अनागरिक शैक्ष्याने (सेख) हे (चार)वितर्क त्यागावे. १६

वेळोवेळीं अन्न आणि वस्त्र मिळालें असतां त्यांत प्रमाण ठेवावें, अल्पसंतोषी व्हावे. त्या पदार्थापासून मनाचें रक्षण करणार्‍या व गावांत संयमाने वागणार्‍या भिक्षूने, इतरांनी राग येण्याजोगें कृत्य केलें असतांही, कठोर वचन बोलू नयें.१७

त्याने आपली दृष्टि पायांपाशी ठेवावी, चचळपणे चालूं नये, ध्यानरत व जागृत्य असावें, उपेक्षेचा अवलंब करून चित्त एकाग्र करावें, तर्क आणि चांचल्य यांचा नाश करावा. १८

त्या स्मृतिमन्ताने आपले दोष दाखविणार्‍यांचें अभिनन्दन करावें, सब्रह्मचार्‍याविषयीं कठोरता बाळगूं नये, प्रंसगोपात्त चांगलेच शब्द बोलावे, लोकांच्या वादविवादांत शिरण्याची इच्छा धरूं नये. १९

तदनंतर स्मृतिमन्ताने जगांतील पांच रजांचा त्याग करण्यास शिकावे. (म्हणजे) रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श (या पांच रजांचा) यांचा लोभ धरूं नयें. २०

या पदार्थांचा छन्द सोडून तो स्मृतिमान्, सुविमुक्तचित्त, वेळोवळीं सध्दर्मांचें चिंतन करणारा, एकाग्रचित्त भिक्षु अंधकाराचा नाश करण्याला समर्थ होईल (असें भगवान म्हणाला).२१

राहुलोवादसुत्त


याला चूळराहुलोवाद आणि अम्बलट्ठिकंराहुलोवाद असेंही म्हणतात. हें मज्झिमनिकायांत आहे. त्यांचा गोषवारा असा-

एके समयीं बुध्द भगवान राजगृहापाशीं वेणुवनांत राहत होता, व राहुल अम्बलट्टिका'* नांवाच्या ठिकाणीं राहत होता. एके दिवशी संध्याकाळीं भगवान ध्यानसमाधि आटपून राहुल होता तेथे गेला. राहुलाने भगवन्ताला दुरून पाहून आसन मांडलें व पाय धुण्यासाठी पाणी आणून ठेवलें. भगवान आला व त्या आसनावर बसून त्याने पाय धुतले. राहुल भगवन्ताला नमस्कार करून एका बाजूला बसला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हा एक प्रासाद होता असें अट्टकथेंत म्हटले आहे. पण ते संभवनीय दिसत नाही. राजगृहापाशी हा एक गांव होता असे वाटतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------