भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 9

यानंतरचा कोसम्बींचा आयुष्यक्रम सार्वजनिक स्वरूपाचा झाला असल्यामुळे त्यांत इतकी अद्‍भुतरम्यता व लोकविलक्षणता अनुभवास येत नाही.  तथापि त्यांचें यापुढील सर्व आयुष्य स्वदेशसेवेच्या हेतूने प्रेरित झालेलें असल्यामुळें तें पूर्वीच्या आयुष्याइतकेंच उद्बोधक व उदात्त भासतें.  स्वतः एवढ्या कष्टांनी मिळविलेल्या बौद्ध धर्माच्या (व पालिवाङ्‌मयाच्या) ज्ञानाचा स्वदेशबांधवांमध्ये प्रचार करावयाचा या ध्येयाने यापुढील त्यांच्या क्रिया प्रेरित झालेल्या दिसतात.  वंगभंगाच्या चळवळींतून निघालेल्या कलकत्त्याच्या नॅशनल कॉलेजांत व कलकत्ता युनिवर्सिटींत पालि भाषेच्या अध्यापकाची जागा त्यांनी पत्करली.  परंतु कोसम्बींची विशेष इच्छा आपल्या महाराष्ट्र बांधवांमध्ये बौद्ध धर्माच्या ज्ञानाचा प्रसार करावा अशी होती.  त्यांनी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची गाठ घेतली.  त्या उदारधी नृपतीने थोड्याच अवकाशांत तारेने पुढील संदेश पाठविला, ''तुम्ही महाराष्ट्रांतील कोणत्याहि शहरीं रहात असाल तर तुम्हांला बडोदें सरकारांतून दरमहा ५० रु. मिळतील व ही मदत तीन वर्षेपर्यंत चालू राहील.  मात्र वर्षांतून एखादें पुस्तक बडोदें सरकारासाठी तुम्ही लिहून तयार केलें पाहिजे.''  बरीच भवति न भवति करून अखेर कोसम्बींनी गायकवाड सरकारचा हा आश्रय पत्करला.  यासंबंधाने खुद्द कोसम्बी म्हणतात ः- ''द.म. २५० रु. ची (कलकत्ता युनिवर्सिटीची) नोकरी सोडून श्रीमंत गायकवाड महाराजांनीं दिलेल्या ५० रु. वेतनाचा स्वीकार केल्याबद्दल मला कधीहि पश्चात्ताप झाला नाहीं.  हें वेतन स्वीकारलें नसतें तर डॉ. वुड्स यांची गांठ पडली नसती आणि अमेरिकेला जाण्याची संधि सांपडली नसती.  पुण्याला येऊन राहिल्यामुळें डॉ. भांडारकर यांचा निकट संबंध जडला व त्यांच्या प्रयत्‍नानें मुंबई युनिवर्सिटींत पालि भाषेचा प्रवेश करण्यांत आला.''

डॉ. जेम्स एच. वुड्स हे अमेरिकेंतील सुविख्यात हार्वर्ड युनिवर्सिटीचे प्रोफेसर होते.  त्यांना पालि शिकविण्याच्या निमित्ताने कोसम्बींचा त्यांच्याशी परिचय झाला.  परिचयाचें रूपांतर स्नेहांत होऊन 'विशुद्धिमार्ग' नामक बौद्ध तत्त्वज्ञान ग्रंथाच्या संशोधनाच्या कामीं मदत करण्याकरितां डॉ. वुड्सनी कोसंबींना अमेरिकेंत पाचारण केले.  सयाजीराव महाराजांची परवानगी घेऊन कोसम्बी यांनी १९१० च्या एप्रिल महिन्यांत अमेरिकेस प्रयाण केलें.  हार्वर्डमधील संस्कृत प्रभृति पौरस्त्य भाषांचे प्रमुख आचार्य प्रा.ल्यानमन यांच्या सहकार्याने कोसम्बी यांचें काम सुरू झालें.  कोसम्बींनी कसून काम करून 'विशुद्धिमार्गा'चे संशोधन १९११ च्या अखेरपर्यंत संपविलें.  परंतु ल्यानमनशीं त्यांचें पटेना.  कोसम्बीचे प्रयत्‍न गौण लेखून झालेलें सर्व संशोधन आपल्याच नांवें प्रसिद्ध व्हावें असा ल्यानमन यांचा मानस दिसला व तो आपला बेत साधत नाही असें दिसतांच ते चिडले व संतापले.  तेव्हा कोसम्बींनी अमेरिकेहून परत फिरण्याचा निश्चय केला व ते जानेवारी १९१२ मध्ये न्यूयार्कहून स्वदेशी यावयास निघाले.

हिंदुस्थानांत आल्यानंतर प्रा. कोसम्बींनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चालकांच्या निमंत्रणावरून फर्गसन कॉलेजांत पांच वर्षांच्या कराराने पालि भाषेच्या प्राध्यापकाची नोकरी पत्करली.  त्यांच्या अध्यापकत्वाच्या कारकीर्दीत बौद्धधर्माचे व पालिभाषेचे पुष्कळ विद्वान त्यांच्या हातून तयार झाले.  कै. चिंतामण वैजनाथ राजवाडे, डॉ. पु. वि. बापट (फर्गुसन कॉलेजांतील सध्याचे पालिभाषेचे प्राध्यापक), प्रा. चिंतामणराव जोशी (बडोदा कॉलेजांतील पालीचे प्राध्यापक), प्रा. ना. के. भागवत (सेंट झेविअर कॉलेज, मुंबई, येथील पालीचे प्राध्यापक) ही सर्व कोसम्बींच्याच शिष्यमालिकेंतील चमकदार रत्नें होत.