भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


समकालीन धर्मिक परिस्थिति 7

आहारव्रत

(इ)  ''आहाराने आत्मशुद्धि होते, अशी कित्येक श्रमणांची आणि ब्राह्मणांची दृष्टि आहे.  ते केवळ बोरें खाऊन राहतात, बोरोंचें चूर्ण खातात, बोरांचा काढा पितात, किंवा दुसरा कोणेताही पदार्थ बोरांचाच करून खातात.  मी एकच बोर खाऊन राहत असल्याची मला आठवण आहे.  हे सारिपुत्ता, तूं असें समजूं नकोस की, त्या काळीं बोरें फार मोठीं होतीं.  आजला जशीं बारें आहेत, तशीं तीं त्या काळींही असत.  याप्रमाणें एकच बोर खाऊन राहिल्यामुळे माझें शरीर अत्यंत कृश होत असे.  आसीतक वल्लीच्या किंवा कालवल्लीच्या गाठींप्रमाणे माझे सांधे स्पष्ट दिसत असत.  माझा कटिबंध उंटाच्या पावलासारखा दिसे.  सुताच्या चात्यांच्या माळेप्रमाणे माझा पाठीचा कणा दिसे.  मोडक्या घराचे वासे जसे खालीवर होतात, तशा माझ्या बरगड्या झाल्या.  खोल विहिरींत पडलेल्या नक्षत्रांच्या छायेप्रमाणे माझीं बुबुळें खोल गेलीं.  कच्चा कडू भोपळा कापून उन्हांत टाकला असतां जसा कोमेजून जातो, तशी माझ्या डोक्याची चामडी कोमेजून गेली.  मी पोटावरून हात फिरवण्यास जाई, तों पाठीचा कणाच माझ्या हातीं लागे.  त्यावर हात फिरवीं, तेव्हां पोटाची चामडी हाताला लागे.  येणेंप्रमाणें माझा पाठीचा कणा आणि पोटाची चामडी हीं एक झालीं होतीं.  शौचाला किंवा लघवीला बसण्याचा प्रयत्‍न केला, तर मी तेथेच पडत असें.  अंगावरून हात फिरवला तर माझे दुर्बळ झालेले लोम खाली पडत.  त्या उपोषणाच्या योगाने माझी स्थिति तशी झाली.

''कित्येक श्रमण आणि ब्राह्मण मूग खाऊन राहतात, तीळ खाऊन राहतात किंवा तांदूळ खाऊन राहतात.  या पदार्थांनी आत्मशुद्धि होते अशी त्यांची समजूत आहे.  हे सारिपुत्ता, मी एकच तीळ, एकच तांदूळ किंवा एकच मूग खाऊन राहत होतों.  त्या वेळीं हे दाणे फार मोठे होते असें समजूं नकोस.  आजकालच्या सारखेच हे दाणे होते.  या उपोषणाने माझी स्थिति तशीच (वर वर्णिल्याप्रमाणे) होत असे.''

बुद्धघोषाचार्यांचे म्हणणें की, भगवंताने ही तपश्चर्या एका पूर्वजन्मीं केली.  त्या काळीं बारें वगैरे पदार्थ आताच्या सारखेच होत असत, या मजकुरावरून बुद्धघोषाचार्याचें म्हणणें सयुक्तिक आहे असें दिसून येतें.  बुद्धसमकालीं चालू असलेल्या भिन्न भिन्न तपश्चर्यांचें निरर्थकत्व दाखवून देण्यासाठी सुत्ताच्या कर्त्याने वरील मजकूर भगवंताच्या तोंडी घातला आहे हें सांगणें नलगे.

टिपेंत दिलेल्या फरकाशिवाय (नि) सदराखाली आलेली तपश्चर्या निर्ग्रंथ (जैन साधु) करीत असत.  आजलाही केस उपटण्याची, उपासतापास करण्याची वगैरे प्रथा त्यांच्यांत चालू आहे.

(इ)  सदराखाली आलेली तपश्चर्या इतर पंथांचे श्रमण आणि ब्राह्मण करीत असत.  त्यांतील बहुतेक प्रकार बुवा, बैरागी वगैरे लोकांत अद्यापि चालू आहेत.

मलमुत्र खाण्याची चाल

स्वतःचे मलमूत्र खाण्याची चाल अद्यापिही अघोरीसारख्या पंथांत चालू असल्याचें दिसून येतें.  काशींत तेलंगस्वामी म्हणून एक प्रसिद्ध संन्यासी होऊन गेले.  ते नागवे राहत.  त्यांच्यासारखे नागवे फिरणारे दुसरेही पुष्कळ परमहंस कशीला होते.  त्या वेळीं गोड्विन् नांवाचा (याला काशीचे लोक गोविंद साहेब म्हणत) मोठा लोकप्रिय कलेक्टर होता.  हिंदु लोकांच्या चालीरीतींची त्याने सहानुभूतिपूर्वक माहिती करून घेतली; आणि या नंग्या बुवांनी लंगोटी लावून फिरावें म्हणून खालील युक्ति योजिली.

रस्त्यांत फिरणारा नंगा बुवा भेटल्याबरोबर पोलीस त्याला साहेबाकडे घेऊन जात.  आणि साहेब त्याला विचारी, ''तूं परमहंस आहेस का ?''  त्याने होय म्हणून सांगितल्याबरोबर त्याला तो आपलें अन्न खाण्यास सांगत असे.  अर्थातच तें नंग्या बुवाला पसंत पडत नसे.  तेव्हा गोविंद साहेब म्हणे, ''परमहंस कसलाच भेद ठेवीत नसतो, असें शास्त्रांत सांगितलें आहे; आणि तुमच्या मनांत तर भेदभाव आहे; तेव्हा तुम्ही नग्न हिंडतां कामा नये.''  येणेंप्रमाणे पुष्कळशा नंग्या बुवांना त्याने लंगोटी लावण्यास भाग पाडलें.