श्रमणांचें प्रचारकार्य
या आणि इतर श्रमणांचें वजन लोकांवर फार होतें, हें वर सांगितलेंच आहे. हे श्रमण पूर्वेला चंवा (भागलपूर), पश्चिमेला कुरूंचा देश, उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला विंध्य, यांच्या मधल्या प्रदेशांत पावसाळ्याचे चार महिने खेरीज करून बाकी आठ महिने सारखे फिरत आणि आपापल्या मतांचा लोकांना उपदेश करीत. त्यामुळे लोकांत यज्ञयागाविषयीं अनादर आणि तपश्चर्येबद्दल आदर उत्पन्न झाला.
यज्ञयागांची व्याप्ति
परंतु राजे लोकांना युद्धांत जय मिळावा म्हणून यज्ञयाग करणें आवश्यक वाटत होतें. यज्ञयाग चालू ठेवण्यासाठी कोसलांच्या पसेनदि राजाने उक्कट्ठा नांवाचा गाव पोक्खरसाति (पौष्करसादि) आणि सालवतिका गाव लोहिच्च (लौहित्य) ब्राह्मणाला, त्याचप्रमाणे मगध देशांत बिंबिसार राजाने चंपा सोणदंड ब्राह्मणाला व खाणुमत गाव कूटदन्त ब्राह्मणाला इनाम दिल्याचा दाखला दीघनिकायांत सापडतो. याशिवाय खुद्द पसेनदि राजा यज्ञयाग करीत होता असें कोसलसंयुत्तांतील नवव्या सुत्तावरून दिसून येतें. पण या यज्ञयागांची व्याप्ति कोसलाचा पसेनदि आणि मगधाचा बिंबिसार यांच्या राज्यांपुरतीच होती. कारण मोठमोठाले यज्ञयाग करणें राजांना आणि इनामदार ब्राह्मणांनाच काय तें शक्य होतें.
असले अवाढव्य यज्ञयाग करणें सामान्य जनतेच्या शक्तीपलीकडचें असल्यामुळे यज्ञयागांच्या लघु आवृत्त्या निघाल्या होत्या. अमुक तर्हेच्या लाकडाच्या अमुक तर्हेच्या दर्वीने, तुसाचा, कोंड्याचा, अमुक तर्हेच्या तांदळांचा, अमुक प्रकारच्या तुपाचा, अमुक प्रकारच्या तेलाचा, अमुक प्राण्यांच्या रक्ताचा होम केला असतां अमुकतमुक कार्यसिद्धि होते, असें सांगून ब्राह्मणलोक सामान्य जनतेला हे होम करावयास लावीत व कांही श्रमण देखील यांत भाग घेत असत, असें दीघनिकायांतील मजकुरावरून दिसून येतें.* कार्यसिद्धीसाठी हे लोक होम करीत असले, तरी त्यांची गणना धार्मिक विधींत करीत नसत असें वाटतें. कारण, ते होम करणार्या ब्राह्मणांना आणि श्रमणांना लोक फारसे मानीत नसत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* दीघनिकाय-ब्रह्मजाल, सामाञ्ञफल वगैरे सुत्तें पहा.

देवतांची पूजा
आजकाल हिंदु लोक जसे देवदेवता, यक्ष, पिशाच इत्यादिकांना मानतात व त्यांची समजूत करण्यासाठी बलिदान देतात, तसेच बुद्धसमकालचे हिंदु लोक देवतांना मानीत व बलिकर्म करीत. विशेष एवढाच होता की, सध्याच्या बर्याच दैवतांना पुजारी लागतात आणि ते बहुधा ब्राह्मण असतात. याशिवाय सध्याची दैवतें जरी बुद्धसमकालच्या दैवतांप्रमाणेंच काल्पनिक असलीं, तरी त्यांपैकी बहुतेकांचीं पुराणें होऊन बसलीं आहेत. हा प्रकार बुद्धसमकालीं नव्हता. वडासारख्या झाडावर, एखाद्या डोंगरावर किंवा वनांत महानुभाव देवता राहतात आणि त्यांना नवस केले असतां त्या पावतात, अशी लोकांची समजूत होती; आणि बकरे, कोंबडीं वगैरे प्राण्यांचा बळी देऊन ते आपला नवस फेडीत असत. पलास जातकाच्या (नं. ३०७) कथेवरून असें दिसतें की, देवतांची पूजा ब्राह्मण देखील करीत असत, पण त्यांनी त्या देवतांचा पुजारीपणा स्वतःची वृत्ति म्हणून बळकावल्याचा पुरावा कोठेच सापडत नाही. जसे आज दगडोबा म्हसोबाला किंवा जाखाई जोखाईला पुजारी ब्राह्मण नाहीत, तसे त्या वेळीं सर्वच देवतांना नव्हते. लोक नवस करीत आणि मध्यस्थीशिवाय आपल्या हातानेच बलिदान देत. सुजातेने वटवृक्षवासी देवतेला दुधाच्या खिरीचा नवस केला आणि शेवटीं त्या झाडाखाली बसलेल्या गोतम बोधिसत्त्वालाच तिने ती खीर दिली, ही कथा बौद्धवाङ्मयांत प्रसिद्ध आहे आणि बौद्ध चित्रकलेवर तिचा उत्तम परिणाम झाल्याचें दिसून येतें. तात्पर्य, या देवदेवतांच्या पूजेंत पुजारी ब्राह्मणांची आवश्यकता नव्हती.