भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


गोतम बोधिसत्त्व 12

तर मग बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाला कारण काय झालें असावें ?  याचें उत्तर अत्तदण्डसुत्तांत स्वतः बुद्ध भगवानच देत आहे.

अत्तदण्डा भयं जातं, जनं पस्सथ मेधकं ।
संवेगं कित्तयिस्सामि यथा संविजितं मया ॥१॥
फन्दमानं पजं दिस्वा मच्छे अप्पोदके यथा ।
अञ्ञमञ्ञेहि व्यारुद्धे दिस्वा मं भयमाविसि ॥२॥
समन्तमसरो लोको, दिसा सब्बा समेरिता ।
इच्छं भवनमत्तनो नाद्दसासिं अनोसितं ।
ओसाने त्वेव व्यारुद्धे दिस्वा मे अरती अहु ॥३॥

(१)  शस्त्रधारण भयावह वाटलें.  (त्यामुळे) ही जनता कशी भांडते पाहा !  मला संवेग (वैराग्य) कसा उत्पन्न झाला हें सांगतों.  (२)  अपुर्‍या पाण्यांत मासे जसे तडफडतात, त्याप्रमाणें परस्परांशीं विरोध करून तडफडणार्‍या प्रजेकडे पाहून माझ्या अन्तःकरणांत भय शिरलें.  (३) चारी बाजूंना जग असार दिसूं लागलें, सर्व दिशा कंपित होत आहेत असें वाटलें आणि त्यांत आश्रयाची जागा शोधीत असतां निर्भयस्थान सापडेना.  कारण, शेवटपर्यंत सर्व जनता परस्परांशीं विरुद्ध झालेलीच दिसून आल्यामुळे मला कंटाळा आला.

रोहिणी नदीच्या पाण्यासाठी शाक्य आणि कालिय भांडत होते; एके वेळीं दोघांनीही आपलें सैन्य तयार करून रोहिणी नदीपाशीं नेलें; आणि त्या प्रसंगीं बुद्ध भगवान् दोन्ही सैन्यांच्या मध्ये येऊन त्याने हें सुत्त उपदेशिलें, असा उल्लेख जातकट्ठकथेंत अनेक ठिकाणीं आला आहे.  पण तो विपर्यस्त असावा असें वाटतें.  शाक्यांना आणि कोलियांना भगवान् बुद्धाने उपदेश केला असेल आणि त्यांचीं भांडणेंही मिटवलीं असतील.  परंतु त्या प्रसंगीं हें सुत्त उपदेशिण्याचें कांही कारण दिसत नाही.  आपणाला वैराग्य कसें झालें व आपण घरांतून बाहेर कां पडलों, हें या सुत्तांत भगवान सांगत आहे.  रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने किंवा अशाच क्षुद्र कारणास्तव शाक्य आणि कोलिय यांचीं भांडणें होत.  त्या प्रसंगीं आपण शस्त्र धरावें की नाही हा बोधिसत्त्वाला प्रश्न पडला असावा.  पण शस्त्राने हीं भांडणें मिटविणें शक्य नव्हतें.  शाक्य आणि कोलिय यांचीं भांडणें जबरदस्तीने मिटवलीं गलीं, तरी तीं मिटलीं नसतीं.  कां कीं, तीं मिटविणार्‍याला पुन्हा शेजारच्या राजाशीं शस्त्र धरावें लागलें असतें; आणि जर त्याने त्यालाही जिंकलें, तर त्याच्या पलीकडच्या राजाला जिंकणें त्याला भाग पडलें असतें.  याप्रमाणें शस्त्रग्रहणामुळे जिकडे तिकडे जय मिळविल्यावाचून गत्यंतर राहिलें नसतें.  पण तो मिळविला तरी त्याला शांति कोठून मिळणार होती ?  पसेनदि कोसल आणि बिंबिसार त्यांचे पुत्रच त्यांचे शत्रु झाले.  तर मग या शस्त्रग्रहणापासून लाभ काय ?  शेवटपर्यंत भांडत राहावें हाच !  या सशस्त्र प्रवृत्तिमार्गाचा प्रेमळ बोधिसत्त्वाला कंटाळा आला आणि त्याने शस्त्रनिवृत्तिमार्ग स्वीकारला.

सुत्तनिपातांतील पब्बज्ज्या सुत्तांत आरंभींच खालील गाथा आहेत.

पब्बजं कित्तयिस्सामि, यथा पब्बजि चक्खुमा,
यथा वीमंसमानो सो पब्बजं समरोचयि ॥१॥

संबाधोऽयं घरावासो रजस्सायतनं इति ।
अब्भोकासो च एब्बज्जा इति दिस्वान पब्बजि ॥२॥


(१)  चक्षुष्मन्ताने प्रव्रज्या कां घेतली, आणि ती त्याला कोणत्या विचारामुळे आवडली हें सांगून (त्याच्या) प्रव्रज्येचें मी वर्णन करतों.

(२)  गृहस्थाश्रम म्हणजे अडचणीची आणि कचर्‍याची जागा व प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा, असें जाणून तो परिव्राजक झाला.'