भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


श्रावकसंघ 5

बौद्ध संघाची कर्तव्यनिष्ठा

हे सहाही आचार्य वयाने बुद्ध भगवंतापेक्षा वडील होते आणि त्यांच्या भिक्षूंची संख्या देखील बरीच मोठी होती.  बुद्ध या सर्व आचार्यांत वयाने लहान, आणि त्याच्या भिक्षुसंघाची संख्या देखील कमी, असें असतां ह्या लहानशा नवीन भिक्षुसंघाने सर्वांना मागे टाकलें, आणि हिंदुस्थानावरच नव्हे, तर सर्व आशियाखण्डावर आपला प्रभाव पाडला हें कसें ?

याला उत्तर हें की, वरील सहा श्रमणसंघ जरी संख्येने मोठे होते, तरी सामान्य जनसमुदायाची ते फारशी काळजी बाळगत नसत.  त्यांपैकी बहुतेकांचें तपश्चर्येच्या मार्गाने मोक्ष मिळवावा हें ध्येय होतें.  गावांत किंवा शहरांत प्रवेश करून ते गृहस्थांकडून भिक्षा घेत आणि प्रसंगोपात्त आपल्या संप्रदायाचें तत्त्वज्ञान शिकवीत.  तथापि गृहस्थांच्या हितसुखासाठी त्यांचा विशेष प्रयत्‍न नव्हता.

बोद्ध संघाची गोष्ट याच्या उलट होती.  'लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी तुम्ही चारी दिशांना जा, एका मार्गाने दोघे जाऊं नका,' हा बुद्धाचा उपदेश वर दिलाच आहे.  हा उपदेश महावग्गांत आणि मारसंयुत्तांत सापडतो आणि तशा अर्थाचे उपदेश सुत्तपिटकांत अनेक ठिकाणीं आढळतात.  ह्या बुद्ध भगवंताच्या उपदेशाला अनुसरून वागल्यामुळे त्याचा भिक्षुसंघ बहुजनसमाजाला प्रिय आणि मान्य झाला, व सर्व लोकांवर त्याचा प्रभाव पडला.

परस्परांशीं भांडणार्‍या लोकांकडे पाहून बोधिसत्त्वाला वैराग्य झालें, हें चवथ्या प्रकरणांत सांगितलेंच आहे.  तीं भांडणें राजसत्तेकडून मिटवितां येणें शक्य नव्हतें.  जोंपर्यंत लोकांत हिंसात्मक बुद्धि राहील, तोंपर्यंत समाजांतील तंटे बखेडे मिटणें शक्य नाही.  म्हणून राजसत्तेपासून निवृत्त होऊन मनुष्यजातीच्या मुक्तीचा मार्ग शोधून काढण्यास बोधिसत्त्व प्रवृत्त झाला.  सात वर्षे तपश्चर्येचे अनेक अनुभव घेतल्यानंतर त्याला मागल्या प्रकरणांत दिलेला मध्यम मार्ग सापडला; आणि त्याचा सर्व लोकांत प्रसार करण्याचा त्याने बेत ठरविला.  याच कामासाठी बुद्ध भगवंताने संघाची स्थापना केली.  तेव्हा इतर संघांतील श्रमणांपेक्षा बौद्ध श्रमण सामान्य जनतेच्या हितसुखाची विशेष काळजी घेत यांत नवल नाही.

आध्यात्मिक शेतीची आवश्यकता

समाजाने शेती, व्यापार वगैरे धंदे सुरू केले, पण समाजांत जर एकोपा नसला, तर त्या धंद्यांपासून फायदा होणार नाही; एकाने पेरलेले शेत दुसरा कापून नेईल व एखाद्या व्यापार्‍याला दुसरा चोर लुटील.  अशा रीतीने समाजांत अव्यवस्था सुरू झाली, तर त्या समाजांतील व्यक्तींना फार कष्ट भोगावे लागतील.  हा एकोपा शस्त्रबळाने उत्पन्न करतां आला, तरी तो टिकाऊ होत नाही.  परस्परांच्या सौजन्याने आणि त्यागाने उत्पन्न झालेली एकीच खरी एकी म्हणतां येईल.  सामान्य जनसमूहांत अशी एकी उत्पन्न करण्याचा बुद्धाचा हेतु होता, असें सुत्तनिपातांतील कासिभारद्वाजसुत्तावरून दिसून येतें.  त्याचा सारांश येणेंप्रमाणे.