बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग १ ला 1

भाग १ ला.

विधायक नियम
शिष्याचीं कर्तव्यें

१.बुद्धगयेच्या आसपासच्या प्रदेशाला अडीच हजार वर्षांपूर्वीं उरुवेला म्हणत असत, व सध्याच्या लीलंजन नदीला नेरंजरा नदी म्हणत असत. ह्या प्रदेशांत व ह्या नदीच्या कांठी शाक्यमुनि गातमानें सहा वर्षें खडतर तपश्चर्या करून आपला देह झिजविला; व शेवटीं बोधिवृक्षाखालीं बसून जगताचा उद्धार करणार्‍या धर्ममार्गाचें ज्ञान मिळविलें. वैशाख शु।। पौर्णिमेच्या दिवशीं आपल्या पूर्वींच्या पांच साथ्यांना त्यानें ह्या नवीन धर्ममार्गाचा उपदेश केला. म्हणजे प्रथमतः बौद्धसंघाची स्थापना ह्याच दिवशीं झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं. त्या वेळीं बुद्धभगवान् आपल्या शिष्याला, ‘एहि भिक्षु’ (भिक्षु, इकडे ये) असें म्हणे, व तोच त्याचा प्रव्रज्याविधि होत असे.

२.त्या चातुर्मास्यांत बुद्धाला आणखी ५५ शिष्य मिळाले व चातुर्मास्याच्या शेवटीं जेव्हां त्यांस निरनिराळ्या ठिकाणीं धर्मोपदेश करण्यास पाठविण्यांत आलें तेव्हां-

बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि


ह्या तीन शरण-गमनानीं प्रव्रज्या देण्यास बुद्धानें भिक्षूंस परवानगी दिली. परंतु तो स्वत: ‘एहि भिक्षु’ ह्याच वाक्यानें प्रव्रज्या देत असे.

३.  त्या चातुर्मास्यानंतर बुद्ध पुन्हां उरुवेलेला आला; व तेथे त्यानें उरुवेल काश्यपादिक तिघां बंधूंनां व त्याच्या शिष्यांना आपलें अनुयायी केलें. त्यांना घेऊन तो राजगृहात आला. तेथें संजय परिव्राजकाचे आग्रशिष्य सारिपुत्त व मोग्गल्लान आपल्या २५० सहाध्यायांसह बुद्धाचे अनुयायी झाले. त्यायोगें संघाचा विस्तार बराच झाला; व तरुण भिक्षूंवर देखरेख नसल्यामुळें ते अव्यवस्थितपणे वागूं लागले. म्हणजे सकाळीं गांवांत भिक्षेला जात असतां ते आपलीं चीवरें व्यवस्थितपणें वापरीत नसत; लोक जेवीतखात वगैरे असतांना त्यांच्यापुढें आपलें पात्र करीत; लोकांना सांगून आपणासाठी वरण भात वगैरे तयार करवीत; जेवतांना मोठ्यामोठ्यानें बोलत असत. हें पाहून लोकांत त्यांची निदा होऊं लागली. ह्या श्रमण लोकांत अशी अव्यवस्था कां, ब्राह्मणासारखे हे लोक जेवण्याचे वेळीं मोठमोठ्यानें बोलतात हें कसें, असें लोक म्हणत.

४.  हें वर्तमान भिक्षूंनीं बुद्धाला कळविलें तेव्हां त्यानें त्या तरुण भिक्षूंचा निषेध केला. चैनीची, हांवरेपणाची,असंतोषाची, गप्पागोष्टींची व आळसाची निंदा करून अनेक रितीनें साघेपणाची, निरपेक्षतेची, संतोषाची, उत्साहाची त्याने स्तुती केली; व तो भिक्षूंना म्हणाला:- भिक्षुहो, आजपासून उपाध्याय स्वीकारण्याची मी परवानगी देतों. उपाध्यायानें आपल्या शिष्यांवर पुत्राप्रमाणें प्रेम करावें, व शिष्यानें उपाध्यायाला पित्याप्रमाणें समजावें. ह्याप्रमाणें परस्परांविषयीं आदर ठेवल्यानें माझ्या ह्या धर्मविनयांत या दोघांची उत्तम अभिवृद्धि होईल. उपाध्यायाचा स्वीकार ह्याप्रमाणें करावा:- उत्तरा१संग  एका खांद्यावर करून त्याला नमस्कार करावा, व उकिडव्यानें बसून हात जोडून म्हणावें कीं, भन्ते, माझे उपाध्याय व्हा, भन्ते, माझे उपाध्याय व्हा, भन्ते माझे उपाध्याय व्हा. “ठीक आहे, बरें आहे’’ किंवा अशाच दुसर्‍या कोणत्यातरी कायिक किंवा वाचसिक संज्ञेनें त्यानें आपल्या विनंतीचा स्वीकार केला म्हणजे तो आपला उपाध्याय झाला असें समजावें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- नेसण्याच्या चीवराला अंतरवासक, पांघुरण्याच्या चीवराला उत्तरासंग व थंडीसाठीं वापरण्याच्या चीवराला संघाटी म्हणतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------