बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग १ ला 2

५. शिष्यानें उपाध्याबरोबर चांगल्या रितीन वागावें, उपाध्यायाविषयीं त्याचीं कर्तव्यें आहेत ती अशीं:-

सकाळी लवकर उठून वहाणा काढून (उघड्या पायांनी) आपले उत्तरासंग एका खांद्यावर करून उपोध्यायाला दंतकाष्ठ द्यावें; तोंड धुवावयाला पाणी द्यावे व त्याच्यासाठीं आसन मांडावे. जर पेज असेल तर त्याचें पात्र धुवून त्यांतून ती त्याच्यापुढें करावी. पेज पिऊन झाल्यावर आंचवण्यास पाणी द्यावें व पात्र धुवून व्यवस्थितपणें ठेवावें. उपाध्याय उठल्यावर आसन काढून ठेवावें. तो प्रदेश अस्वच्छ झाला असल्यास झाडून काढावा.

६. उपाध्यायाची (*भिक्षेसाठीं) गांवांत जाण्याची इच्छा असल्यास गांवांत जाण्याच्या वेळीं नेसण्याचें चीवर द्यावें; व पूर्वीं नेसलेलें चीवर सोडून ठेवल्यावर तें घ्यावें. कमरपट्टा द्यावा. संघाटी आणि उत्तरासंग हीं दोन्ही चीवरें एकमेकांशी मिळवून द्यावीं; आणि पात्र धुवून द्यावें. उपाध्यायाला साथी पाहिजे असल्यास आपण व्यवस्थितपणें चीवर नेसून कायबंधन बांधून नीट रितीनें शरीर आच्छादन करून आपले भिक्षापात्र धुवून घेऊन उपाध्यायाच्या मागोमाग जावें. उपाध्यायापासून फार दूर किंवा फार जवळ राहूं नये. आपल्या पात्रांत जें लोक घालतील तेवढ्याचा स्वीकार करावा. उपाध्याय बोलत असतां मध्येंच आपण बोलूं नये; परंतु नियमाचा भंग होण्यासारखें कांही बोलत असला, तर त्याचें नम्रपणे निवारण करावें.

७. गांवांतून परत येतांना आपण पूर्वीं येऊन उपाध्यायाचें आसन तयार करावें. पाय धुण्यासाठीं पाणी व पाट तयार ठेवावा. पुढें जाऊन त्याचें पात्र व संघाटी ध्यावी. विहारांत नेसण्याचें चीवर द्यावें; व नेसलेलें चीवर सोडून ठेवल्यावर घ्यावें. जर तें घामाने भिजलेलें असेल तर थोडा वेळ उन्हांत टाकावें. पण तें तेथेंच ठेवूं नये. तें गोळा करावें, व गोळा करतांना फाटूं नये अशा बेताने करावें. कायबंधन (कमरपट्टा) चीवराच्या घडीवर ठेवावें. जर पात्रांत भिक्षा शिल्लक असेल व उपांध्यायाची जेवणाची इच्छा असेल तर ती, पाणी देऊन उपाध्यायासमोर ठेवावी. पिण्याचें पाणी पाहिजे असल्यास विचारावें. जेवल्यानंतर पाणी देऊन त्याच्याकडून पात्र घेऊन तें चांगलें धुवून कांहीं वेळ उन्हांत ठेवावें. पण तें तेथेंच राहूं देऊ नये. पात्र आणि चीवरें व्यवस्थितपणें ठेवण्यांत यावीं. मंचकाच्या खालीं किंवा चौरंगाच्या खालीं जागा साफ करून तेथें पात्र ठेवावें. परंतु तें नुस्त्या जमिनीवर ठेवूं नये. चीवर ठेवण्याची दांडी किंवा दोरी साफ करून तिच्यावर चीवरांची घडी व्यवस्थितपणें ठेवावी. उपाध्याय उटल्यावर आसन, पाय धुण्याचें पाणी, पाट वगैरे सर्व पदार्थ जागच्याजागीं व्यवस्थितपणे ठेवावें. तो प्रदेश स्वच्छ नसल्यास झाडून काढावा.

८. जर उपाध्यायाला स्नान करावयाचें असेल, तर स्नानाची तजवीज करावी; थंड पाणी पाहिजे असल्यास थंड द्यावें, ऊन पाहिजे असल्यास ऊन द्यावें. उपाध्याय अग्निशाळेंत १ (१ अग्निशाळा म्हणजे उष्णतेच्या योगें अंगांतून घाम काढण्यासाठीं तयार केलेली खोली. विशेष माहिती ह्याच भागाच्या ८२व्या कलमांत पहावी.) जाऊं इच्छीत असल्यास उटणें तयार करून द्यावे. शक्य असल्यास आपणहि अग्निशाळेंत प्रवेश करावा. प्रवेश करतांना तोंडाला माती लावून व शरीर नीट आच्छादून प्रवेश कारवा. वृद्ध भिक्षूंना चिकटून बसूं नये. नवीन भिक्षूंना आसनांवरून उठवूं नये. तेथून बाहेर निघतांना बसण्याचा पाट घेऊन शरीर नीट आच्छादून निघावें. पाण्याच्या ठिकाणींहि उपाध्याचें काम करावें प्रथमत: आपण वर निघून आंग पुसून व कोरडें चीवर नेसून उपाध्यायाचे आंग पुसावें. त्याला कोरडें चीवर द्यावें; संघाटी द्यावी. आग्निशाळेंतील पाट घेऊन प्रथमत: विहारांत यावें, व उपाध्यायाचें आसन मांडावे. पाय धुण्याचें पाणी व पाट ठेवावा. उपाध्यायाला पिण्याचे पाणी पाहिजे असल्यास विचारावें. जर उपाध्यायाकडून पाठ घ्यावयाचा असेल तर घ्यावा. त्याला प्रश्न विचारावयाचे असतील तर विचारावे.

९. ज्या विहारांत उपाध्याय रहात असेल तो मलीन झाला असल्यास, शक्य असेल तर, साफ करावा. विहार साफ करीत असतां प्रथम पात्रें आणि चीवरें बाहेर काढून एका बाजूला ठेवावीं. सतरंज्या अंथरूणें वगैरे बाहेर काढावीं तक्के व उश्या बाहेर काढून एका बाजूस ठेवाव्या. खाट बाहेर काढतांनां दरवाजाला आदळूं न देतां व्यवस्थितपणें बाहेर काढावी व एका बाजूला ठेवावी. त्याचप्रमाणें चौरंग बाहेर काढून एका बाजूला ठेवावा. खाटेचे प्रतिपादक २(२ खाटेचे खूर ठेवण्याचे ठोकळे किंवा दगड) बाहेर काढून ठेवावे. पिकदाणी व बसण्याचें आसन बाहेर काढून ठेवावें. जर विहारांत कोळ्याचीं जाळी झालीं असतील तर प्रथम छताची बाजू साफ करावी. मग खिडक्या, दरवाजे व कोंपरे झाडावे. गेरूनें रंगविलेल्या भिंती घाणेरड्या झाल्या असतील तर फडकें पाण्यांत भिजवून पिळावें व त्यानें त्या पुसून काढाव्या. काळ्या गिलाव्यानें तयार केलेली जमीन ह्याप्रमाणेंच ओल्या फडक्यानें पुसून काढावी. साधी जमीन असेल तर धूळ उडूं नये म्हणून पाणी शिंपून झाडून काढावी. कचरा काढून एका बाजूला टाकावा.