बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग १ ला 5

भिक्षुप्रव्रज्य

२०. त्याकाळीं एक ब्राह्मण भिक्षूंजवळ जाऊन प्रव्रज्या मागूं लागला. पण भिक्षूंनीं त्याला ती दिली नाहीं. त्या योगे तो अत्यंत दुर्बल झाला. बुद्ध भगवंतानें तें पाहून भिक्षूंस त्याचें कारण विचारलें व त्यांनीं तें सांगितलें. तेव्हां भगवान् म्हणाला, “ह्याचा अधिकार कोणाला आठवतो काय?’’ त्यावर सारिपुत्त म्हणाला, “भन्ते, याचा अधिकार मला आठवतो, एकदां मी राजगृह नगरांत भिक्षेला गेलों असतां ह्याने मला एक पळीभर भिक्षा दिली होती.” ह्या कृतज्ञतेबद्दल बुद्धाने सारिपुत्ताची स्तुती केली, व सारिपुत्तालाच त्या ब्राह्मणाला प्रव्रतज्या द्यावयाला सांगितले.

२१. पण जेव्हां ब्राह्मणाला कोणत्या प्रकराची प्रव्रज्या द्यावी असा सारिपुत्तानें प्रश्न केला तेव्हां ह्या प्रकरणीं भिक्षूंना बोलावून बुद्ध म्हणाला:- जी तीन शरणगमनानीं उपसंपदा देण्याची परवानगी दिली ती मी आजपासून रद्द करतों, व विज्ञाप्ति आणि त्रिवार उल्लेख करून उपसंपदा देण्याची परवानगी देतों. ती अशी:-

जो हुशार आणि योग्य भिक्षु असेल त्याने संघाला विज्ञाप्ति करावी ‘भदंत संघ, मी काय बोलतों त्याजकडे लक्ष द्या. हा अमुक नांवाचा मनुष्य अमुक नांवाच्या उपाध्यायाकडून उपसंपदेसाठीं पुढें करण्यांत येत आहे. जर संघाला योग्य वाटत असेल तर अमुक नांवाच्या उपाध्यायाच्या हाताखालीं त्याला उपसंपदा द्यावी.’ ही विज्ञाप्ति झाली. पुन्हा त्यानें म्हणावें कीं, ‘भदन्त संघ, मी काय बोलतों तें ऐका, हा अमुक मनुष्य अमुकाकडून उपसंपदेसाठीं पुढें करण्यांत येत आहे. त्याला त्या उपाध्यायाच्या हाताखालीं संघ उपसंपदा देत आहे. ज्या आमच्या बांधवाला ही गोष्ट पसंत असेल त्याने मुकाट्यानें रहावें, व ज्याला पसंत नसेल त्याने तसे बोलावें.’ दुसर्‍यांदा व तिसर्‍यांदा हाच मजकूर त्या भिक्षूनें पुन्हा उच्चारावा, व कोणी हरकत घेत नसल्यास म्हणावें कीं, ‘ह्या अमुक मनुष्याला अमुक उपाध्यायाच्या हाताखाली संघानें उपसंपदा दिली आहे. संघाला ही गोष्ट पसंत आहे म्हणून संघ उगा आहे. तेव्हां ही गोष्ट ठरली असें मी गृहीत धरून चालतों.’

२२. त्या काळी कोणी एक भिक्षु उपसंपदेचा विधि झाल्यावर शिस्तीविरुद्ध वागूं लागला. तेव्हां ‘तसें वागणें योग्य नाही’ असें भिक्षूंनी त्याला सांगितलें. तो म्हणाला; “मला उपसंपदा द्या असें मी तुम्हाला कधी सांगितलें होतें?” ही गोष्ट बुद्ध भगवंताला समजली. तेव्हां तो भिक्षूंना म्हणाला, “मागणी केल्याशिवाय कोणत्याहि माणसाला उपसंपदा देऊं नये.” मागणी करण्याचा विधि असा:-

त्या उमेदवारानें संघापाशीं येऊन, उत्तरासंग एका खांद्यावर करून उकिडव्यानें बसून हात जोडून म्हणावें, ‘भदंत संघाजवळ उपसंपदेची मी याचना करतों. अनुकंपा करून संघाने माझा उद्धार कारवा.’ दुसर्‍यांदा व तिसर्‍यांदा त्यानें असेंच बोलावें. मग हुशार आणि समर्थ भिक्षूनें संघाला विज्ञाप्ति करावी, ‘भदंत संघ, मी काय बोलतों ह्याजकडे लक्ष द्या. भंदत संघ, हा अमुक मनुष्य अमुक उपाध्यायाकडून उपसंदेसाठीं पुढें करण्यांत येत आहे. तो त्या उपाध्यायाच्या हाताखालीं उपसंपदेची याचना करीत आहे. संघाला जर योग्य वाटत असेल तर त्याला संघानें त्या उपाध्यायाच्या हाताखालीं उपसंपदा द्यावी.’ मग वर सांगितल्या प्रमाणें त्रिवार उपसंपदेचा मायना म्हणून, कोणी हरकत घेतली नाहीं. म्हणजे तो गृहस्थ भिक्षु झाला असें समजावें.