बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग १ ला 13

४८. सोणाचा हा विचार भगवंतानें जाणला व गृध्रकूट पवर्तावरून एकदम शीतवनांत येऊन, कांही भिक्षूंना बरोबर घेऊन, भिक्षूंचीं वासस्थानें पहात पहात भगवान् सोणाच्या चंक्रमाकडे गेला, व तो चंक्रम रक्ताने माखलेला पाहून भिक्षूंना म्हणाला, “असा हा चंक्रम रक्ताने भरलेला कां दिसतो ?’ ‘सोण अत्यंत उत्साहानें रात्रीं ह्या चंक्रमावर फिरतो, व त्यामुळें त्याच्या पायांस जखमा होऊन रक्त निघतें व त्यामुळें हा चंक्रम असा दिसतो’ असें भिक्षूंनीं भगवंताला सांगितलें. तेव्हां भगवान् सोणाच्या विहारांत जाऊन तेथें मांडलेल्या आसनावर बसला. सोणहि भगवंताला नमस्कार करून एका बाजूला बसला. तेव्हां भगवान् त्याला म्हणाला, “सोणा, पुन्हां गृहस्थाश्रम स्वीकारून संपत्तीचा उपभोग घ्यावा, व पुण्यकर्में करावीं असा विचार तुझ्या मनांत आला नाहीं काय?” सोण:-होय भदंत. “सोणा, पूर्वीं तूं गृहस्थ असतां वीणा वाजविण्यांत कुशल होतास नव्हे काय?” सोण:-होय भंदत. “पण जेव्हां तूं तारा अतिशय ताणीत होतास तेव्हां तुझ्या वीण्यांतून स्वर बरोबर निघत असे काय?” व तुला तो नीट वाजवितां येत असे काय?” सोण:-नाही भदंत. “पण सोणा, जेव्हां तुझ्या वीण्याच्या तारा अत्यंत शिथिल होत असते तेव्हां त्यांतून स्वर बरोबर निघत असे काय? व तो तुला नीट वाजवितां येत असे काय?” सोण:-नाही भदंत. “पण सोणा, जेव्हां वीणाच्या तारा अत्यंत ताणल्या जात नसत किंवा अतिशिथिल होत नसत, व समप्रमाणांत असत तेव्हां तुझ्या वीण्यांतून स्वर बरोबर निघत असत कीं नाहीं, व तुला तो नीट वाजवितां येतं असे कीं नाहीं?” सोण:- होय भदंत. “ह्याचप्रमाणें सोणा, अत्यंत उत्साहाने चित्त भ्रान्त होतें, व उत्साह शिथिल झाला असतां आळसाला कारणीभूत होतो. म्हणून सोणा, तूं वीर्यसमता संपादन कर, इंद्रियसमत्व१ कसें मिळवावें हें शीक.” असा उपदेश करून भगवान् गृध्रकूट पर्वतावर गेला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- इंद्रियसमत्वाविषयीं विशेष माहितीसाठीं बुद्धलीलासरासंग्रह पृ.१३० पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
४९. तदनंतर सोणानें वीर्यसमता संपादन केली; व इंद्रियसमत्व मिळविलें; आणि एकान्तांत राहून अल्पावधींतच तो अर्हन्तपदाला पावला; तेव्हां भगवंताजवळ येऊन नमस्कार करून एका बाजूला बसला व म्हणाला, “भदंत, जो भिक्षु अर्हन्त झाला असेल त्याला नैष्कर्म्य, एकान्त, मैत्री, बंधनाचा क्षय, तृष्णेचा क्षय व ज्ञान ह्या सहा गोष्टी आवडतात. कोणाचीहि अशी समजूत होणें शक्य आहे कीं, केवळ श्रद्धेमुळें त्याला नैष्कर्म्य आवडतें. पण असें समजतां कामा नये. राग, द्वेष आणि मोह ह्यांचा क्षय करून वीतराग, वीतव्देष व वीतमोह झाल्यामुळेंच त्याला नैष्कर्म्य आवडतें. दुसर्‍या एखाद्याची अशी समजूत होणें शक्य आहे कीं, लाभ, सत्कार व कीर्ति ह्याच्या आशेनें ह्याला एकान्त आवडतो. पण हे असें नव्हे. तो वीतराग, वीतद्वेष, वीतमोह असल्यामुळेंच त्याला एकान्त आवडतो. दुसर्‍या एखाद्याची समजूत अशी होणें शक्य आहे कीं, व्रतोपवासांवर विश्वास बसल्यानें त्याला मैत्रीभावना आवडते. पण हें असें समजतां कामा नये. तो वीतराग, वीतद्वेष व वीतमोह असल्यामुळेंच त्याला मैत्रीभावना आवडते. बंधनाचा क्षय, तृष्णेचा क्षय व ज्ञानप्राप्ति ह्यांचीहि आवड वीतराग, वीतद्वेष व वीतमोह झाल्यामुळेंच त्याला उत्पन्न होते. ह्याप्रमाणें जो चांगल्या रीतीनें मुक्त होतो त्याच्या मनाला रूपशब्दादि पचेंद्रियांचे विषय व मनोवृत्ति बांधू शकत नाहींत. त्याचें चित्त स्थिर आणि अप्रकंप्य होतें; आणि अनित्यता त्याला समजते. एखाद्या पर्वतावर चारी दिशांनीं वारा आणि पाऊस येऊन आदळले तरी तो जसा कंप पावता नाहीं, त्याप्रमाणे पंचेंद्रियांच्या विषयांपासून किंवा मनोवृत्तींपासून अर्हन्ताचें चित्त प्रकंपित होत नाहीं.”

५०. हें सोणाचे भाषण ऐकूण भगवान् भिक्षूंना म्हणाला, “कुलपुत्र अशा रितीनें निर्वाणप्राप्ति प्रकट करीत असतात. मीपणा न दाखवितां सोणानें तात्पर्य सांगितलें. पण दुसरे कांही निरुपयोगी मनुष्य जणूं काय थट्टामस्करीच करीत आहेत अशा रितीनें निर्वाणप्राप्ति प्रकट करतात. पुढें त्यांना पश्चात्ताप करावा लागतो.” तदनंतर भगवान् सोणाला उद्देशून म्हणाला, ‘सोणा, तूं सुकुमार आहेस. एका पठ्याच्या वाहणा घालण्याची मी तुला परवानगी देतों.’ सोण म्हणला, “भदंत, ऐशीं गाडेभर द्रव्य व ज्यांत बेचाळीस हत्तिणी व सात हत्ती आहेत एवढा मोठा लवाजमा सोडून मी भिक्षु झालों. असें असतां लोक मला म्हणतील कीं, एवढी मोठी धनदौलत सोडून ह्याला आतां एका पट्याच्या वाहणांचा लोभ झाला आहे. पण जर भगवान् सर्व भिक्षुसंघाला वाहणा वापरण्याची परवानगी देईल तर मीहि वापरीन.” तेव्हां ह्या प्रकरणीं भगवंताने भिक्षूंना बोलावून वाहणा वापरण्याची परवानगी दिली. परंतु त्या वाहणा एका पट्याच्याच असल्या पाहिजेत; व साध्या चामड्याच्या असल्या पाहिजेत. ताडपत्रादिकांच्या वाहणा निषिद्ध होत. आचार्य, उपाध्याय वगैरे उघड्या पायांनीं चंक्रमण करीत असतां, अन्तेवासिकांनी आणि शिष्यांनी वाहाणा घालून चंक्रमण करूं नये. ज्याच्या पायाला जखम झाली असेल त्याला हा नियम लागू नाही. कांही भिक्षु सकाळी खडावा घालून फिरत होते. ह्यामुळें इतर भिक्षूंच्या समाधीचा भंग होत असे; म्हणून भगवंतानें खडाव वापरण्याची मनाई केली. भिक्षेला जातांना वहाणा घालून जातां कामा नये; पण आजारी भिक्षूला हा नियम लागू नाहीं.