बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग १ ला 14

५१. त्या काळीं आयुष्मान महाकात्यायन अवंती राष्ट्रांत कुररघर येथें प्रपात पर्वतावर रहात होता. त्याचा सोण कुटिकर्ण नावांचा उपासक उपस्तायक होता. तो महाकांत्यायनाला म्हणाला, “भदंत, आपल्या धर्मोपदशानें मला असे वाटतें कीं, गृहस्थाश्रमांत राहून अत्यंत पिरशुद्ध ब्रह्मचर्य पालन करणें शक्य नाहीं, म्हणून आपण मला प्रव्रज्या द्यावी.” महाकात्यायन म्हणाला, “आमरण एकटा निजणें व दिवसांतून एकदां खाणें असे हे ब्रह्मचर्य पाळणें फार कठीण आहे. तूं गृहस्थाश्रमांत राहूनच बुद्धधर्माचें पालन कर. उपोसथाच्या दिवशी एकटा निजणें व एकदां जेवणें हें व्रत पाळ.” सोणानें दोनतीनदा अशीच याचना केली. तेव्हां महाकात्यायनानें त्याला श्रामणेरप्रव्रज्या दिली. परंतु अवंती राष्ट्रांत भिक्षु फार थोडे असल्यामुळें सोणाला उपसंपदा देण्यास दहा भिक्षु मिळेनात. तीन वर्षानंतर इकडून तिकडून मोठ्या कष्टाने दहा भिक्षु गोळा करून महाकात्यायनानें सोणाला उपसंपदा दिली.

५२. तो वर्षाकाल संपल्यावर सोण महाकात्यायनाला म्हणाला, “भगवंताची मीं कीर्ति ऐकली आहे खरी, पण त्याला मी पाहिलें नाही. त्याच्या भेटीला जाण्याची मला परवानगी द्या.” तेव्हां महाकात्यायन म्हणाला, “फार चांगलें. तूं भगवंताच्या दर्शनाला जा; व माझ्या तर्फेनेंहि भगवंताला नमस्कार करून सांग:- (१) भदंत अवंतीदक्षिणापथांत भिक्षु फार थोडे. तीन वर्षांनंतर मोठ्या कष्टानें दहा भिक्षु गोळा करून मला उपसंपदा देण्यांत आली. तेव्हां ह्या प्रदेशांत ह्याहीपेक्षां कमी भिक्षूंनीं उपसंपदा देण्याची परवानगी द्यावी. (२) अवंतीदक्षिणापंथांतील जमीन प्रखर व कांटे फार तेव्हां ह्या प्रदेशांत चार किंवा जास्ती पट्टांच्या वाहणा वापरण्यास परवानगी द्यावी. (३) ह्या प्रदेशांतील लोक स्नानप्रिय आहेत. तेव्हां नित्यस्नान करण्याची परवानगी द्यावी. (४) येथील लोक बसण्याउठण्यास निरनिराळ्या प्रकारचीं चामडीं पार वापरीत असतात. मध्यप्रदेशांत जशा चट्या तशीं इकडें चामडीं. तेव्हां एडकचर्म, अजचर्म व मृगचर्म वापरण्यास परवानगी द्यावी.”

५३. सोण कुटिकर्ण महाकात्यायनाला वंदन करून आपलें पात्र चीवर घेऊन क्रमश: प्रवास करीत श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत आला, व तेथें भगवंताला नमस्कार करून एका बाजूला बसला. भगवंतानें त्याच्या निजण्याची सोय आपल्याच विहारांत करविली; बरीच रात्रपर्यंत मोकळ्या हवेंत चंक्रमणे करून विहारांत प्रवेश केला. बराच वेळ चंक्रमण करून सोणहि निजावायास गेला. पहांटेला उठून भगवान् सोणाला म्हणाला, “कांही तरी धर्म बोल.” सोणानें सुत्तनिपातांतील अट्ठक वर्गातील सूत्रें सुरांत म्हटलीं. भगवंतानें त्याचे अभिनंदन केलें. भगवान् त्याला म्हणाला, “संघांत येऊन तुला किती वर्षे झालीं?” “एकच वर्ष भदंत,” असें सोणानें उत्तर दिलें. “इतक्या उशिरां तूं संघांत प्रवेश केलास हें कसे” असें भगवंतानें विचारिलें असतां तो म्हणाला, “भदंत कामोपभोगांत मला दोष दिसून आल्यास पुष्कळ काळ झाला. परंतु गृहस्थाश्रमांत अशा कांही अडचणी आणि अशीं कांहीं कामें असतात कीं, मनुष्य बद्ध होऊन राहतो.” तें ऐकून भगवंतानें उद्गार काढिले ते असे:- “जगांत दोष पाहून आणि निष्प्रपंच धर्म जाणून पवित्र आर्य पापांत रमत नाहीं; बुद्धशासनांत रमतो.

५४. बुद्ध भगवान् आपणाला उत्तेजन देत आहे, व महाकात्यायनानें मागितलेल्या मागण्या सांगण्याची हीच वेळ आहे. असें जाणून सोणाने नमस्कार करून त्या मगाण्या बुद्धासमोर ठेविल्या. ह्या प्रकरणी भिक्षूंला गोळा करून भगवान् म्हणाला, “आजपासून सर्व प्रत्यंतजनपदांत पांच भिक्षूंच्या समुदायाला (त्यांतील एक विनयधर असावा) उपसंपदा देण्याची मी परवानगी देतों. प्रत्यंतजनपद येणेंप्रमाणें:- पूर्वेला कजंगल नांवाचें शहर; त्यानंतर महाशाल आणि त्यानंतर प्रत्यंतजनपद. दक्षिण दिशेला श्वेतकर्णिक नांवाचे शहर; त्यानंतर प्रत्यंतजनपद. पश्चिमेला स्थूण (थूण) नांवाचा ब्राह्मण-ग्राम; नंतर प्रत्यंतजनपद. उत्तरेला उशीरध्वज नांवाचा पर्वत; नंतर प्रत्यंतजनपद.” त्याचप्रमाणें भगवंतानें महाकात्यायनाच्या इतर मागण्या सर्व प्रत्यंतजनपदांतील भिक्षूंसाठी मान्य केल्या.१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१-  ह्या चार मागण्यांपैकी दुसरीचा आणि चवथीचाच ह्या प्ररकरणाशी संबंध आहे. तरी मूळ ग्रंथांतील पांचापैकी चार विशेष महत्वाच्या वाटल्यावरून त्या चार येथें दिल्या आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------