बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग २ रा 13

२१. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं कांही भिक्षु इतर भिक्षूंच्या हवालीं आपली संघाटी करून अंतरवासक व उत्तरासंग ह्या दोनच चीवरांनीं प्रवासाला जात असत. त्यांनीं ठेवून दिलेल्या चीवरांना बुरशी येत असे, व भिक्षु तीं उन्हांत वाळवीत असत. आनंदानें तें पाहिलें व, हीं चीवरें कोणीचीं असा त्यानें त्या भिक्षूंना प्रश्न केला. त्यांनीं आनंदाला तो गोष्ट सांगितली. आनंदानें तिचा निषेध केला, व ती भगवंताला कळविली. ह्या प्रकरणीं भगवंतानेंहि ह्या गोष्टीचा निषेध करून मिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

“चीवर करून संपल्यावर व कठिन उठल्यावर जर भिक्षु चीवर ठेवून दुसरीकडे जाईल, तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें.”

त्या काळीं कौशांबी येथें एख भिक्षु आजारी होता. त्याच्या नातेवाईकांनीं त्याला आपणांकडे बोलाविलें. पंरतु तीन चीवरें घेऊन चालत जाण्याची त्याच्यामध्यें ताकद नव्हती. तेव्हां भगवंतानें आजारी भिक्षूला दोनच चीवरें घेऊन संघाच्या अनुमतीनें दुसरीकडे जाण्याची परवानगी दिली; व वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

चीवर तयार करून संपल्यावर, व कठिन उठवल्यावर, जर भिक्षु संघाच्या संमतीशिवाय चीवर ठेवून दुसरीकडे जाईल. तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें. ।।२।।

२२. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं एका भिक्षूला अकाल१चीवरवस्त्र मिळालें होतें. त्याचें चीवर बनवीत असतां तें त्याला पुरेना. म्हणून तो त्याच्या सुरकुत्या काढून लांबरूंद करण्यासाठीं तें पाण्यांत भिजवून हातानें दाबीत असे. तें पाहून भगवंतानें त्याला प्रश्न केला कीं, तूं हें चीवर पुन्हां पुन्हां कां दाबतोस? तो म्हणाला, “भंदत, मला अकाल चीवरवस्त्र मिळालें. त्याचें मी चीवर बनविलें असतां तें मला पुरत नाहीं; म्हणून मी असें करतों.” भगवान् म्हणाला, “तुला चीवरवस्त्र मिळण्याची आशा आहे काय?” त्यानें होय असें उत्तर दिलें. तेव्हां ह्या प्रकरणीं भिक्षूंला बोलावून भगवान् म्हणाला, “अकाल चीवरवस्त्र मिळालें असतां व दुसरें वस्त्र मिळण्याची आशा असतां तें ठेवण्याची मी परवानगी देतों.”
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- अकाल चीवर म्हणजे कठिनाच्या महिन्याशिवाय इतर महिन्यांत मिळालेलें वस्त्र.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भगवंताची अशी अनुज्ञा मिळाली आहे म्हणून भिक्षु अकाल चीवरवस्त्रें घेऊन त्यांचीं गाठोडीं एक महिन्यापेक्षां जास्त दिवस दांडीला टांगून ठेवीत असत. तें पाहून आनंदानें त्यांचा निषेध केला; व ही गोष्ट भगवंताला कळविली. भगवंतानीहि त्यांचा निषेध केला, व भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

चीवर तयार करून संपल्यावर, व कठिन उठवल्यावर जर भिक्षूला अकाल चीवरवस्त्र मिळालें तर त्यानें ते घ्यावें, व लवकर चीवर करावें. जर पुरेसा कपडा नसेल तर दुसरें मिळण्याची आशा असल्यास त्यानें तें वस्त्र एक महिन्यापर्यंत ठेवून घ्यावें. दुसरें मिळण्याची आशा असून देखील जर त्यापेक्षां जास्त दिवस ठेवील, तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।३।।