बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग २ रा 21

त्या काळीं पिलिंदवच्छ त्या गांवांतील कुटुंबांत भिक्षेसाठीं जात असे. एक दिवशीं तेथें उत्सव होता. लहान मुली अलंकार आणि पुष्पमाला धारण करून क्रीडा करीत होत्या. पिलिंदवच्छ अनुक्रमें भिक्षा ग्रहण करीत एका आरामिकाच्या घरीं गेला; व तेथें त्याच्यासाठीं मांडलेल्या आसनावर बसला. त्या आरामिकाची मुलगी, ‘मला अंलकार द्या, मला माळा द्या,’ म्हणून रडत होती. पिलिंदवच्छानें, ती कां रडते. याची चौकशी केली, तेव्हां आरामिक त्याला म्हणाला, “ ही मला अलंकार मागत आहे. आम्हां गरिबांच्या घरीं अलंकार कोठून असणार?” पिलिंदवच्छानें एक गवताची चुंबळ घेऊन आरमिकाला ती त्या मुलीच्या डोक्यावर ठेवावयास सांगितली. ती तिच्या डोक्यावर ठेवल्याबरोबर अत्यंत सुंदर सुवर्णमाला बनली. तशा प्रकारची सुवर्णमाला राजाच्या अंत:पुरांतहि नव्हती. ती त्या आरामिकानें चोरून आणली असावी अशा संशयावरून त्या आरामिक कुटुंबाला पकडून कैद करण्यांत आलें. तेव्हां खुद्द पिलिंदवच्छानें राजवाड्यांत जाऊन, त्या आरामिक कुटुंबाला कां कैद केलें, असा बिंबिसार राजाला प्रश्न केला. राजा म्हणाला, “अशा प्रकारची सुवर्णमाला त्या आरामिकाच्या घरीं कोठून असणार! त्यानें ती चोरूनच घेतली असली पाहिजे; म्हणून त्या कुटुंबाला कैद करण्यांत आलें आहे.” तें राजाचें भाषण ऐकून, राजवाडा सुवर्णमय होवो, असा पिलिंदवच्छनें संकल्प केला. त्यामुळें राजवाडा सोन्याचा दिसू लागला. आणि पिलिंदवच्छ राजला म्हणाला, “इतकें सोनें आपल्यापाशीं कसें आलें!” त्याची सिद्धी जाणून राजानें त्या आरमिक कुटुंबाला सोडून दिलें. राजमहालांत आपल्या सिद्धीचा प्रभाव दाखविल्यानें पिलिंदवच्छाची लोकांत फार कीर्ति पसरली; व लोक त्याला तूप, लोणी, तेल, मध आणि काकवी हीं पांच औषधें देऊं लागले. त्याचे जे साथी होते, ते घडे भरून भरून ही औषधें साठवून ठेवीत असत. त्यामुळें विहारांत उंदीर फार होऊं लागले. लोक ते पाहून म्हणत कीं, हे शाक्यपुत्रीय श्रमण बिंबिसार राजाप्रमाणें विहारांत कोठारें करूं लागले आहेत. हें वर्तमान भगवंताला समजलें तेव्हां त्यानें त्या भिक्षूंचा निषेध करून सर्व भिक्षूंसाठीं नियम केला तो असा:-

तूप, लोणी, तेल, मध आणि काकवी हीं पांच औषधें अशक्त भिक्षूंना उपयोगी पडणारीं आहेत. तीं घेऊन सात दिवसपर्यंत सांठवून उपयोगांत आणावीं. त्यापेक्षां जास्त दिवस सांठवून ठेवील त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।२३।।

४३. बु्द्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं वर्षाकालिक पंचा वापरण्यास भगवंतानें भिक्षूंना परवानगी दिली होती. षड्वर्गीय भिक्षु भगवंतानें परवानगी दिली आहे म्हणून वर्षाकाळ येण्यापूर्वीच पंचा घेत असत व वापरती असत, व तो जीर्ण झाल्यावर नागवेच१ (१- भिक्षूंपाशीं तीन चीवरें असत. परंतु तीं त्यांना रोज वापरावीं लागत, व ह्यासाठीं पावसाळ्यांत निराळा पंचा ठेवावा लागे.) पावसांत उभे रहात असत. तें त्यांचें कर्म सज्जन भिक्षूंला आवडलें नाहीं; व भगवंताला हे वर्तमान समजलें तेव्हां त्यानें त्यांचा निषेध करून नियम घालून दिला तो असा:-

उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यांत वर्षाकालिक छाटी (पंचा) मिळवावी, व उन्हाळ्याच्या शेवटच्या पंधरवड्यांत ती वापरावी, त्या महिन्यापूर्वी जो छाटी मिळवील, व त्या शेवटल्या पंधरवड्यापूर्वी वापरील, त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।२४।।

४४. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या समयीं उपनंद शाक्य पुत्र आपल्या भिक्षु भावाला म्हणाला, “चल, आपण प्रवासाला जाऊं.” त्याचें चीवर जुनें झालें असल्यामुळें तो प्रवासाला जाण्यास राजी नव्हता. तेव्हां उपनंदानें त्याला नवीन चीवर दिलें. पुढें त्याला भगवान् प्रवासाला जाणार आहे असें वर्तमान समजलें; व उपनंदाबरोबर प्रवासाला न जातां भगवंताबरोबरच जाण्याचा त्यानें बेत ठरविला. तो बेत त्यानें उपनंदाला कळविला. उपनंदानें तो आपल्याबरोबर येण्यास कबूल नाहीं म्हणून त्याला दिलेलें चीवर हिरावून घेतलें. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाही; व ती भगवंताला कळली तेव्हां त्यानें उपनंदाचा निषेध करून नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु स्वत: दुसर्‍या भिक्षूला चीवर देऊन व नंतर रागावून हिरावून घेईल, किंवा हिरावून घेण्यास लावील. त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।२५।।