७५. बुद्ध भगवान् श्रवस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्यावेळीं उदायी भिक्षु चीवर शिवण्यांत प्रख्यांत होता. एका भिक्षुणीनें चीवर शिवून देण्यास त्याला विनंती केली. त्यानें चीवर फार चांगलें तयार केलें, पण त्यावर एक बीभत्स चित्र काढलें; व त्या भिक्षुणीला सांगितलें कीं, ह्या चीवराची घडी न मोडतां तें तसेंच ठेवून दे, आणि जेव्हां भिक्षुणीसंघ उपदेश ऐकण्यास जाईल त्या वेळीं तें पांघरून सर्वांमागून जा. त्या भिक्षुणीनें तसें केलें. अर्थात तें बीभत्स चित्र तिला किंवा इतर भिक्षुणींना दिसलें नाही. पण वाटेंत लोक तें चित्र पाहून भिक्षुणींची निंदा करूं लागले. पुढें ही बातमी भगवंताला समजली, तेव्हां त्यानें उदायीचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-
जो भिक्षु अज्ञाति भिक्षुणीचें चीवर शिवील किंवा शिववील, त्याला पाचित्तिय होतें ।।२६।।
७६. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु बेत ठरवून भिक्षुणींबरोबर प्रवास करीत असत... ह्या बाबतींत भगवंतानें नियम केला तो असा:-
“जो भिक्षु बेत ठरवून भिक्षुणीबरोबर एका मार्गानें प्रवास करील-केवळ एका गांवांतून दुसर्या गांवांत देखील जाईल-त्याला पाचित्तिय होतें.”
एके समयीं कांहीं भिक्षु व भिक्षुणी साकेताहून श्रावस्तीला येत होत्या. त्या भिक्षुणींनीं भिक्षूंबरोबर प्रवास करण्याचा आपला विचार दर्शविला. पण वरील नियमांमुळें भिक्षूंना त्यांना तसें करूं देतां आलें नाहीं. ते म्हणाले, “आपणांला एकत्र प्रवास करतां येत नाहीं. तुम्ही पुढें व्हा. आम्ही मागाहून येऊं.” भिक्षुणी म्हणाल्या, “भिक्षूंचा मान प्रथम. तेव्हां तुम्हीच पुढें जा. आम्ही मागाहून येतों.” भिक्षु पुढें गेले, व भिक्षुणी मागाहून येत असतां त्यांना चोरांनीं गाठलें, त्यांचीं चीवरें हिरावून घेतलीं, व त्यांवर बलात्कार केला. हें वर्तमान भगवंताला समजलें, तेव्हां त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-
जो भिक्षु प्रसंगावांचून बेत ठरवून भिक्षुणीबरोबर एका मार्गानें प्रवास करील-केवळ एका गांवांतून दुसर्या गांवांत देखील जाईल-त्याला पाचित्तिय होतें. ज्या मार्गांत कारवानाबरोबर प्रवास करावयाचा असतो, व जेथें चोरांचें वगैरे भय असतें. हा ह्या बाबतींत प्रसंग जाणावा ।।२७।।
७७. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या वेळीं षड्वर्गीय भिक्षु बेत ठरवून भिक्षुणींबरोबर होडींतून प्रवास करीत असत. लोक म्हणूं लागलें कीं, आम्ही जसे आपल्या बायकांना घेऊन नावेंत बसून क्रीडा करतों तसे हे शाक्यपुत्रीय श्रमण भिक्षुणींबरोबर नावेंत क्रीडा करीत असतात. ....या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-
“जो भिक्षु बेत ठरवून नदीच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला जाणार्या नावेंत भिक्षुणीबरोबर बसेल, त्याला पाचित्तिय होतें.”
त्या काळीं कांही भिक्षु आणि भिक्षुणी साकेताहून श्रावस्तीला येत होत्या. वाटेंत एक नदी होती. तेथें भिक्षु त्यांना म्हणाले, “तुम्ही पुढें जा. आम्ही मागून येतों.” भिक्षुणींनीं भिक्षूंसच पुढें जाण्यास सांगितलें. ते नदीपार गेले असतां चोरांनीं भिक्षुणींचीं चीवरें हिरावून घेतलीं, व त्यांवर बलात्कार केला. हें वर्तमान समजलें तेव्हां, भिक्षूंनीं व भिक्षुणींनीं नदीपार जाणार्या नावेंत एकत्र बसावें, अशी अनुज्ञा देऊन भगवंतानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-
जो भिक्षु बेत ठरवून नदीपार जाणार्यां नावेशिवाय नदीच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला जाणार्या नावेंत भिक्षुणीबरोबर बसेल, त्याला पाचित्तिय होतें ।।२८।।
७८. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं थुल्लनंदा भिक्षुणी एका कुटुंबांत जात येत असे. त्या कुटुंबांत एके दिवशीं सारिपुत्त, महामोग्गलान वगैरे महास्थविरांना आमंत्रण होतें. हें वर्तमान जेव्हां थुल्लनंदा भिक्षुणीला समजलें तेव्हां ती त्या गृहस्थाला म्हणाली, “तूं देवदत्तासारख्या थोर भिक्षूंना आमंत्रण न करितां ह्यांना आमंत्रण केलें हें कसे? भिक्षुणींकडून लोकांस सांगून देवदत्त भिक्षा मिळवितो, ही गोष्ट जेव्हां प्रसिद्धीला आली, तेव्हां भगवंतानें त्याचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-
“जो भिक्षु जाणूनबुजून भिक्षुणीच्या सांगण्यावरून मिळालेलें भिक्षान्न खाईल, त्याला पाचित्तिय होतें.”
त्या काळीं एक भिक्षु आपल्या नातलगांच्या घरीं गेला. पु्ष्कळ वर्षांनीं तो आला असल्यामुळें नातलगांनीं त्याच्यासाठीं चांगलें जेवण तयार केलें. त्या कुटुंबांत येणारीजाणारी भिक्षुणी म्हणाली, “ठीक! ह्या आर्याला तुम्ही जेवण द्या.” त्या भिक्षुला भिक्षुणीच्या सांगण्यावरून आपणाला हें जेवण मिळत आहे अशी शंका आली, व त्यानें तें अन्न ग्रहण केलें नाहीं. त्या दिवशीं भिक्षाटणाची वेळहि निघून गेल्यामुळें त्याला उपवास करावा लागला. ही गोष्ट समजल्यावर भगवान् भिक्षूंना म्हणाला, “गृहस्थांनीं तयारी केली असतां भिक्षुणीच्या सांगण्यावरून अन्न मिळालें तरी तें स्वीकारण्यास मी परवानगी देतों.” आणि त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-
जो जाणूनबुजून-पूर्वीच गृहस्थाची तयारी असल्याशिवाय-भिक्षुणीच्या सांगण्यावरून मिळालेलें भिक्षान्न खाईल, त्याला पाचित्तिय होतें ।।२९।।