बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग २ रा 31

७९. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं आयुष्मान् उदायीची गृहस्थाश्रमांतील बायको भिक्षुणी झाली होती. उदायी एके दिवशीं एकटाच तिच्याशीं गोष्टी बोलत बसला. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं, आणि भगवंतानें उदायीचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु एकटा एकट्या भिक्षुणीबरोबर एकान्तांत बसेल, त्याला पाचित्तिय होतें ।।३०।।

८०. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं श्रावस्तीपासून कांही अंतरावर एका पूगानें श्रमणांना भिक्षान्न देण्याचा परिपाठ सुरू ठेवला होता (त्याला आवसथपिंड असें म्हणत). षड्वर्गीय भिक्षु श्रावस्तींत भिक्षाटनाला गेले असतां तेथें त्यांना कांहीं मिळालें नाहीं. तेव्हां ते त्या पूगाच्या आवस्थाकडे गेले. त्यांचा तेथें चांगला मान ठेवण्यांत आला. तेव्हां षड्वर्गीय भिक्षु नित्य तेथेंच जेवावयाला जाऊं लागले. पुढें त्यांनीं असा विचार केला कीं, आरामांत जाऊन तरी काय कारावयाचें? पुन्हां दुसरे दिवशीं येथें यावयाचेंच आहे. तेव्हां आपण वस्तीला येथेंच राहूं. ह्याप्रमाणें विचार करून ते तेथेंच राहिले. त्यांना पाहून दुसर्‍या पंथांचे श्रमण तिकडे येत नसत. लोक म्हणाले, “हे शाक्यपुत्रीय श्रमण येथेंच बिर्‍हाड ठोकून आवसथपिंड खात रहातात हें कसें? आवसथपिंड केवळ ह्यांच्यासाठीं नसून सर्वपंथांच्या श्रमणासाठीं आहे.” ही गोष्ट अनुक्रमें भगवंताला समजली. त्यानें षड्वर्गियांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

“एकच दिवस आवसथपिंड ग्रहण करावा. त्यापेक्षां जास्त दिवस ग्रहण करील, त्याला पाचित्तिय होतें.”

त्या काळीं आयुष्मान् सारिपुत्त कोसल देशांत प्रवास करीत असतां एका आवसथांत आला. पुष्कळ काळानें स्थविर आला आहे असें म्हणून तेथल्या लोकांनीं त्याचा फार आदर केला. त्याच दिवशीं संध्याकाळीं तो आजारी पडला, व त्या आवसथांतून दुसर्‍या ठिकाणीं जाऊं शकला नाहीं. दुसर्‍या दिवशीं त्याच्यासाठीं लोकांनीं जेवण केलें. परंतु भगवंतानें एक दिवसापेक्षां जास्त दिवस आवसथपिंड स्वीकारण्याची मनाई केली आहे म्हणून सारिपुत्तानें तें स्वीकारलें नाहीं. पुढें ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हा त्यानें आजारी भिक्षूला एकाहून जास्त दिवस आवसथांत राहून भिक्षा ग्रहण करण्यास परवानगी दिली, व वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

निरोगी भिक्षूनें एकच दिवस आवसथपिंड ग्रहण करावा. त्यापेक्षां जास्त दिवस ग्रहण करील, त्याला पाचित्तिय होतें ।।३१।।

८१. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं लोकांकडून कांहीं मिळत नसल्यामुळें देवदत्त घरोघरीं स्वतां सांगून आपल्या साथ्यांना व आपणाला भिक्षा देण्यास लावीत असे. लोक त्यावर टीका करूं लागले; व भगवंतानें त्याचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

“गणासह१. (१- गण म्हणजे चार किंवा त्यांहून जास्त भिक्षूंचा समुदाय. अशा समुदायानें एका दिवशीं एकाच ठिकाणीं भोजन करणें योग्य नाहीं, असा ह्या नियमाचा अर्थ आहे) भिक्षा स्वीकारली असतां पाचित्तिय होतें.”

ह्या नियमांत भगवंतानें निरनिराळ्या प्रसंगीं फेरफार केला. त्याचा संग्रह खालील नियमांत केला आहे.

प्रसंगावांचून गणासह भिक्षा स्वीकारली असतां पाचित्तिय होतें. भिक्षु आजारी असणें, चीवर करण्याची वेळ असणें, प्रवासाला जाण्याची वेळ असणें, नावेंतून प्रवास करण्याची वेळ असणें, किंवा भिक्षूंचा मोठा समुदाय असणें, हा ह्या बाबतींत प्रसंग जाणावा ।।३२।।