व्याख्या
अधिकरणसमय म्हणजे खटल्याचा निकाल लावून तो मिटविणें.
१. सन्मुखविनय:- कोणत्याहि भिक्षूंने अपराध केला असतां व त्याच्यावर दुसर्या भिक्षूंने आरोप आणला असतां, त्याची चौकशी संघासमोर करावी. संघासमोर चौकशी करून खटला मिटविवणें, याला सन्मुखाविनय देणें असें म्हणतात.
२. स्मृतिविनय:- हा सामान्य भिक्षूला देतां येत नाहीं. अरहंतासारख्या अत्यंत सदाचरणी भिक्षूला देतां येतो. त्याच्यावर जर एखाद्या भिक्षूनें भलताच आळ आणला, व त्यानें, तो आळ खोटा आहे असें संघाला समजावून सांगितलें, तर अशा प्रसंगीं संघ त्याची स्मृति (आठवण) योग्य ठरवून त्याला स्मृतिविनय देतो. नंतर पुन्हां असा आळ आणण्यांत आला तर ती वृथा बडबड आहे. असें समजण्यांत येतें.
३. अमूढविनय:- एकाद्या भिक्षूला वेड लागलें असतां त्याच्या हातून पुष्कळ दोष घडतात, व तो बरा झाल्यावर चौकशी केली असतां आपणाला कांहींच आठवत नाहीं किंवा स्वप्नासारखें कांहीं आठवतें असें जर म्हणूं लागला, तर उन्मत्तावस्थेंत घडलेल्या त्याच्या दोषांची संघाकडून त्याला माफी मिळते, व त्या दिवसापासून तो बरा झाला, असें गृहीत धरण्यांत येतें. याला अमूढविनय देणें असें म्हणातात.
४. प्रतिज्ञातकरण:- कोणत्याहि भिक्षूवर तो हजर असल्याशिवाय आरोप करावयाचा नाहीं;
व त्यानें तो आरोप कबूल केला तर तेवढ्यानेंच हा खटला मिटवावयाचा, ह्याला प्रतिज्ञाकरण म्हणतात.
५. बहुतमतानें निकाल:- कोणत्याहि प्रकरणाचा सामोपचारानें निकाल लागत नसला, तर तो बहुमतानें करण्यांत येतो. अशा प्रसंगीं सर्व भिक्षूंच्या संमतीनें एक अत्यंत गुणज्ञ भिक्षु मतग्राहक (सलाकागाहापक) निवडण्यांत येतो. व तो सर्वांचीं मतें घेऊन१ बहुमताचा विचार करून योग्य निकाल देतो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- तांबड्या, पांढर्या वगैरे रंगाच्या काड्या मतदारांकडे देऊन त्यांनीं परत केलेल्या काड्यांवरून बहुमत ठरविण्याची वहिवाट असे. ह्या काड्यांना शलाका (सलाका) म्हणत.

६. ज्याचें पाप त्याला:- एकादा भिक्षु क्षणांत दोष कबूल करतो, क्षणांत नाकबूल करतों. अशा प्रसंगीं त्याचा पक्षपात किंवा विरोध न करतां सर्व संघ तो ताळ्यावर येईपर्यंत त्याला बहिष्कृत करतो. ह्या विधीला ज्याचें पाप त्याला (तस्सपापिय्यसिका) विधि म्हणतात.
७. तृणावस्तारविधि:- संघांत तट पडून लहानसहान कारणासाठीं जेव्हां भांडणें होतात, तेव्हां दोन्ही तटांत शांतता स्थापित करण्यासाठीं हा विधि करण्यांत येतो. घाणेरडी जमीन जशी आपण गवतानें झांकतों, त्याप्रमाणें भिक्षूंच्या हातून झालेल्या लहानसहान चुका ह्या विधीनें झांकण्यांत येतात. म्हणून ह्याला तृणावस्तारविधि म्हणतात.
हे विधि कोणकोणत्या प्रसंगीं करावे ह्याचा विस्तार चुल्लुवग्गाच्या चौथ्या खंधकांत केला आहे. अर्थात ह्याचा संग्रह पहिल्या भागांत व्हावयास पाहिजे होता. पण तसें केलें असतां तेथें फार विस्तार करावा लागला असता, व पुन्हां येथें ह्या नियमांची व त्या प्रकरणाची संगति जुळवावी लागली असती. म्हणून विस्तारभयास्तव ह्या नियमांची थोडक्यांत माहिती येथेंच दिली आहे.
पाराजिका, संघादिशेष वगैरे नियम म्हणून झाल्यावर प्रतिमोक्ष म्हणणारा भिक्षु त्या प्रकरणीं संघाचे सभासद शुद्ध आहेत कीं नाहींत, असा त्रिवार प्रश्न करतो व सर्व सभासद मुकाट्यानें राहिले म्हणजे, ते त्या त्या दोषांपासून मुक्त आहेत, असें गृहीत धरतो. सर्व प्रातिमोक्ष (म्हणजे हे २२७ नियम) म्हणून झाल्यावर तो म्हणतो, “बंधुहो, मी प्रातिमोक्षाचें निदान म्हटलें; चार पाराजिका, तेरा संघादिशेष, दोन अनियत, तीस निस्सग्गिय पाचित्तिय, ब्याण्णव पाचित्तिय चार पाटिदेसनिय, सेखिय, सात अधिकरण समथ (हे सर्व नियम) म्हटले. एवढे (नियम) त्या भगवंताच्या सूत्रांत आले असून ते दर पंधरवड्याला म्हटले जात असतात. ह्या बाबतींत सर्वांनीं सामग्रीनें एकीनें मुदितमनानें तंटा बखेडा न करातां वर्तावें.”
यानंतर भिक्षुणीचे नियम यावयास पाहिजे होते. त्यांच्या नियमांत आठ पारजिका, सतरा संघादिशेष, तीस निस्सग्गिय पाचित्तिय, एकशें सासष्ट पाचित्तिय, आठ पाटिदेसनिय आणि पंचाहत्तर सेखिय यांचा समावेश होतो. भिक्षूंच्या नियमांत आणि यांत पुष्कळसें साम्य आहे. पहिल्या चार पाराजिका सारख्याच आहेत. बाकीच्या भिक्षुणीसाठीं अधिक आहेत त्या अशा:- (१) गुडघ्याच्यावर पुरुषानें विकृत मनानें स्पर्श केला आणि तशाच मनानें भिक्षुणीनें स्वीकारला तर तिला पाराजिक आपत्ति होते. (२) दुसर्या भिक्षुणीनें पाराजिका आपत्ति केली असतां व ती माहीत असतां लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणार्या भिक्षुणीलाहि पाराजिका आपत्ति होते. (३) संघानें बहिष्कृत केलेल्या भिक्षूंचा पक्ष घेणार्या भिक्षुणीला तीनदां तसें न करण्यास सांगावे. असे असतांहि त्याचा पक्ष सोडला नाहीं तर तिला पाराजिका आपत्ति होते. (४) जी भिक्षुणी बेत ठरवून पुरुषांशीं एकान्त करण्याचा प्रयत्न करील तिला पाराजिका आपत्ति होते.१ याचप्रमाणें इतर नियमांतहि बरेच फेरफार आहेत. त्यांवरून असें दिसून येतें कीं, भिक्षुणीचे नियम अतिशय कडक करण्याचा भिक्षूंकडून बराच प्रयत्न झाला असावा. या सर्व नियमांचें भाषान्तर आणि पूर्वपीठिका देऊन वाचकांना कंटाळा आणण्याची माझी इच्छा नाहीं.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- हें भाषान्तर नाहीं. केवळ या चार नियमांचा सारांश आहे.

समाप्त