बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 2

ह्यावरून असें सिद्ध होतें कीं, व्यवहारांत जरी भिक्षुभिक्षुणींना उपासक-उपासिका नमस्कारादिकेंकरून मान देत असत, तरी वाङ्‌मयाच्या ज्ञानांत आणि धर्माचरणांत सर्वांना सारखेंच मानण्यांत येत असे. आतां या एतदग्ग प्रकरणांत ७५ व्यक्तींचा उल्लेख आला असतां त्यांना ८० महाश्रावक म्हणता येईल कीं काय, हा प्रश्न राहिला. त्याचें सरळपणें उत्तर देतां येणें कठीण आहे. ज्या अर्थी पालि वाङ्‌मयांत ८० महाश्रावकांची यादी कोठेंच सांपडत नाहीं. त्या अर्थी त्यांचा संबंध ह्या एकदग्ग प्रकरणाकडे लावल्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाहीं. जु'न्या टीकाकारांना अनुसरून मध्यमपदलोपी समास करून कसातरी अर्थ लावणें भाग आहे. ‘असीति महासावका’ येथें ‘असीतिया सुत्तेहि वण्णिता महासावका’ असा पदच्छेद केला तर कदाचित् ह्याचा अर्थ लागेल. ८० सुत्तें पाहून त्यांतील व्यक्तींची गणना न करतां ‘असीति महासावका’ म्हणण्याचा प्रघात पडला असावा, हेंहि संभवनीय आहे. कांहीं असो, ज्या अर्थी एतदग्ग प्रकरणाशिवाय दुसरी अत्यंत प्राचीन अशी महाश्रावकांची यादी उपलब्ध नाही, त्या अर्थी त्या प्रकरणांत आलेल्या व्यक्तींचीं चरित्रें-अंगुत्तरनिकायअद्वकथेच्या (मनोरथपूरणीच्या) आधारें, आणि जेथें शक्य असेल तेथें सुत्त आणि विनय पिटकाच्या आधारें- ‘महाश्रावकांचा परिचय’ ह्या सदराखालीं थोडक्यात देत आहें.

एतदग्ग प्रकरणांत ज्या ज्या व्यक्तींसंबंधानें जें जें सुत् आहे, त्या त्या सुत्ताचें भाषांतर त्या त्या व्यक्तीच्या  चरित्राच्या आरंभीं अवतरणांत दिलें आहे.


अज्ञात कौण्डिन्य१

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- ह्याला त्रिपिटकांत ‘अञ्ञा कोण्डञ्ञ’ असें म्हटलें आहे व ललितविस्ताराच्या आरंभी ‘ज्ञान कौण्डिन्य’ म्हटलें आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“भिक्षुहो, दीर्घकाल संघांत रहाणार्‍या माझ्या भिक्षुश्रावकांत कौण्डिन्य पहिला आहे.”

बोधिसत्त्व जन्मल्यावर ज्या आठ ब्राह्मणांनीं त्याचें भविष्यकथन केलें, त्या सर्वांत हा अत्यंत तरुण होता. कौडिन्य हें त्याचें गोत्र व सुदत्त हें नांव, असें जातकअट्ठकथाराचें म्हणणें आहे. इतर ब्राह्मणांनीं बोधिसत्त्वाचें भविष्य द्विधा कथन केलें-जर तो गृहस्थाश्रमांत राहिला, तर चक्रवर्ती होईल;  संन्यासी झाला तर बुद्ध होईल. पण कौण्डिन्यानें त्याचीं लक्षणें पाहून तो खात्रीनें बु्द्ध होणार असें सांगितलें. त्यान पण कौण्डिन्यानें त्यां लक्षणे तो खात्रीनें बुद्ध होणार असें सांगितलें. बोधिसत्त्वानें गृहत्याग केला त्या वेळीं कौण्डिन्याचे साथीदर हयात नव्हते. तेव्हां तो त्यांच्या मुलांना म्हणाला, “गौतमानें गृहत्याग केला असून तो खात्रीनें बुद्ध होणार आहे, तर आपणहि प्रव्रज्या घेऊन त्याच्या धर्मामृताचा लाभ करून घेऊं.” त्या सात ब्राह्मणांच्या मुलांपैकीं चौघांनी कौण्डिन्याबरोबर प्रव्रज्या घेतली,- व हे पांच जण ‘पंचवर्गीय भिक्षु’ ह्या नावांनें प्रसिद्धीला आले. उरुवेला प्रदेशांत बोधिसत्त्वानें घोरतम तपस्या आरंभली, त्या वेळीं हे त्याची सेवा करीत असत. पण बोधिसत्त्वानें देहदंडनाची निष्फलता जाणून परिमित आहार ग्रहण करण्यास सुरवात केल्याबरोबर, तो पतित झाला असें वाटून ह्यांनीं त्याला सोडून दिलें; व ते वाराणसीला गेले. पुढें बुद्धाला बोधिवृक्षाखालीं धर्मज्ञान झालें. तेव्हां त्यानें आळार कालाम व उद्रक रामपुत्र ह्या आपल्या दोन बोधिसत्त्वावस्थेंतील गुरूंना प्रथम धर्मोपदेश करण्याचा विचार मनांत आणला. पण ते दोघेहि नुकतेच निवर्तले होते. तेव्हां त्यानें ह्या पंचवर्गीय भिक्षूंस प्रथमत: उपदेश करावा, असा बेत केला, व उरुवेलेहून प्रवास करीत करीत आषाढ पौर्णिमेच्या सुमारास तो वाराणसीला ऋषिपत्तनांत-जेथें पंचवर्गीय भिक्षु रहात होते तेथें-आला.

त्याला पाहून पंचवर्गीय भिक्षु परस्परांला म्हणाले, “हा ढोंगी श्रमण येत आहे, हा पतित गौतम येत आहे; त्याचा कोणत्याहि प्रकारें आदरसत्कार करतां कामा नये. एक तेवढें आसन येथें मांडावें. त्याची इच्छा असेल तर बसेल, नाहीं तर नाहीं!” परंतु जसजसा बुद्ध जवळ येत गेला, तसतसा पंचवर्गीयांचा बेत ढांसळत गेला. एकानें आसन मांडलें, तर दुसर्‍यानें पाय धुण्यास पाणी तयार केलें, आणि बाकीच्यांनीं भिक्षापात्र व चीवर घेऊन बुद्धाचा सन्मान केला. आपणाला धर्मज्ञानाचा साक्षात्कार झाल्याचें वर्तमान भगवंतानें त्यांस सांगितलें. पण आरंभीं त्यांचा विश्वास बसेना. शेवटीं आषाढ पौर्णिमेच्या दिवशीं भगवंतानें त्यांना पहिला धर्मोपदेश केला. तो ह्या पंचवर्गीयांत प्रथमत: कौण्डिन्याला पटला. तेव्हां बुद्ध उदारला, “कौण्डिन्यानें जाणलें (अञ्ञास वत भो कोण्डञ्ञो, अञ्ञासि वत भो कोण्डञ्ञो).” तेव्हांपासून त्याला ‘आज्ञात कौण्डन्य’ असें नांव पडलें.