बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 7

महानामानें ही गोष्ट कबूल केली, व धाकट्या भावाला प्रपंचाची माहिती करून देऊं लागला. शेत नांगरावें कसें, पेरावें कसें, त्याला पाणी कसें द्यावें लागतें, त्याची कापणी कशी करतात इत्यादि माहिती करून देत असतां अनुरुद्ध म्हणाला, “ही खटपट फारच मोठी दिसते. तेव्हां घरचा व्यवहार तुम्हीच संभाळा. मी भिक्षु होतों.”  पण ह्या कामीं त्याला आपल्या आईची संमति मिळेना, व तो हट्ट धरून बसला. तेव्हां ती म्हणाली, “शाक्यांचा राजा भद्दिय जर तुझ्याबरोबर भिक्षु होत असेल तर मी तुला भिक्षु होण्यास परवानगी देतें.”

भद्दिय अनुरुद्धाचा मित्र होता, व तो राज्यपद सोडून भिक्षु होण्यास तयार होणार नाहीं, असें अनरुद्धाच्या आईला वाटत होतें. पण अनुरुद्ध त्याच्या जवळ जाऊन त्यालाही भिक्षु होण्याचा आग्रह धरून बसला. भद्दिय म्हणाला, “तूं सात वर्षें थांब. नंतर आपण दोघेहि भिक्षु होऊं.” पण इतकीं वर्षें अनुरुद्ध थांबतो कसला? सहा वर्षें, पांच वर्षे, चार, तीन, दोन, एक वर्ष, सात महिने, असें करतां करतां भद्दिय सात दिवसांनीं अनुरुद्धाबरोबर जाण्यास कबूल झाला. एका आठवड्यानंतर भद्दिय, अनुरुद्ध, आनंद, भृगु, किम्बिल आणि देवदत्त हे सहा शाक्यपुत्र आणि त्यांच्या बरोबर उपालि नांवाचा न्हावी असे सात असामी चतुरंगिनी सेना सज्ज करून कपिलवस्तूपासून सेनेबरोबर दूर अंतरावर गेले, व तेथून सैन्य मागें फिरवून त्यांनीं शाक्य देशाची सीमा उल्लंघन केली. शाक्यकुमारांनीं आपल्या अंगावरचे दागिने काढून एका उपरण्यांत बांधले, व ते उपालीला म्हणाले, “हे अलंकार घेऊन तूं घरीं जा. हें द्रव्य तुझ्या निर्वाहाला पुरे आहे.”  ते गांठोडें घेऊन माघारें चालला असतां उपालीच्या मनांत असा विचार आला कीं, शाक्य क्षात्रिय मोठे तापट आहेत. ‘ह्यानें आमच्या कुमारांना पळवून नेलें,’ असें म्हणून माझा शिरच्छेद करण्यास ते कमी करावयाचे नाहींत. हे एवढे मोठे शाक्यकुमार गृहत्याग करून भिक्षु होत आहेत. मग मला घरांत राहून काय करावयाचें? त्यानें अशा विचारानें तें गांठोडें एका झाडाला टांगलें, व तो शाक्यकुमारांच्या मागोमाग जाऊं लागला. ‘तूं पुन्हां कां आलास?’ असा त्यांनीं प्रश्न केला तेव्हां उपालीनें आपल्या मनांतील विचार त्यांना कळविला.

त्या काळीं बुद्ध भगवान् अनुप्रिय नांवाच्या मल्लांच्या १  गांवी रहात होता. हे सहा शाक्यकुमार उपालीसह तेथें आले, व भगवंताला नमस्कार करून म्हणाले, “भगवन् आम्ही शाक्य मोठे मानी आहोंत. तेव्हां आपण ह्या आमच्या उपालि न्हाव्याला प्रथम उपसंपदा द्या, म्हणजे ह्याला नमस्कार व ह्याची सेवा करावी लागल्यामुळें आमचा शाक्यकुलाभिमान नष्ट होईल.”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- वज्जींप्रमाणें ह्याचेंहि राज्य गणसत्ताक होतें.
------------------------------------------------------------------------------------------------------------
त्यांच्या विनंतीप्रमाणें भगवंतानें प्रथम उपालीला, आणि नंतर त्या सहा शाक्यपुत्रांना प्रव्रज्या दिली. त्या वर्षाकाळीं अनुरुद्धानें ध्यानसमाधीचा अभ्यास करून दिव्यचक्षुज्ञान प्राप्त करून घेतलें.

भगवंताच्या परिनिर्वाणसमयीं अनुरुद्ध जवळ होता, भगवान् कोणकोणत्या व्यानांतून परिनिर्वाणाला गेला, हें त्यानें अंतर्ज्ञानानें जाणलें, अशा अर्थाचा उल्लेख महापरिनिर्वाण सूत्रांत आहे.