बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग ३ रा 11

कांहीं दिवसांनीं भारद्वाज पुन्हां त्या उद्यानांत येऊन एका झाडाखालीं बसला. आपणाला वक्षीस मिळण्याची ही चांगली संधि आहे असें जाणून उद्यानपाळानें धांवत जाऊन राजाला वर्दीं दिली. तेव्हां बरोबर वाद्यें वगैरे न घेतां निवडक मंत्री घेऊन उदयन राजा तेथें आला. त्याचा भारद्वाजाबरोबर संवाद १  झाला तो असा :-
-----------------------------------------------------------------------------------------------------
१ हा संवाद मूळ सुत्तांतच आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
राजा म्हणाला, “भो भारद्वाज, कांहीं भिक्षु तरुण असतां आमरण ब्रह्मचर्य पाळतात, हें कसें?”

भारद्वाज :-  महाराज, भगवंतानें म्हटलें आहे कीं, भिक्षुहो, ज्या स्त्रिया तुमच्या आईच्या वयाच्या असतील, त्यांना तुम्ही आई माना; ज्या बहिणीच्या वयाच्या असतील त्यांना बहिणी माना; आणि ज्या मुलीच्या वयाच्या असतील त्यांना मुली माना.

राजा :- पण, भो भारद्वाज, चित्त मोठे चंचल आहे. आईच्या वयाच्या, बहिणीच्या वयाच्या किंवा मुलीच्या वयाच्या स्त्रियांविषयींहि त्यांत कामविकार उत्पन्न होत असतात. तेव्हां त्याच्या दमनाला दुसरा कांहीं उपाय आहे काय, कीं, ज्याच्यामुळें तरुण भिक्षु आमरण ब्रह्मचर्य पाळूं शकतात?

भारद्वाज :- महाराज, भगवंतानें म्हटलें आहे कीं, पायाच्या तळव्यापासून वर डोक्याच्या केसांखालीं त्वचेनें आच्छादलेल्या व अशुचि पदार्थांनीं भरलेल्या ह्या देहाचें तुम्ही नीट निरीक्षण करा; ह्या देहांत केंस, लोभ, नखें, दांत, चामडी, मांस, स्नायु, हाडें, अस्थिमज्जा, वृक्क, हृदय, यकृत्, ल्कोम, प्लीहा, फुप्फुस, आंतडें, आंतड्याच्या भोंवतालची दोरी, औदर्य [कोठ्यांतील पदार्थ], विष्ठा, पित्त, श्लेष्म, पू, रक्त, स्वेद, मेद, अश्रु, वसा, थुंकी, नाकांतील मळ, लसिका १, मूत्र हे पदार्थ आहेत. महाराज, ह्या भावनेमुळें, ह्या कारणास्तव तरुण भिक्षु आमरण ब्रह्मचर्य पाळतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------
१- लसिका म्हणजे अवयवांच्या संधीमध्यें असलेला ‘स्नेहमय पदार्थ,’ असें बुद्धघोषाचार्याचें म्हणणें आहे. संस्कृत अर्थ ‘लाळ’ असा आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
राजाः- भो भारद्वाज, ज्या भिक्षूंनीं अशा रितींने देहाची भावना, शीलाची भावना, समाधीची भावना, प्रज्ञेची भावना केली असेल, त्यांना [ब्रह्मचर्य पाळणें] हें काम सुकर आहे. परंतु ज्यांनीं अशा प्रकारें भावना केली नसेल त्यांना हें कठीण जाईल. कारण कधीं कधीं अशुचि दृष्टीनें देहाकडे पहाण्याचा प्रयत्‍न केला तरी सौंदर्य दिसून २ येतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------
२- कामासक्ति बळकट असली व इच्छाशक्ति दुर्बळ असली म्हणजे स्वत:च्या शरीरांतील अशुभ पदार्थांचें ध्यान करीत असतां स्त्रीला पुरुषाची व पुरुषाला स्त्रीची आठवण होऊन त्या त्या पदार्थांचें सौंदर्यच दिसून येतें, व त्यामुळें असा प्रकार घडतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------