बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 14

सारिपुत्तानें पुण्णाचें नांव विचारिलें, व तें त्यानें सांगितल्यावर तो म्हणाला, “फार चांगलें! फार चांगलें! भगवंताच्या विद्वान् श्रावकानें जशीं प्रश्नांचीं उत्तरें द्यावीं, तशीं तुम्हीं दिलीं आहेत. तुमच्यासारखा सहब्रम्हचारी ज्यांना मिळाला, ते मोठे भाग्यवान होत. तुमच्यासारख्याला डोक्यावर घेऊन फिरलें असतांहि सहब्रह्मचार्‍यांचा फायदा आहे. तुमचें दर्शन झाल्यानें मीहि स्वतःला भाग्यवान् समजतों.”

पुण्णानें सारिपुत्ताचें नांव विचारलें, व तें समजल्यावर तो म्हणाला, “बुद्ध गुरूच्या योग्यतेच्या श्रावकाबरोबर माझा संवाद झाला, ह्याची मला कल्पना नाहीं. मला हें समजलें असतें, तर अशा रितीनें प्रश्नांचीं उत्तरेंहि देतां आली नसतीं... तुमच्या दर्शनानें मी स्वतःला मोठा भाग्यवान् समजतो.”

ह्याप्रमाणें त्या महानागांनीं (थोर अर्हंतांनीं) परस्परांचें अभिनंदन केलें. १ ( १ हा रथविनीतसुत्ताचा सारांश आहे.)

१०
महाकात्यायन

“संक्षिप्त उपदेशाचा विस्तारानें अर्थ करणार्‍या माझ्या भिक्षुश्रावकांत महाकात्यायन श्रेष्ठ आहे.”

हा उज्जयनीच्या चंडप्रद्योत राजाच्या पुरोहिताचा मुलगा. सोन्यासारखी त्याची कांति होती म्हणून त्याचें नांव कांचन ठेवलें होतें. पण तो कात्यायन ह्या गोत्रनांवानें प्रसिद्धीला आला. वेदवेदांगांत पारंगत झाल्यामुळें पित्याच्या मरणानंतर तरुणपणींच त्याला पुरोहितस्थान मिळालें. त्याच वेळीं बुद्धाची कीर्तीं सर्वत्र फैलावत चालली होती. चंडप्रद्योत बुद्धदर्शनाला अत्यंत उत्सुक होता; परंतु आपल्या राज्यमर्यादेबाहेर जाणें त्याला शक्य नव्हतें. शेवटीं सर्वानुमतें कात्यायन पुरोहिताला पाठवून बुद्धाला उज्जयनीला आणावें, असा बेत ठरला. ‘आपणाला प्रव्रज्या घेण्यास परवानगी देत असाल, तरच आपण जाईन,’ असें कात्यायनाचें म्हणणें पडलें, व राजाला तें कबूल करावें लागलें. तेव्हां, बुद्धदर्शनाला जातांनां मोठ्या परिवाराची आवश्यकता नाहीं, असें म्हणून निवडक सात असामी बरोबर घेऊन महाकात्यायन बुद्धापाशीं आला, व भगवंताचा धर्मोपदेश श्रवण करून त्या सात असामींसह अर्हतपदाला पावला.

निर्वाणप्राप्ति झाल्यावर महाकात्यायन, उज्जयनीला जाणें चांगलें, असें भगवंताला सांगूं लागला. कात्यायन आपल्या जन्मभूमीला तथागतानें जावें अशी इच्छा बाळगीत आहे, हें भगवंतानें जाणलें; तरी कांहीं कारणास्तव स्वतः तिकडे जाणें त्याला योग्य वाटलें नाहीं, व कात्यायनास त्यानें तिकडे जाण्यास परवानगी दिली. बुद्धाचा शब्द बदलणें शक्य नाहीं, हें कात्यायनाला माहीत असल्यामुळें जास्ती आग्रह न करतां आपल्या सात साथीदारांना घेऊन तो उज्जयनीस जाण्यास निघाला. वाटेंत ‘तेलप्पनाळि’ नांवाचें एक लहानसें शहर होतें. तेथें ह्या भिक्षूंना मुळींच भिक्षा मिळाली नाहीं. हें वर्तमान एका व्यापार्‍याच्या गरीब मुलीला समजलें, व तिनें आपले केंस विकून त्या द्रव्यानें अन्न तयार करवून कात्यायनादिकांला भिक्षा दिली.