बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 28

त्याच वेळीं मिगव नांवाच्या उद्यानपालाला कौरव्य राजानें उद्यान साफ करायवयास हुकूम केला. त्यानें राजाला वर्दी दिली कीं, ‘उद्यानांत कांही भय नाहीं. तेवढा राष्ट्रपाल - ज्याची आपण वारंवार स्तुति करतां - एका झाडाखालीं बसला आहे’ तें ऐकून कौरव्यराजानें उद्यानक्रीडेचा नाद सोडून दिला, व मोठ्या परिवारासह तो राष्ट्रपालाच्या दर्शनाला आला. कुशलप्रश्नादि विचारून झाल्यावर त्यानें राष्ट्रपालाला तेथें पसरलेल्या गालिचावर बसण्यास विनंति केली. पण राष्ट्रपाल आपल्या आसनावरून उठला नाहीं. त्यानें राजालाच त्या गालिचावर बसण्यास सांगितलें.

राजा खालीं बसला व राष्ट्रपालाला म्हणाला, “जराव्यसन, व्याधिव्यसन, भोगव्यसन व ज्ञातिव्यसन, ह्या चार व्यवसनांमुळें लोक प्रव्रज्या घेत असतात. कोणी म्हातारा झालेला असतो, व आतां आपल्या हातून दुसरें कांहीं होणें नाहीं, असें म्हणून प्रव्रज्या घेतो. कोणी जन्माचा व्याधिग्रस्त असतो, व प्रपंच नकोसा होऊन संन्यासी होतो. कोणाची एकाएकीं सर्व संपत्ति नष्ट होते, व ह्या भोगव्यसनामुळें तो संन्यासी होतो. कोणाचे सखेसोयरे अकस्मात् मरण पावतात, व ह्या ज्ञातिव्यसनामुळें तो भिक्षु होतो. पण ह्या चारहि व्यवसनांपासून तुम्ही मोकळे आहां. असें असतां ह्या वयांत भिक्षु झालांत, याचें कारण काय?”

राष्ट्र० :-  महाराज, त्या सम्यक्संबुद्धानें ज्या चार गोष्टी सांगितल्या आहेत, त्या ऐकून, पाहून आणि जाणून मी भिक्षु झालों आहें. (१) जीवलोक हांकला जात आहे, त्याला थारा नाहीं; (२) त्याचें रक्षण करणारा कोणी नाही, त्याला सुरक्षित जागा नाहीं; (३) त्याचें स्वकीय असें कांहीं नाहीं, सगळें सोडून त्याला गेलें पाहिजे; (४) त्याची तृप्ति नाहीं, तृष्णेचा तो दास आहे. ह्या त्या चार गोष्टी आहेत, ज्या ऐकून, पाहून आणि जाणून मी भिक्षु झालों.

ह्या गोष्टींचा अर्थ राजाला बरोबर समजला नाहीं, व त्याविषयीं त्यानें प्रश्न विचारला. तेव्हां राष्ट्रपाल म्हणाला, “महाराज, वीस पंचवीस वर्षांच्या वयाच्या दरम्यान तुम्हीं जेव्हां शस्त्रास्त्रांत प्राविण्य मिळविलें, तेव्हांच्या आणि आतांच्या तुमच्या परिस्थितींत फरक आहे काय?”

राजा :- भो राष्ट्रपाल, मी काय सांगावें! तेव्हां मी तरुण होतों; माझ्या अंगीं विलक्षण सामर्थ्य होतें. पण आतां ऐशींच्या घरांत मी आहें. एका ठिकाणीं पाऊल टाकावयास जातों तों तें भलत्याच ठिकाणीं पडतें! अशी माझी स्थिति आहे!

राष्ट्र० :- ह्यासाठींच, महाराज, भगवंतानें म्हटले आहे कीं, जीवलोक हांकला जात आहे, त्याला थारा नाहीं.

राजा :- किती उत्तम! भो राष्ट्रपाल, हें त्या भगवंताचें म्हणणें अगदीं सत्य आहे.

राष्ट्र० :- महाराज, तुमच्या अंगीं जडलेला एकादा चिरकालिक रोग आहे काय?

राजा :- होय, मला संधिवाताचा विकार आहे, आणि त्यामुळें मी असा बेहोष होऊन जातों कीं, कधीं कधीं माझा प्राण जातो असें सर्वांना वाटतें.

राष्ट्र० :- अशा वेळीं, महाराज, तुमचे आप्तमित्र तुमचें रक्षण करूं शकतात काय?  ‘चला, आपण सर्व एकत्र होऊन महाराजांचें दुःख वांटून घेऊं व त्यांला सुखी करूं,’ असें ते म्हणूं शकतात काय?

राजा :-  नाहीं, भो राष्ट्रपाल.