बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 31

२३
वंगीस

“प्रतिभाशाली भिक्षुश्रावकांत वंगीस श्रेष्ठ आहे.”

मनोरथपूरणीच्या म्हणण्याप्रमाणें हा श्रावस्ती येथें ब्राह्मणकुळांत जन्मला. बंगीस हें ह्याचें नांव. तरुणपणीं सर्व वेदांत पारंगत होऊन त्यानें एक विलक्षण मंत्र १  संपादन केला होता. त्याच्या योगें तो मेलेल्या माणसाच्या डोक्यावर चिटक्या मारून तो मनुष्य कोठें जन्मला, हें सांगत असे. त्याचें ब्राह्मणांनीं फारच देव्हारें माजविलें. ते झांकलेल्या यानांत त्याला बसवून गांवोगांवी घेऊन जात, व लोकांना सांगत कीं, जो वंगीसाला पाहतो, त्याला धनाचा किंवा यशाचा लाभ होतो, व मेल्यानंतर तो स्वर्गाला जातो. अशा रितीनें ते पुष्कळ पैसा गोळा करीत असत. ब्राह्मणांबरोबर चारी दिशांना फिरून वंगीस परत श्रावस्तीला आला, तेव्हां भगवंताच्या दर्शनाची त्याला उत्कट इच्छा झाली, व त्याप्रणाणें तो भगवंताच्या भेटीला गेला. आपणाला अशा अशा तर्‍हेचा मंत्र येतो, असें वंगीसानें सांगितलें, तेव्हां भगवंतानें तीन निरनिराळ्या मेलेल्या माणसांची परीक्षा करण्यास त्यास लाविलें. दोहोंची त्यानें बरोबर परीक्षा केली; पण तिसर्‍याची त्याला परीक्षा करतां येईना; कां कीं, त्याला जिवंतपणीं अर्हत्पद मिळालें होतें. आपला मंत्र फुकट गेला असें वाटून वंगीसाला फार दुःख झालें, व भगवंताकडून नवीन मंत्र शिकण्याच्या आशेनें तो भिक्षु झाला. हा मनोरथपूरणीच्या गोष्टीचा सारांश.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ ह्याला शवशीर्ष मंत्र असें म्हटलें आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
परंतु संयुत्तनिकायांत वंगीस संयुत्त नांवाचें एक बारा सुत्तांचें प्रकरण आहे. त्यांतील शेवटच्या सुत्ताच्या अट्ठकथेंत वंगीसाची गोष्ट निराळ्याच प्रकारची आहे. तिचा सारंश असा :-

ह्याची आई वादपटु परिव्राजिका होती. तीला पांचशें प्रकारचे वाद येत असत, व ती सार्‍या परिव्राजकांना वादांत जिंकीत असे. पण शेवटीं एका परिव्राजकानें तिला जिंकलें. तेव्हां तिनें त्याच्याबरोबर विवाह केला. त्या दोघांना जो मुलगा झाला, तो हा वंगीस. हाहि आपल्या आईबापांप्रमाणें वादपटु होऊन वाद करीत फिरत असे. ह्याशिवाय त्याला एक विद्या माहीत होती. तिच्या योगें मेलेल्या माणसाच्या डोक्यावर चिटक्या मारून तो कोठें जन्मला, हें तो सांगत असे. (बाकी गोष्ट सरासरी वरच्या सारखी आहे.)

परंतु खुद्द वंगीससंयुत्ताचें आणि विशेषतः त्यांतील शेवटच्या सुत्ताचें नीट निरीक्षण केलें असतां असें दिसून येतें कीं, तो पूर्वी मोठा कवि होता; व काव्याच्या योगें लोकरंजन करीत फिरत असे (कावेय्यमत्ता विचरिम्ह पुब्बे). कवि असल्याकारणानें भिक्षु झाला तरी त्याचे कामादिक वितर्क फार प्रबळ होते. आणि त्यांचें दमन करण्याविषयीं त्याला स्वतःच्या मनाला उपदेश करावा लागे. कधीं कधीं सभेंत बसला असतां भगवंतावर दुसर्‍या एखाद्या विषयावर काव्य रचून तें तेथल्या तेथें तो म्हणून दाखवी; आणि त्यामुळेंच त्याला प्रतिभाशाली भिक्षूंत अग्रस्थान मिळालें.