बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 38

३३
बक्कुल.* ( *  बाकुल असाही पाठ सांपडतो.)

“निरोगी भिक्षुश्रावकांत बक्कुल पहिला आहे.”

हा भगवंतापेक्षां वयानें मोठा; कौशांबी येथें एका श्रेष्टिकुलांत जन्मला. जन्मल्यावर पांचव्या १ दिवशीं त्याला यमुनेवर स्नानासाठीं नेलें असतां तो दाईच्या हातांतून निसटून नदींत पडला, व त्याला एका मोठ्या माशांनें गिळून टाकलें; २ तो मासा तसाच तडक नदीच्या प्रवाहांतून खालीं जाऊन वाराणसी येथें कोळ्याच्या जाळ्यांत सांपडला.  त्या कोळ्यानें तो एका सावकराच्या घरीं नेऊन विकला. उत्तम मासा पाहून मालकीणबाई स्वतःच कापावयास बसली, व तो कापीत असतां तिला हा मुलगा सांपडला. तिला मुळींच मूल नव्हतें. तेव्हां या पुत्रलाभानें तिला फार आनंद होणें साहजिक होतें. तिनें त्याचें उत्तम रितीनें संगोपन केलें. परंतु माशाच्या पोटांत मुलगा सांपडल्याची गोष्ट चहूंकडे फैलावली. तेव्हां कौशांबी येथील सावकाराची सर्व मंडळी वाराणसीला येऊन मुलाला परत मागूं लागली, व त्यायोगें खटला उपस्थित झाला. शेवटीं ही फिर्याद राजाकडे नेण्यांत आली. राजा म्हणाला, “ह्या आईनें ह्याला नवमास उदरांत बाळगिलें, तेव्हां ती त्याची आई नव्हे, असें म्हणतां येत नाहीं. पण ह्या दुसरीनें माशाच्या पोटांतून सुखरूपपणें बाहेर काढून ह्याचें संगोपन केलें. तेव्हां तिचीहि योग्यता आईएवढीच आहे. आतां तुम्ही असें करा कीं, ह्या मुलाला दोन्ही कुटुंबाचा वारस समजा.”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- हें मज्झिमनिकायांतील बक्कुलसुत्ताच्या अट्ठकथेचें म्हणणें, व तें विशेष ग्राह्य दिसल्यामुळें येथें स्वीकरालें आहे. मनोरथपूरणींत जन्मल्या दिवशींच त्याला यमुनेवर नेण्यांत आलें असें आहे.

२- Now the Lord had prepared a great fish to swallow up Jonah. And Jonah was in the belly of the fish three days and three nights (Jon. 1.17). येथें बायबलांतील ह्या ज्योनाच्या गोष्टीची आठवण होते.
------------------------------------------------------------------------------------------------------------
राजाच्या निकालाप्रमाणें दोन्ही कुळांत त्याचे संगोपन होऊं लागलें. तो कधी कौशांबीला व कधीं वाराणसीला रहात असे; व ह्यामुळेंच ह्याचें नांव बक्कुल (द्विकुल) असें पडलें.

कौशांबी येथें भगवंताचा धर्म श्रवण करून तो भिक्षु झाला, असें मनोरथपूरणींचे म्हणणें; परंतु बक्कुलसुत्ताच्या अट्ठकथेंत वाराणसी येथें तो भिक्षु झाला असें म्हटलें१ आहे. (१ मज्झिमभाणकांचा पहिला आणि हा फरक मनोरथपूरणीच्या कर्त्याला माहीत होता, असें दिसतें. पंचम दिवसे...पेसेसीति मज्झिमभाणका । त्याचप्रमाणें ह्या ठिकाणीं, वाराणसिं ति मज्झिमभाणका.)

भिक्षु झाल्यानंतर त्यानें आपलें आयुष्य कसें घालविलें, ह्याचें वर्णन बक्कुल सुत्तांतच आहे. त्याचा सारांश असाः-

आयुष्मान् बक्कुल राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या वेळीं बक्कुलाचा जुना मित्र अचेल (नग्न) काश्यप त्याजपाशीं आला, आणि त्याला म्हणाला, “आयुष्यमान् बक्कुल, तुला भिक्षु होऊन किती वर्षे झालीं?”

ब० :- ऐशीं वर्षें.

का० :- ह्या ऐशीं वर्षांत तूं कितीदा स्त्रीसंग केलास?