बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 41

ह्यानंतर नंद कसा वागूं लागला, ह्याचा उल्लेख अंगुत्तरनिकायाच्या अट्ठकनिपातांत आला आहे. भगवान् म्हणतो, “भिक्षुहो, जर कोणाला कुलपुत्र म्हणतां येईल तर तें नंदाला होय. बलवान् कोणाला म्हणावयाचें असेल, देखणा म्हणावयाचें असेल, तीव्र कामी म्हणावयाचें असेल तर नंदालाच म्हणतां येईल. नंद इंद्रियांचें रक्षण करण्यांत दक्ष, भोजनांत प्रमाण जाणणारा, अल्पनिद्रा घेणारा व स्मृतिसंप्रजन्यानें युक्त (सावधान) नसता तर दुसर्‍या कशामुळें परिपूर्ण आणि परिशुद्ध ब्रह्मचर्य आचरूं शकला असता?

भिक्षुहो, ज्या ज्या दिशेला नंद पहातो, त्या त्या दिशेला आपल्या मनांत लोभदौर्मनस्यादिक पापविचार उत्पन्न होऊं नयेत, अशा निश्चयानेंच पहातो. अशा रितीनें तो आपल्या इंद्रियांचे रक्षण करतो.

“तो विचार करून पिंडपात ग्रहण करतो. क्रीडेसाठीं, मदासाठीं, मंडनासाठीं, किंवा विभूषणासाठीं तो आहार ग्रहण करीत नाहीं. केवळ ह्या शरीराचें पालन व्हावें, त्रास दूर व्हावा, ब्रह्मचर्याला मदत व्हावी, एवढ्याचसाठीं तो आहार ग्रहण करतो. ह्या आहारानें भुकेच्या वेदना नाहींशा करून, मी (जास्ती खाण्यानें) नव्या वेदना उत्पन्न करणार नाहीं, ह्या अन्नानें माझ्या शरीराची यात्रा सुखावह होईल, मी दोषी ठरणार नाहीं, व माझ्या मनाला सुख मिळेल, असा विचार करून तो पिंडपात ग्रहण करीत असतो. ह्याप्रमाणें तो आपल्या भोजनांत प्रमाण जाणतो.

“भिक्षुहो, नंद दिवसभर चंक्रमण करून किंवा बसून आपल्या चित्ताचा आळस दूर करतो. त्याचप्रमाणें रात्रीच्या प्रथम यामींहि वागून, मध्यमयामीं उजव्या कुशीवर, पायावर पाय ठेवून मोठ्या सावधपणें सिंहासारखा निजतो. १ (१- अशा निजण्याला सिंहशय्या असें म्हणतात.) पुन्हां रात्रीच्या शेवटच्या यामीं उठून चंक्रमण करून किंवा बसून चित्ताचा आळस दूर करतो. अशा रितीनें तो अल्पनिद्रा घेत असतो.

“नंदाला ज्या ज्या वेदना उत्पन्न होतात, त्या त्या माहीत असतात;  जे जे वितर्क उत्पन्न होतात, ते ते माहीत असतात. अशा रितीनें तो स्मृतिसंप्रजन्ययुक्त रहातो.”