बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 42

३८
महाकप्पिन

“भिक्षूंना उपदेश करणार्‍या भिक्षुश्रावकांत महाकप्पिन श्रेष्ठ आहे.”

हा सरहद्दीवरील कुक्कुटवती नांवाच्या नगरांत राजकुलांत जन्मला, व पित्याच्या मरणानंतर राजा झाला. श्रावस्तीहून आलेल्या व्यापार्‍यांकडून भगवंताची कीर्ति ऐकून भिक्षु होण्यास तो उत्सुक झाला, व उद्यानांतून परस्पर आपल्या अमात्यांसह श्रावस्तीला जाण्याला निघाला. त्याची पट्टराणी अनोजा देवी हें वर्तमान ऐकून त्याच्या मागोमाग आपल्या परिवारासह श्रावस्तीला जाण्याला निघाली. ह्या सर्वांची आणि भगवंताची गांठ चंद्रभागा नदीच्या कांठीं पडली. कप्पिनाला आणि त्याच्या अमात्यांना भगवंतानें भिक्षु केलें, व उप्पलवण्णा भिक्षुणीकडून अनोजा देवीला व तिच्या स्त्रीपरिवाराला भिक्षुणी करविलें.

हा मनोरथपूरणीच्या गोष्टीचा सारांश; व तो संयुत्तअट्ठकथेच्या गोष्टीशीं जुळतो. संयुत्ताच्या मूळसुत्तांत १ काप्पिनासंबंधानें मजकूर आहे, त्याचा सारांश असा :-
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- निदानवग्ग, भिक्खुसंयुत्त, सुत्त ११. इतर ठिकाणीं मनोरथपूरणीचें आणि संयुत्तअठ्ठकथेचें बहुधा जुळत नसतें. परंतु येथें दोहोंतील मजकूर जवळजवळ एकसारखाच आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
भगवान् श्रावस्ती येथें रहात होता. त्यानें आयुष्मान् महाकप्पिनाला दुरून येतांना पाहिलें आणि तो भिक्षूंना म्हणाला, “भिक्षुहो, ह्या इकडे येणार्‍या गोर्‍या, सडपातळ, उंच नाकाच्या भिक्षूला तु्म्ही पहात आहां काय? ह्याला सर्व प्रकारची समाधि प्राप्त झाली आहे; आणि ज्यासाठीं कुलपुत्र गृहाचा त्याग करतात, त्या ब्रह्मचर्यपर्यवसानाचा (निर्वाणाचा) ह्यानें साक्षात्कार करून घेतला आहे.”

ह्या उतार्‍यावरून महाकप्पिन राजा होता कीं नाहीं, हें जरी सांगतां आलें नाहीं, तरी तो सरहद्दीवरील राजकुलांत जन्मला असावा, असा त्याच्या वर्णनावरून भास होतो.