बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 55

५४
सिगाल माता

“श्रद्धाळु भिक्षुणीश्राविकांत सिगालमाता श्रेष्ठ आहे.”

ही राजगृह नगरांत एका श्रेष्ठिकुलांत जन्मली. वयांत आल्यावर समानजाति तरुणाशीं तिचें लग्न झालें. तिला जो मुलगा झाला, त्याचें नांव ‘सिगाल’ असें ठेवण्यांत आलें, व त्यावरूनच तिला ‘सिगालमाता’ असें म्हणत. थेरीगाथेंत हिच्या गाथा सांपडत नाहींत. परंतु थेरी-अपदानांत हिचें एक अपदान आहे. त्यावरून असें दिसून येतें कीं, ज्या सिगालाला दिशांची पूजा१  करीत असतां भगवंतानें उपदेश करून सन्मार्गाला लावलें, त्याचीच ही आई होती. ती म्हणते -
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- बुद्धलीलासारसंग्रह, भाग ३, प्र. १ लें पहा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पच्छिमे च भवे दानि गिरिब्बजपुरुत्तमे।
जाता सेट्ठिकुले फीते महारतनसंचये।।१।।
पुत्तो सिगालको नाम ममासि विपथे रतो।
दिट्ठिगहनपक्खन्दो दिसापूजनतप्परो।।२।।
नानादिसा नमस्सन्तं पिण्डाय नगरं वजं।
तं दिस्वा ओवदी बुद्धो मग्गे ठत्वा विनायको।।३।।

अर्थः- (१) ह्या शेवटल्या जन्मीं मी गिरिव्रज (राजगृह) नांवाच्या श्रेष्ठ नगरांत अत्यंत सधन व भरभराटीला चढलेल्या श्रेष्ठिकुळांत जन्मलें. (२) खोट्या मार्गाला लागलेला, मिथ्यादृष्टीच्या जंगलांत शिरलेला, दिशांच्या पूजेंत तत्पर असा माझा सिगालक नांवाचा मुलगा होता. (३) तो दिशांची पूजा करीत असतां विनायक बुद्धानें नगरांत पिण्डपाताला जाण्याच्या वेळीं त्याला पाहिलें, व मार्गांत थांबून उपदेश केला.

उपासक
५५ आणि ५६

तपुस्स आणि भल्लिक

“प्रथम शरण  गेलेल्या उपासकांत तपुस्स आणि भल्लिक हे पहिले आहेत.”

हे उत्कलदेशांत एका कुटुंबिकाच्या घरीं जन्मलें. तपुस्स हा वडील भाऊ, आणि भल्लिक धाकटा भाऊ होता. ते वयांत आल्यावर मध्यदेशांत व्यापार करून आपला चरितार्थ चालवीत असत. भगवंताला संबोधिज्ञान झाल्यानंतर तिसर्‍या आठवड्यांत बोधिवृक्षापासून कांहीं अंतरावर तो राजायतन वृक्षाखालीं बसला असतां हे दोघे भाऊ व्यापारासाठीं त्या मार्गानें चालले होते. तेथें त्यांना एका देवतेनें भगवंताला दान देण्यासाठीं उपदेश केला. त्याप्रमाणें भगवंतापाशीं जाऊन त्यांनीं त्याला साधा सत्तु, व मधुशर्करादिमिश्रित सत्तु दिला; व ते भगवंताचे उपासक झाले. त्या वेळीं संघाची स्थापना झाली नव्हती. म्हणून ‘भगवंताला शरण जातों, धर्माला शरण जातों,’ ह्या दोन वचनांनींच ते शरण गेले. यास्तव त्यांना ‘द्विवाचिक’ उपासक म्हणतात. येथपर्यंतची कथा महावग्गाच्या आरंभीं सांपडते.

ह्यापुढें, भगवंतानें त्या दोघांना आपल्या डोक्याचे आठ केंस दिले व स्वदेशीं जाऊन त्यांनीं त्या केसांवर मोठा चैत्य बांधला आणि त्यांतून उपोसथाच्या दिवशीं नीलरश्मि निघत असत, अशी दंत-कथा मनोरथपूरणींत आली आहे. ह्यापैकीं एक केस अशोकाच्या वेळीं मोग्गलिपुत्ततिस्स महास्थविरानें सुवर्णभूमीला पाठविलेल्या सोण आणि उत्तर ह्या दोन स्थविरांनीं ब्रह्मदेशाला नेला व त्याच्यावरच रंगूनला असलेला अत्यंत भव्य सुवर्णचैत्य (स्वे-दगून फया) उभारला आहे, अशी ब्रह्मी लोकांची समजूत आहे.