बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 67

उपासिका
६६

सुजाता सेनानीदुहिता

“प्रथम शरण गेलेल्या उपासिकांत सुजाता सेनानीदुहिता पहिली आहे.”

ही उरुवेलाप्रदेशांत सेनानीच्या घरीं जन्मली. तरुणपणीं एका वडाच्या झाडावर रहाणार्‍या देवतेला तिनें असा नवस केला होता कीं, जर आपणाला योग्य वर मिळून पहिल्यानें मुलगा झाला तर त्या देवतेला दरवर्षी योग्य उपहार देण्यांत येईल. तिचा संकल्प परिपूर्ण झाला. तेव्हां आपला नवस फेडण्यासाठीं तिनें निवळ दुधाचा उत्तम पायस तयार केला, व त्या वडाच्या झाडाखालीं साफसूफ करण्यास आपल्या दासीला तेथें पाठविली. आमचा बोधिसत्त्व त्या दिवशीं सकाळीं त्या झाडाखालीं बसला होता. त्याला पाहून दासीला वाटलें कीं, सुजातेचा नवस स्वीकारण्यासाठीं साक्षात् वृक्षदेवता अवतरली असावी. तिनें धांवत जाऊन ही गोष्ट आपल्या मालकिणीला सांगितली. ती दासीबरोबर दुधाचा पायस घेऊन तेथें आली, व वृक्षाखालीं बसलेली देवता नसून परमतपस्वी बोधिसत्त्व आहे, हें तिला समजलें. तरी मोठ्या भक्तिभावानें तिनें बोधिसत्त्वाला दुधाचा पाय अर्पण केला. ही भिक्षा ग्रहण करून बोधिसत्त्व त्याच रात्रीं बुद्धपदाला पावला. त्यामुळे बौद्ध वाङ्मयांत आणि चित्रकलेंत सुजातेच्या दानाला फार महत्त्व आलें आहे, व तिचें नांव अजरामर होऊन बसलें आहे.

६७
विशाखा मिगारमाता

“दायिका उपासिकांत विशाखा मिगारमाता श्रेष्ठ आहे.”

हिची समग्र गोष्ट बुद्धलीलासारसंग्रहाच्या दुसर्‍या भागांत (प्र.१०) दिलीच आहे. तेथें ती धम्मपद्अट्ठकथेच्या आधारें लिहिली आहे. तरी मनोरथपूरणीच्या गोष्टींत आणि त्या गोष्टींत फरक नाहीं. अनाथपिंडिक जसा दायकउपासकांत श्रेष्ठ, तशी ही दायिकाउपासिकांत होती, याचें एक उदाहरण पहिल्या भागांत (कलम ६४) आलेंच आहे.

६८ आणि ६९

खुज्जुत्तरा आणि सामावती

“बहुश्रुत उपासिकांत खुज्जुतरा श्रेष्ठ आहे.”
“मैत्रीध्यान करणार्‍या उपासिकांत सामावती श्रेष्ठ आहे.”

ह्यांपैकीं पहिली घोसित श्रेष्ठीच्या दासीच्य पोटीं जन्मली. तिचें नांव उत्तरा होतें. परंतु ती जरा कुब्जा१ (१- ‘कुब्जा’ शब्दाचें ‘खुज्जा’ असे पालिरूप होतें.) असल्यामुळें तिला खुज्जुत्तरा म्हणत. सामावती २ (२- सामवती असाहि पाठ सांपडतो.) भद्दियनगरांत भद्दवतिय श्रेष्ठीच्या घरीं जन्मली. ह्या दोघीहि एका ठिकाणीं कशा आल्या, हें खालील गोष्टीवरून दिसून येईल.

एके वेळीं भद्दिय नगराच्या आसपास भयंकर दुष्काळ पडला. भुकेच्या भयानें लोक व्याकुळ होऊन इतस्ततः जाऊं लागले. तेव्हां भद्दवतिय श्रेष्ठी आपल्या पत्‍नीला म्हणाला, “भद्रे, ह्या दुष्काळाचा अंत दिसत नाहीं. कौशांबी येथें आमचा घोसित श्रेष्ठी हा एक मित्र रहातो. तिकडे गेलो तर तो आम्हांला विसरणार नाहीं.”