बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 69

व्यवस्थापकाला तिची कल्पना फार आवडली, व ती त्यानें दुसर्‍याच दिवशी अमलांत आणली. तेव्हांपासून आरडाओरड आणि मारामारी होईनाशी झालीं. कांहीं दिवसांनीं घोसित श्रेष्ठीनें त्या व्यवस्थापकाला बोलावून विचारलें कीं, ‘अलिकडे अन्नछत्र चालू आहे कीं नाहीं.’ तो म्हणाला, “सर्व कांहीं पूर्वीप्रमाणें चालू आहे.”  घोसित म्हणाला, “मग पूर्वींप्रमाणे गडबड आणि आरडाओरड ऐकूं येत नाहीं, हें कसें?”

तो :- आर्य, माझी एक मुलगी आहे. तिनें मला ही युक्ती सुचविली. त्याप्रमाणें व्यवस्था केल्यामुळें आज अन्नछत्राच्या जागीं शांतता नांदत आहे.

घोसित :- अरे, पण तुला मुलगी कुठली?

मालकाला ठकविंणे शक्य नसल्यामुळें आपणाला मुलगी कशी मिळाली, हे सांगणे व्यवस्थापकाला भाग पडलें. तेव्हां घोसित म्हणाला, “हा तुझा मोठा अपराध समजला पाहिजे. इतके दिवस माझ्या मुलीला तूं आपल्या घरीं ठेवून घेतलेंस, आणि हें वर्तमान मला कळूं दिलें नाहींस. तेव्हां त्वरेनें जाऊन तिला इकडे घेऊन ये.”

तिला सोडण्याची व्यवस्थापकाची इच्छा नव्हती. परंतु धन्याच्या मर्जीखातर सामावतीला त्यानें धन्याच्या घरीं नेलें. त्या दिवसापासून घोसित श्रेष्ठीनें तिचें आपल्या एकुलत्या एका मुलीप्रमाणें संगोपन केलें. शहरांतील पांचशे कुमारिका तिच्याबरोबर क्रीडा करण्यासाठीं देण्यांत आल्या होत्या; व एकाद्या राजकुमारीप्रमाणें तिची बरदास्त ठेवण्यांत येत असे.

कौशांबीच्या उदयनराजानें सामावतीला सखींसह क्रीडा करीत असतां पाहिलें व घोसित श्रेष्ठीजवळ तिच्याबद्दल मागणी केली. ‘माझ्या मुलीला सापत्‍न कुळांत देण्याची माझी इच्छा नाहीं, असें म्हणून श्रेष्ठीनें राजाची मागणी नाकारली. तेव्हां एके दिवशी सामावती आपल्या सखींसह उद्यानात गेली असतां उदयनानें श्रेष्ठीच्या घरीं येऊन त्याला, त्याच्या बायकोला व नोकराचाकरांना घरांतून बाहेर काढवून, दरवाजे बंद करून त्यावर मोहोर (राजमुद्रा) करविली; व खडा पहारा ठेवून तो निघून गेला. सामावती उद्यानक्रीडा करून घरीं येऊन पहाते तों आपले आई-बाप बाहेर बसलेले! ती म्हणाली, “हें काय बरें?” त्यांनीं घडलेलें सर्व वर्तमान सांगितलें. तेव्हां ती म्हणाली, “तुम्हीं असें कां केलें? जर माझ्या परिवारासह राजा मला राणी करण्यास तयार असला, तर माझी कांहीं हरकत नाहीं, असें तुम्ही सांगावें कीं नाहीं?

“अग मुली, तुला राणी होणें आवडेल, हे आम्हांला कसें ठाऊक?”

नंतर श्रेष्ठीनें राजाला तसा निरोप कळविला. त्यानें सामावतीसाठी मोठा महाल बांधून त्यांत तिच्या सखींचीहि सोय करविली, व तिला पट्टराणीपद दिलें.