बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग ३ रा 73

राजपुरुष जेव्हां सामावतीला आणण्यास गेले होते तेव्हांच, राजा अत्यंत संतप्त झाला आहे, हें सामावतीनें ताडलें, वती सख्यांना म्हणाली, “आज राजा आम्हांला मारूं इच्छीत आहे. तेव्हां त्यावर निस्सीम मैत्रीभावना करणें आमचें कर्तव्य आहे.”

राजपुरुषांनीं त्या सर्वांना आणून राजासमोर रांगेनें उभे केलें. राजानें विषारी बाण धनुष्याला लावून आकर्ण दोरी ओढली. पण सामावतीच्या आणि तिच्या सखींच्या मैत्रीभावनेचा प्रभाव एवढा झाला कीं, राजाचा हात दोरीला आणि बाणाला चिकटून राहिला, अंगांतून घामाच्या धारा वाहूं लागल्या, शरीर कांपूं लागलें, तोंडांतून लाळ गळूं लागली, डोळे भ्रमूं लागले. तेव्हां सामावती म्हणाली, “महाराज, आपणाला त्रास होत आहे काय?”

राजा :- होय देवी, मी अगदीं भ्रान्त झालों आहे. मला मदत कर.

सा० :- असें जर आहे तर महाराज, बाण जमिनीवर धरा.
राजानें तसें केल्यावर बाण त्याच्या हातून आपोआप खालीं पडला. राजा त्याच वेळीं सचेल स्नान करून आला व सामावतीच्या पायां पडला, आणि म्हणाला, “देवी, माझ्या अपराधाची मला क्षमा कर.”

सा० :- देव, मीं तुम्हांला क्षमा केली आहे.

राजा :- देवी, तूं मला क्षमा करतेस, हें फार चांगले. आजपासून बुद्धदर्शनाला जाण्याला मी तुम्हांला मोकळीक देतों.

एवढें मोठें कुभांड रचूनहि कांहीं फलनिष्पत्ति झाली नाहीं, असें पाहून मागंदिया अत्यंत खिन्न झाली, व तिच्या मत्सराग्नीनें आणखीहि पेट घेतला. एके दिवशीं मोठ्या शिताफीनें राजाला घेऊन ती उद्याक्रीडेला गेली; व इकडे आपल्या चुलत्याकडून सामावतीच्या महालाचे सर्व दरवाजे बंद करून त्याला आग लावून देवविली. सामावती आणि तिच्या सख्या त्या आगींत जळून मेल्या. चौकशी अंतीं मागंदियेच्या चुलत्याचें हें कृत्य राजाला समजलें, व त्यांत मागंदियचें अंग असावयास पाहिजे, अशी त्याची खात्री झाली. पण तिला कांहीं संशय येऊं न देतां तो म्हणाला, “ हें फार चांगले झालें! माझ्या वधासाठीं ती जेव्हां तेव्हां खटपट करीत होती!  ती आणि तिच्या सख्या जळून मेल्या, हें उत्तम झालें !” मागंदिया म्हणाली, “महाराज, हें काम माझ्याशिवाय झालें नाही.”

राजानें, ‘आपण प्रसन्न झालों आहें,’ असें म्हणून तिच्या सर्व आप्तेष्टांस गोळा केलें, आणि तिच्या समोर त्यांचा, व नंतर तिचाहि वध करविला.

उदयन राजाच्या अंतःपुराला (झनानखान्याला) आग लागून सामावती आणि तिच्या पांचशें सख्या जळून मेल्याची हकीगत उदानाच्या सातव्या वर्गाच्या दहाव्या सुत्तांत आली आहे. ‘त्यांची गति काय झाली,’ असा भिक्षूंनीं प्रश्न केला असतां भगवान् म्हणाला, “त्यांपैकीं कांहीं स्त्रोतआपन्न, कांहीं सकृदागामी व कांहीं अनागामी होत्या. त्यांचे मरण निष्फळ नव्हे.”  ह्यावरून असे दिसून येतें कीं पिंडोल भारद्वाजानें १ उदयनाला बुद्धोपासक सरण्यापूर्वीं पुष्कळ वर्षें त्याच्या अंतःपुरांतील स्त्रियांत बौद्ध धर्माचा चांगला प्रसार झाला होता.
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- या भागाचें आठवें प्रकरण पहा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
बुद्धानें कन्यादान घेण्याचें नाकारलें, ह्याचा उल्लेख सुत्तनिपातांतील मागंदिय सुत्तांत आला आहे. उद्यानांतील सुत्ताच्या आणि मागंदिय सुत्ताच्या अट्ठकथांच्या आधारें मनोरथपूरणीकारानें वरील गोष्ट रचली असावी, तींत इतिहासाचा अंश बराच असला पाहिजे. हीच गोष्ट धम्मपदअट्ठकथेंत थोडीशी खुलवून लिहिली आहे; पण मनोरथपूरणीची गोष्ट तिच्याहून प्राचीनतर असली पाहिजे.