समाधिमार्ग

समाधिमार्ग फार प्राचीन आहे. आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते, व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकाली अस्तित्वात होता.


समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 3

खेत्त किंवा क्षेत्र म्हणजे शेतीची जागा.  अशा ठिकाणी नांगरण्याच्या वेळी शेतकरी येऊन गडबड करतात; पेरणीच्या वेळीही गडबड होते; पाखरे राखण्यासाठी क्षेत्ररक्षक आरडाओरड करीत असतात.  अशा रीतीने अनेक प्रसंगी समाधीला उपसर्ग पोचतो.

विसभाग म्हणजे जेथे परस्परविरोधी लोक राहतात.  ज्या गावात किंवा ज्या निवासस्थानात कोणत्याही कारणास्तव दोन तट पडून भांडणे झालेली असतात, त्या गावाजवळ किंवा त्या निवासस्थानांत राहून समाधी साध्य होणे शक्य नाही.  अशा ठिकाणी कधी या पक्षाकडून तर कधी त्या पक्षाकडून उपसर्ग पोचल्यामुळे मन अस्वस्थ होते.

पट्टन म्हणजे बाजार भरण्याची जागा.  समुद्रकिनार्‍यावर किंवा इतर ठिकाणी जागा शांत असली, परंतु तेथे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बाजार भरत असला, तर दोनचार दिवसांत संपादलेली शांति एकाएकी नष्ट होण्याचा फार संभव असतो.

पश्चन्त किंवा प्रयत्‍न म्हणजे जंगली लोक राहतात अशी जागा.  तेथे लोकांना योगाभ्यासाची किंमत माहीत नसल्यामुळे ते योग्याच्या निवासस्थानाच्या आसपास शिकार करून किंवा अशाच अन्य प्रकाराने समाधीला पुष्कळ अडचण आणीत असतात.

सीमा म्हणजे राज्याची सीमा.  अशा ठिकाणी हा कोणीतरी गुप्‍तहेर असेल असे वाटून दोन्ही राज्यातील अधिकार्‍यांकडून योग्याला उपद्रव होतो.

असप्पाय म्हणजे अपथ्यकारक जागा.  ज्या ठिकाणी राहिल्याने बरोबर जेवणखाण मिळत नाही, किंवा जेथून कामोद्दीपक विषय अवलोकनात व ऐकण्यात येतात; अशा ठिकाणी राहिल्याने चित्त स्थिर होणे कठीण जाते.

मित्त किंवा मित्र म्हणजे समाधिमार्गात उपयोगी पडणारा मित्र.  ज्याने प्रयत्‍नाने समाधी साध्य केली असेल, ज्याला समाधिमार्गातील अडचणी माहीत असतील असा मित्र ज्या ठिकाणी नसेल, त्या ठिकाणी समाधी साध्य करण्यास फार प्रयास पडतात.

याप्रमाणे ही अठरा स्थाने सदोष समजली जातात.  परंतु ती सर्वांनाच बाधक आहेत असे नाही.  असामान्य व्यक्तींना विषम परिस्थितीतही समाधी साधते.  यासंबंधाने विशुद्धिमार्गात एक गोष्ट आहे ती अशी-

सिंहलद्वीपांत अनुराधपुर नगराबाहेर स्तूपाराम नावाचा एक मोठा विहार होता.  तेथे मोठा भिक्षुसमुदाय रहात असे.  दोन तरुण मित्रांनीं गृहत्याग करून स्तूपारामांतील भिक्षुसंघात प्रवेश केला.  भिक्षूंच्या नियमांप्रमाणे पाच वर्षेपर्यंत विनयाचे अध्ययन करून झाल्यावर त्या दोघांपैकी जो थोडासा वयाने लहान होता तो प्राचीनखंडराजी नावाच्या एका दूरच्या गावी राहण्यास गेला; व तेथे पाचसहा वर्षे राहिल्यानंतर पुन्हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी स्तूपारामात आला.  जेष्ठ भिक्षूने त्याचे यथायोग्य आदरातिथ्य केले.  संध्याकाळची वेळ होती.  बारा वाजून गेल्यानंतर भिक्षु जेवीत नसतात.  पण आंबा, लिंबू वगैरे फळांचे पानक (पन्हे) करून घेतात.  कनिष्ठ भिक्षू प्रवासात थकून आला असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी विहारात कसलेतरी पन्हे पिण्यास मिळेल असे त्याला वाटत होते.  परंतु रात्री पाण्याशिवाय दुसरे काही मिळाले नाही.  तेव्हा त्याच्या मनात असा विचार आला की, माझ्या मित्राचे दायक विहारात आणून दान देत नसावे; पण उद्या जेव्हा अनुराधपुरात भिक्षेसाठी जाऊ, तेव्हा तेथे चांगले चांगले पदार्थ खात्रीने मिळतील.