विचिकिच्छा किंवा संशयग्रस्तता ही बहुधा आळसामुळेच उत्पन्न होत असते. आळश्याला संशय फार म्हणतात ते काही खोटे नाही. संशयग्रस्ततेला दूर करण्यासाठी थोर पुरुषांची चरित्रे अवलोकन करावी. केवळ श्रद्धेच्या बळावर कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला. केवळ श्रद्धेच्या बळावर वाशिंग्टनने आणि त्याच्या अनुयायांनी एका अपूर्व प्रजासत्ताक राज्याची स्थापना केली. केवळ श्रद्धेच्या बळावर अनेक शास्त्रज्ञांनी भौतिक शास्त्रात कल्पनातीत शोध लावले. अशा थोर व्यक्तींची चरित्रे अवलोकन केली असता सन्मार्गाविषयी आपली श्रद्धा वृद्धिंगत होते व संशयग्रस्ततेचे निवारण होते. याशिवाय बुद्ध, धर्म आणि संघ यांच्या अनुस्मृतींची भावनाही श्रद्धोत्पादाला कारणीभूत होते. ती कशी करावी हे सहाव्या प्रकरणात सांगण्यात येईल.
याप्रमाणे नीवरणाचे दमन करून आपण समाधीकडे वळलो तरी कधी कधी खालील गाथेत सांगितलेल्या सात अडचणी उपस्थित होत असतात.
आवासो, गोचरी, भस्सं, पुग्गलो, भोजनं, उतु ।
इरियापथो ति सत्तेते असप्पाये विवज्जये ॥
आवासासंबंधाने विस्तृत माहिती वर दिलीच आहे. तिचा नीट विचार करून आपल्या प्रकृतीला मानवेल असाच आवास पसंत करावा.
गोचर म्हणजे भिक्षूला भिक्षेसाठी जाण्याचा गाव, आणि गृहस्थाला निवासस्थानाच्या आजूबाजूची वस्ती. हा गोचर जर अनुकूल नसला तर समाधीला वारंवार बाध येतो. ज्या गावात भिक्षु भिक्षेला जातो तेथील लोक श्रद्धाविहीन असले, व त्याला उपद्रव करू लागले, तर त्यापासून चित्त विक्षेप पावते. त्याचप्रमाणे गृहस्थाचा ज्या गावाशी व्यवहार असेल त्या गावच्या लोकांना समाधी म्हणजे काय हे जर मुळीच माहीत नसले, तर त्याला अनेक प्रकारे उपद्रव देतील. म्हणून गोचरग्राम योग्य मिळेल यासाठी खबरदारी घ्यावी.
भस्स (भाष्य) म्हणजे संभाषण. योगारंभी भाषण परिमित आणि तेही केवळ धार्मिक असावयास पाहिजे. कामोद्दीपन करणार्या किंवा युद्धाच्या आणि चोरांच्या कथा फार विघातक आहेत. तेव्हा अशा गप्पागोष्टी जेथे चालल्या असतील, तेथे योग्याने क्षणभरही राहता कामा नये. समाधीला अनुकूल अशा कथा ऐकण्यास मिळाल्या तर त्या खुशाल ऐकाव्या.
पुग्गल (पुग्दल) म्हणजे व्यक्ति. योगारंभी स्त्रीने पुरुषाचा किंवा पुरुषाचे स्त्रीचा विशेष सहवास करता कामा नये, हे येथे सांगण्याची गरजच नाही. येथे व्यक्ति म्हणजे पुरुषाबरोबर राहणारा पुरुष, किंवा स्त्रीबरोबर राहणारी स्त्री. ती जर भलत्यासलत्या गप्पा गोष्टी करणारी असली किंवा धष्टपुष्ट करण्याच्या कामी लागलेली असली, तर तशा व्यक्तीच्या सहवासात समाधी सुखकर होत नाही. ज्या व्यक्तीने समाधी साध्य केली असेल, अशा व्यक्तीचा सहवास फारच फायदेशीर आहे. पण तशी व्यक्ती मिळत नसली, तर निदान विघातक व्यक्तीशी आपला संबंध येणार नाही याविषयी खबरदारी घेतली पाहिजे.
भोजन कोणाला गोड तर कोणाला आंबट किंवा तिखट मानवते. ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे मिळाले असता समाधीमार्ग सुलभ होतो. तेव्हा तसे भोजन मिळवण्याचा प्रयत्न करावा, आणि ते अगदी परिमितपणे ग्रहण करावे.
उतु (ॠतु) हा कोणाला हिवाळा, कोणाला उन्हाळा तर कोणाला पावसाळा मानवत असतो. तेव्हा समाधीच्या आरंभी ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे त्या त्या ॠतूंत समाधीभावनेला आरंभ केला असता समाधी सुलभ होते.
इरियापथ (ईर्यापथ) वर दिलेच आहेत. त्यापैकी एखादा विशेष सोईवार असतो. कोणाला इकडे तिकडे फिरत राहिले असता चित्त एकाग्र करणे सुलभ जाते. कोणाला स्तब्धपणे उभा राहून विचार करणे पसंत असते. कोणाला आसनावर बसून तर कोणाला विछान्यावर पडून चिंतन करणे आवडते. तेव्हा ज्याने त्याने आपल्या प्रकृतीला मानवेल अशा ईर्यापथांचे विशेष सेवन करावे. ज्याला चक्रमण करणे सोईवार पडत असेल त्याने आपल्या निवासस्थानाजवळ एक चंक्रम तयार करावा, हा साठ हातांपेक्षा लांब नसावा, आणि तीस हातांपेक्षा कमी नसावा; रुंदीला पाचसहा हातांपेक्षा जास्त नसावा, व अडीच हातांपेक्षा कमी नसावा. त्याच्यावर गवत वाढलेले नसावे. ज्याच्या आजूबाजूला घनदाट वृक्ष नसावे, व पाणी किंवा चिखल नसावा. तो जवळच्या जमीनीपेक्षा एक वीतीहून जास्त उंच नसावा. किंवा त्या जमिनीहून खोल नसावा. वाळू वगैरे घालून अशा रीतीने तयार केलेले पुष्कळ चंक्रम ब्रह्मदेशातील अनेक विहारात आढळतात. उभा राहण्याची, बसण्याची आणि पडून राहण्याची जागाही तशीच अनुकूल असावी, जेथून आजूबाजूचा रम्य प्रदेश दिसेल अशी जागा बहुधा योगाभ्यासाला अनुकूल असते. तेव्हा तशा जागी बसून ध्यान करणे योग्य आहे. उभा राहण्याची जागाही मोकळी आणि स्वच्छ असावी; म्हणजे तेथे एकाग्र मनाने निर्भयपणे उभे राहणे सुलभ जाते. पडून राहण्याच्या जागीही डासांचा आणि अन्य प्राण्यांचा उपद्रव असता कामा नये. याप्रमाणे ईर्यापथांतील दोष जाणून ते दूर करून अनुकूल ईर्यापथ मिळतील अशी व्यवस्था करावी.