समाधिमार्ग

समाधिमार्ग फार प्राचीन आहे. आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते, व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकाली अस्तित्वात होता.


आनापानस्मृतिभावना 4

दीर्घ आश्वास प्रश्वास किंवा र्‍हस्व आश्वास प्रश्वास याचे एकदा आकलन झाले म्हणजे आपण समाधीच्या मार्गात उतरलो असे समजावे.  पण तेवढ्याने कृतकृत्य न होता किंवा पुढल्या चौकडीच्या अभ्यासास न लागता पहिल्याच चौकडीचा अभ्यास दृढ करावा.  तो इतका की, भय, हर्ष किंवा अशाच एखाद्या संभ्रमकारक प्रसंगी आपले चित्त विभ्रांत न होता एकदम आश्वास-प्रश्वासांवर यावे.  ज्याला एवढे सिद्ध झाले त्याला, पुढच्या चौकडींचा अभ्यास न करता चारही ध्याने साध्य होणे शक्य आहे, असे आचार्य म्हणतात.  याला सुत्तपिटकात आधार सापडला नाही.  जेव्हा जेव्हा आनापानस्मृतिभावना कशी करावी हे भगवंताने सांगितले आहे, तेव्हा तेव्हा या चारही चौकड्या दिल्या आहेत.  म्हणून पुढल्या तीन चौकड्यांची उपेक्षा न करता त्याचाही अभ्यास पुरा करावा.

दुसर्‍या चौकडीत प्रीतीला अग्रस्थान दिले आहे.  प्रीति म्हणजे निष्काम प्रेम.  ते पहिल्या चौकडीच्या अभ्यासाने आपोआप उदित होते; आणि त्याचा अनुभव घेऊन आश्वास प्रश्वास चालविले असता लवकरच मनाला समाधानकारक सुख वाटत असते.  रोगदिकांच्या कारणाने अंगी वेदना उत्पन्न झालेल्या असल्या, आणि अशा प्रसंगी देखील योग्याने आनापानास्मृतीची भावना चालविली, तर त्याला अप्रतिम प्रीतिसुख अनुभवण्यास मिळाल्यावाचून रहात नाही.  त्यानंतर असे आनंदकारक आणि सुखकारक चित्तसंस्कार जाणून घेऊन आश्वासप्रश्वास करायचा असतो; आणि अखेरीस ते शांत कसे होतील, आणि मनाचा सूक्ष्म कंपही कसा थांबेल याविषयी प्रयत्‍न करावयाचा असतो.  म्हणूनच, 'चित्तसंस्कार शांत करून अश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो,' असे वरील उतार्‍यात म्हटले आहे.

परंतु या प्रयत्‍नाने चित्त मंदावत जाण्याचा संभव असतो.  त्यासाठी चित्त जाणून आश्वास प्रश्वास करावा लागतो.  नंतर चित्ताला प्रमुदित करून, चित्ताचे समाधान करून आणि चित्ताला विमुक्त करून आश्वास करण्याचा अभ्यास करावयाचा असतो.  येथे 'विमुक्त करून' याचा अर्थ हा की, आश्वासप्रश्वासात मनाला आसक्त करून ठेवावयाचे नाही.  त्यांच्या आकलनाने एवढी शांती आणि एवऐ सुख मिळत असले, तरी त्यात बद्ध होऊन बसावयाचे नाही.  घोडागाडी आपल्या सुखसमाधानाला साधनीभूत असली, तरी त्यात बद्ध होणार्‍यांना ती सुखकारक होण्यापेक्षा दुःखकारकच होते.  तिच्यासाठी बडे लोकांची हांजी हांजी किंवा असेच काहीतरी आपणास न आवडणारे कृत करण्याची पाळी येते; आणि त्यामुळे मनाला तळमळ लागून राहते.  त्याचप्रमाणे इतक्या प्रयत्‍नाने आटोक्यात आणलेल्या आश्वासप्रश्वासांवर जर योगी मोहित होऊन गेला तर कोणत्याही कारणाने त्याच्या समाधीत विघ्न आले असता त्याच्या मनाला शांति मिळण्याऐवजी कष्ट मात्र होतात.  म्हणून आपले चित्त विमुक्त ठेवण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे.

याच्या पुढली शेवटची चौकडी योग्याला निर्वाणमार्गात प्रविष्ट करणारी आहे.  तिचा स्वतंत्रपणे अभ्यास करता येतो, तरी आश्वासप्रश्वासांवर मन ठेवल्याने तो अधिक सुकर हातो.  ज्याला जगाची अनित्यता पहावयाची असेली त्याला ती ध्यानाच्या योगे अत्यंत सूक्ष्म झालेल्या आपल्याच अश्वास-प्रश्वासांत विशदपणे दिसून येणार आहे.  फूल फुलून ते कोमेजून जाण्यास एक दोन दिवस लागतात.  पिकलेले फळ किंवा पान देठापासून गळून पडण्यास काही काळ जातो; परंतु आपल्या आश्वासप्रश्वासांची घडामोड क्षणोक्षणी चाललेली असते; आणि ती जर आपणास आकलन करता आली, तर अनित्यतेचा अनुभव घेण्यास मूळीच उशीर लागणार नाही.  अनित्यतेच्यायोगे वैराग्याचा अनुभव घेण्यास सापडतो.  त्यायोगे सर्व मनोवृत्तीचा लय कसा होतो याचे ज्ञान होते; आणि मग सर्वत्याग कसा असतो हे समजते.  या सर्वांचा अनुभव घेऊन आश्वास प्रश्वास चालविला असता योग्याला निर्वाणप्राप्‍ती होण्यास विलंब लागत नाही.