समाधिमार्ग

समाधिमार्ग फार प्राचीन आहे. आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते, व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकाली अस्तित्वात होता.


विपश्यनाभावना 2

वायुधातु याहिपेक्षा चंचल आहे. सकाळी हवा शांत असली तर संध्याकाळी अकस्मात जोराने वाहू लागते व एखादे वेळेला तुफानहि होते, आणि पुन्हा एकाएकी तुफान नाहीसे होऊन सर्वत्र सामसूम होऊन जाते.

याप्रमाणे बाह्यरुपस्कंधांत स्थूळ फेरफारांचे अवलोकन करून योग्याने क्रमाक्रमाने सूक्ष्म फेरफारांचे नीरिक्षण करण्यास शिकले पाहिजे आणि मग आपल्या देहातील रूपस्कंध कसा बदलत जातो या विचाराला लागले पाहिजे.  मी मुलगा होतो तेव्हा किती उंच होतो, व त्यानंतर कसकसा वाढत गेलो व माझ्या शरीरात कोणकोणते फेरफार झाले, याचे त्याने मनन केले पाहिजे.  याप्रमाणे सबाह्याभ्यंतरीच्या रूपस्कंधाची अनित्यता पूर्णपणे जाणल्यावर मग वेदनास्कंधाचा विचार करावा.  आपण सकाळी मोठ्या आनंदात असतो, म्हणजे आपल्या वेदना सुखकारक असतात.  त्याच संध्याकाळी आपण आजारी पडल्यामुळे किंवा अशाच अन्य काही कारणांनी दुःखकारक होतात, आणि रात्री पुन्हा गाढ झोप लागली म्हणजे उपेक्षाकारक होतात.  म्हणजे सुख, दुख आणि उपेक्षा या तीन वेदनांचा अनुभव आपणास वारंवार येत असतो, आणि जितका जितका विचार करावा तितकी तितकी त्यांची अनित्यता स्पष्टपणे आपल्या निदर्शनास येते.

संज्ञा म्हणजे पदार्थमात्राची कल्पना.  स्त्री, पुरुष, गाई, बैल, वृक्ष, वनस्पति, यांमध्ये जो फरक दिसतो संज्ञेच्यायोगाने.  एकाच जड सृष्टीचे अनेक पदार्थ बनलेले असता जिच्यामुळे त्यांचे आपण भिन्न स्वरूपाने आकलन करीत असतो, त्या मानसिक शक्तीला संज्ञा म्हणतात.  वेदनास्कंध जसा अनित्य आहे, तसा संज्ञास्कंधहि आहे.  लहाणनणी निरनिराळी खेळणी किंवा पतंग वगैरे पदार्थ यांची संज्ञा जशी आनंदकारक होते, तशी ती मोठेपणी होत नाही.  तरुणपणी कादंबर्‍या किंवा असेच दुसरे वाङ्‌मय प्रिय असते, तसे ते वृद्धपणी नसते.  आज आपण ज्याच्याकडे मित्रभावाने पहातो, त्यानेच आपला काही भयंकर आपराध केला तर पूर्वीची संज्ञा पालटून त्याच्याविषयी शत्रुसंज्ञा, अथवा-आपण फारच सावधगिरीने वागलो तर - मध्यस्थसंज्ञा उत्पन्न होते.  ज्या तरुणीवर तरुण आसक्त होऊन तिची मर्जी संपादण्यासाठी प्राण खर्ची घालण्यास तयार असतो, तिचे प्रेम दुसर्‍या तरुणावर आहे असे समजून आल्याबरोबर त्याला तिचे दर्शन विषतुल्य वाटते.  तिच्याशी आपण मैत्रीने वागलो एवढा विचार देखील त्याच्या मनाला संताप देत असतो.  अशा रीतीने प्रिय-अप्रिय संज्ञाची वारंवार उलथापालथ होत असते.

संस्कारांचीही तीच गति.  आपण एखाद्या कर्मठ घराण्यात जन्मलो आहो असे समजा.  लहानपणापासून वडिलांच्या सहवासाने स्नानसंध्या करणे. देवांची पूजा करणे, असे संस्कार आपल्या अंगी खिळून गेल्यासारखे दिसतात, इतक्यात आपण समाजसुधारणा, स्वदेश, स्वराज्य, इत्यादिक विलक्षण चळवळींच्या तावडीत सापडलो, तर स्वतःलाच आश्चर्य वाटेल इतकी आपल्या संस्कारांत क्रांति होऊन जाते.  कित्येकांना केवळ मत्स्यमांसादिकांचे दर्शनही असह्य असते.  तेच एकदा विलायतची यात्र करून आले, म्णजे मत्स्यमांसाहाराचे गोडवे गाऊ लागतात.  अथवा ज्या कुळात मांसाहार पिढ्यानपिढ्या चालू आहे, अशा कुळात जन्म पावूनही कित्येक तो सोडून देतात, आणि शाकाहाराच्या प्रसारासाठी अत्यंत परिश्रम करतात.  अर्थात् असे संस्कार फारच थोडे आहेत की, ज्यांची लहानपणापासून सारखी उलथापालथ होत नसते.

चक्षुर्विज्ञान, श्रोतविज्ञान, घ्राणविज्ञान, जिव्हाविज्ञान, कायविज्ञान आणि मनोविज्ञान असे विज्ञानाचे सहा भेद आहेत.  त्यांचे फेरफार समजणे फार सोपे आहे.  लहान मूल तांब्यारूप्याची नाणी पहाते, पण ती आपल्या खेळण्याइतक्या किंमतीची नाहीत अशी त्याची समजूत असते.  पण तेच मूल मोठे झाल्यावर पैसे असले तर खाऊ विकत घेता येतो हे त्याला समजू लागते, व पुढ तरुणपणी क्रमाक्रमाने पैशांच्या सदुपयोगाचा आणि दुरुपयोगाचा त्याला बोध होतो.  एखादा सुज्ञ मनुष्य आपल्या आयुष्यातील एका वर्षाचे जर नीट परीक्षण करील, तर आपल्या विचारात क्रांती कशी होत चालली आहे, हे त्याला स्पष्ट दिसून येईल.  त्याशिवाय आता चक्षुर्विज्ञान, तर क्षणात श्रोत्रघ्राणादिक विज्ञान असा या विज्ञानाचा पालट क्षणोक्षणी होत असतो तो निराळाच.