समाधिमार्ग

समाधिमार्ग फार प्राचीन आहे. आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते, व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकाली अस्तित्वात होता.


विपश्यनाभावना 3

अशा रीतीने निर्भयपणे अनित्यतेची भावना केल्याबरोबर कोणत्याहि पदार्थाला पकडून राहिल्यास दुःख होते हे आपण जाणतो.  ज्या बाह्यसृष्टीत विलक्षण घडामोडी चाललेल्या आहेत, तिचाच एखादा भाग हा माझा बाग आहे, किंवा ही माझी शेतवाडी आहे, असे जो अज्ञ मनुष्य गृहीत धरून बसेल व त्यात आसक्त होऊन राहील, त्याला दुख होणे अगदी साहजिकच आहे.  बागाची नासाडी झाली किंवा दुसर्‍या काही कारणाने तो त्याच्या हातून गेला, तर त्याला अतोनात दुःख होते.  हीच गोष्ट इतर स्थिर आणि चर पदार्थांची आहे.

अरियपरियेसनसुत्तांत भगवान म्हणतो, ''भिक्षुहो, मी सुद्धा संबोधिज्ञान होण्यापूर्वी बोधिसत्वावस्थेत, स्वतः जराधर्मी असताना, जन्माच्या फेर्‍यात सापडलेल्या वस्तुंच्या (पुत्र, दारा, दासी, दास इत्यादिकांच्या) मागे लागलो होतो.  (म्हणजे माझे सुख त्यांजवर अवलंबून आहे असे मला वाटे.)  स्वतः जराधर्मी असताना, व्याधिधर्मी असताना मरणधर्मी असताना, शोकधर्मी असताना, जरा, व्याधि, मरण, शोक यांच्या फेर्‍यांत पडलेल्या वस्तूंच्याच मागे लागलो होतो.  तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की, मी स्वतः जन्म, जरा, मरण, व्याधि व शोक यांनी संबद्ध असता, त्यांनीच संबद्ध जे पुत्रदारादिक त्याच्या मागे लागलो आहे, हे ठीक नव्हे; तर मग मी या जन्मजरादिकांनी होणारी हानि पाहून अजात, अजर, अव्याधि, अमर आणि अशोक असे जो परमश्रेष्ठ निर्वाणपद त्याचा शोध करावा हे योग्य आहे.''  हा भगवंताचा बोधिसत्त्वावस्थेतील अनुभव सर्वांनाच लागू पडण्यासारखा आहे.

बाह्यसृष्टीतील पदार्थांना पकडून बसल्यास जसे दुःख होते, तसेच ते आपल्या पंचस्कंधाला पकडून बसल्यास होते.  आपले रूप असे रहावे किंवा तसे व्हावे असा आपण विचार केला तरी व्याधीच्या आणि जरेच्यायोगे ते भलत्याच स्थितीत जाते.  वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांचीहि हीच गोष्ट आहे.  त्यांना पकडून बसल्याने आपल्या दुःखात अधिक भर पडते, याचसाठी म्हटले आहे की, 'यदनिच्चं ते दुक्खं.'

जे दुःखकारक ते आत्मा होऊ शकत नाही.  आत्मा म्हणजे सुखदुःखातील कटस्थ, अविनाशी पदार्थ.  तो या पंचस्कंधात नाही, आणि म्हणूनच मनुष्यप्राण्यांमध्ये आपणाला कायमचा उच्चनीचपणा येणे शक्य नाही.  अलगद्दपमसुत्तांत भगवान म्हणतो, ''म्हणून भिक्षुहो, जे तुमचे नव्हे, ते सोडून द्या.  ते सोडून दिल्यास चिरकाल तुमचे हित होईल, चिरकाल तुम्हाला सुख मिळेल.  तुमचे काय नव्हे ?  रुप तुमचे नव्हे ... वेदना तुमच्या नव्हेत...संज्ञा तुमची नव्हे...संस्कार तुमचे नव्हेत...विज्ञान तुमचे नव्हे.  ते सोडा.  ते सोडल्यास चिरकाल तुमचे हित होईल, चिरकाल तुम्हाला सुख मिळेल.  भिक्षुहो, या जेतवनात पडलेला पालापाचोळा लोक घेऊन जातील, जाळतील.  किंवा त्याचे दुसरे काही तरी करतील.  त्या वेळी, 'आम्हांला लोक घेऊन जातात, जाळतात.  किंवा आमचे दुसरे काही तरी करतात,' असे तुम्हांला वाटेल काय ?''  भिक्षु म्हणाले, ''भदन्त, आमला असे वाटणार नाही; कारण, हा पालापाचोळा आमचा आत्मा किंवा आत्मीय नाही.''  भगवान् म्हणाला, ''त्याचप्रमाणे भिक्षुहो, रूप... वेदना...संज्ञा...संस्कार...विज्ञान तुमचे नाही.  ते सोडून द्या.  ते सोडून दिल्यास चिरकाल तुमचे हित होईल, चिरकाल तुम्हांस सुख मिळेल.''