बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 2

आधुनिक ऐतिहासिक दृष्टी आणि संशोधन पद्धती त्यांनी पूर्ण आत्मसात केली होती, त्यामुळे बुद्धचरित्र व बौद्ध धर्म यात वास्तविक सार काय आहे व असार काय आहे, याचा त्यांनी तपशीलवार पूर्ण निवाडा केला होता. बुद्धचरित्रामध्ये अनेक काल्पनिक व पौराणिक कथांची भर पाली व संस्कृत बौद्ध वाङमयात वारंवार पडत गेली. त्यामुळे भगवान बुद्ध हा मानव व्यक्ती म्हणून कोणी होऊन गेला की नाही, किंवा ती केवळ कल्पित कथा आहे, असा प्रश्न अनेक पश्चिमी संशोधकांनी निर्माण केला होता. संशयनिवारणार्थ इतिहाससंशोधकांनी भारतात बुद्धाच्या जन्मस्थानाच्या उत्खननांच्या द्वारे शोध चालविला व शोध लावला. बुद्धचरित्रातील वास्तव चरित्र भाग कोणता व कल्पित भाग कोणता याबद्दलचा निर्णय धर्मानंदांनी फार चांगल्या रीतीने केला. बुद्धपिता शुद्धोदन हा एक स्वतंत्र राजा होता असे पाली व बौद्ध वाङमयात वारंवार लिहिलेले सापडते. या सर्व वाङमयाचा झाडा घेऊन धर्मानंदांनी पुराव्यानिशी असे ठरविले की, बुद्धपिता शुद्धोदन हा स्वतंत्र राजा नव्हता तर एक संपन्न शेतकरी होता. बुद्धाचे गोत्रनाम यांचाही त्यांनी उलगडा करून‘सिद्धार्थ’किंवा‘गौतम’ही नावे निश्चित केली आणि सूर्य किंवा आदित्य हे गोत्र होय, असा निर्णय दिला. बुद्धाची माता मायादेवी ही वनात उभी असतानाच प्रसूत झाली, हेही ठरविले. राहूल हा पुत्राच्या जन्मानंतर बुद्धाने गृहत्याग सात दिवसांत केला, हीही गोष्ट अमान्य केली. राहूलची माता पहिल्या सात दिवसांतच निवर्तली; राहूलच्या बालपणी काही वर्षे बुद्धाने गृहत्याग केला नव्हता, असेही त्यांनी दाखवून दिले. बुद्ध किंवा सिद्धार्थ हा गृहत्याग करण्याच्या पूर्वीच समाधिमार्ग शिकला होता, गृहत्याग केल्यानंतर नव्हे. गृहत्यागाच्या अगोदर राजा शुद्धोदनाने त्याच्याकरिता अनेक प्रासाद बांधून त्याला जगातील शोकास्पद घटना दिसू नयेत आणि तो अनेक रमणींच्या सहवासात विलासात रमावा, अशी अवस्था त्या प्रासादांमध्ये केली होती, हीही गोष्ट नाशाबीत केली. सिद्धार्थाला छत्र सारथ्याने रथातून अनेक वेळा प्रासादातून बाहेर फिरावयास नेले, तेव्हा सिद्धार्थाला रोगी, जराजर्जर व्यक्ती, प्रेत आणि संन्यासी भिक्षू यांचे दर्शन झाले; त्यामुळे त्याला प्रपंचाबद्दल वैराग्य उत्पन्न झाले आणि त्यामुळे त्याने कायमचा गृहत्याग केला, हीही अत्यंत सुप्रसिद्ध कथा कल्पित कथा आहे हे धर्मानंदांनी आपल्या परिशीलनाने अनेक प्रमाणे दाखवून सिद्ध केले आहे यासंबंधी‘भगवान बुद्ध’या पुस्तकात धर्मानंद म्हणतात :“निदानकथेत ललितविस्तारात आणि बुद्धचरितकाव्यांमध्ये या प्रसंगाची रसभरित वर्णने आढळतात; आणि त्यांचा बौद्ध चित्रकलेवर चांगला परिणाम झाला आहे; परंतु त्यांच्यात तथ्य मुळीच नाही; किंवा फारच थोडे असावे असे वाटते. कां की, प्राचीनतर सूक्तांतून ह्या असंभाव्य दंतकथेला मुळीच आधार सापडत नाही.

“अरिय परियेसन सुत्तात स्वत: भगवान बुद्धाने आपल्या गृहत्यागसमयाची हकिगत दिली आहे, ती अशी :‘भिक्षू हो, असा विचार करीत असता काही काळाने, जरी मी त्या वेळी तरुण होतो, माझा एकही केस पिकला नव्हता, मी भर ज्वानीत होतो आणि माझे आईबाप मला परवानगी देत नव्हते, डोळ्यांतून निघणार्‍या अश्रुप्रवाहाने त्यांची मुखे भिजली होती, ते सारखे रडत होते, तरी मी शिरोमुंडन करून, काषायवस्त्रांनी देह आच्छादून घरातून बाहेर पडलो.

“हाच उतारा जसाच्या तसाच महासच्चक सुत्तात सापडतो. यावरून बोधिसत्त्व घरच्या माणसांना कळू न देता छत्रासह (अश्व) कथकावर स्वार होऊन पळून गेला, हे म्हणणे साफ चुकीचे आहे असे दिसते. बोधिसत्त्वाची खुद्द आई मायादेवी सातव्या दिवशी जरी निवर्तली असली, तरी त्याचे पालन महाप्रजापती गोमतीने स्वत:च्या मुलाप्रमाणेच केले; अर्थात वरील उतार्‍यात तिलाच बुद्ध भगवंताने आई म्हटले असले पाहिजे. शुद्धोदनाला व गोतमीला तो परिव्राजक होणार हे पुष्कळ दिवसांपासून माहीत होते, आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध व त्यांच्या समक्षच त्याने प्रव्रज्या घेतली हे या उतार्‍यावरून स्पष्ट होते.”(‘भगवान बुद्ध’, तिसरे मुद्रण, पृ. ६४)