बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 3

भारतामध्ये इ.स.पूर्व सहाव्या शतकापासून बौद्ध क्रांतीला प्रारंभ झाला आणि ती भारतभर पसरून तिने अर्धे जग व्यापले, अशा प्रकारची वैचारिक शक्ती काय होतो, याचे सुंदर व भव्य दर्शन धर्मानंदांच्या पुस्तकांमध्ये होते; विशेषत: त्यांच्या ‘भगवान बुद्ध’ आणि प्रस्तुतचे ‘बुद्धलीलासारसंग्रह’या दोन पुस्तकांमध्ये होते. सिद्धार्थाला वैराग्य प्राप्त झाले आणि त्याने तारुण्यात गृहत्याग केला याची कारणमीमांसा या दोन पुस्तकांचे वाचन केले असता उत्कृष्ट रीतीने सापडते. त्या वेळच्या राजकीय व सामाजिक अराजकतेतील दुरवस्थेमुळे तो चिंताक्रांत झाला होता, ही गोष्ट लक्षात येते. बुद्धाच्या वेळी भारतामध्ये शेकडो लहानलहान राज्ये होती. त्यापैकी महत्त्वाची सोळा राज्ये उत्तर भारतात होती. राजे संधी सापडताच एकमेकांच्या राज्यांवर आक्रमण करीत. महत्त्वाच्या राज्यांना अंकित असलेली लहानमोठी गणराज्ये सतत आपसात भांडत होती. बुद्ध ज्या गणराज्यात होता, ते गणराज्य अंकित होते. बुद्धाचा शाक्य गण व शेजारचा कोलिय गण यांच्यात सतत विग्रह चालू होता. राजांची राज्ये किंवा गणराज्ये यांच्यामध्ये केव्हा विग्रह सुरू होईल, रक्तपात होईल, याचा नियम नसे. अशा स्थितीत बुद्धाचे मन चिंताग्रस्त होऊन मानव जातीच्या भवितव्याबद्दल शंकाकुल बनले. प्रपंच हा दु:खमय आहे, याचा सतत प्रत्यय येत होता. परंतु या कालखंडात किंवा या युगात भारतीय संस्कृती ही प्रगल्भ दशेस आली होती, पारमार्थिक व ऐहिक विचारांची शास्त्रे व संप्रदाय निर्माण झाले होते. उपनिषदातील आध्यात्मिक विचार प्रौढ दशेस आला होता. बौद्ध साहित्यात पारमार्थिक विचारांच्या साठ संप्रदायांचा उल्लेख सापडतो; परंतु त्यातील सहांचे स्वरूप नीट कळते. हे सर्व संप्रदाय वैश्विक तत्त्वज्ञान आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान याबद्दलच्या मतभेदांनी भरलेले होते. यांच्यामध्ये वैदिक आर्यांचा संप्रदाय आणि वेदपूर्वकालापासून चालत आलेला श्रमणसंप्रदाय यांचा प्रभाव तुल्यबळ होता. वैदिक आर्यांचे यज्ञयागादी कर्मकांड हे ऐहिक आणि पारलौकिक सुखाचा व श्रेयाचा मार्ग म्हणून मान्य झाला होता. त्याचप्रमाणे श्रमणांचा तपश्चर्येचा मार्गही आपले प्राचीन अधिष्ठान बळकट करून बसला होता. वैदिक मार्ग हा एका अर्थाने भोगवादी व प्रवृत्तीमार्गी होता, तर श्रमणमार्ग हा आत्यंतिक तपश्चर्येचा निवृत्तीपर मार्ग होता. वरील अनेक संप्रदायांमध्ये परलोक व परमेश्वर न मानणारे काही भौतिकवादी संप्रदाय होते. काही संप्रदाय केवल नियतिवादी होते. त्यांचे मत असे होते की, माणसाचे कर्तृत्व हा भ्रम आहे. परिस्थितीची व विश्वाची दृढ व अपरिवर्तनीय बंधने अशी आहेत की, त्यामुळे माणसाला स्वत:चे चांगलेवाईट भवितव्य घडविणे अशक्य आहे. धर्म व अधर्म, नीती व अनीती यासंबंधी विवेक करून निश्चितपणे धर्म व नीती यांचा मार्ग अनुसरणे, हे माणसाच्या हाती नाही; मनुष्य भवितव्यतेच्या अधीन आहे.
भगवान बुद्धाने या वैचारिक आणि व्यावहारिक अराजकतेतून निश्चित मार्ग काढला व दाखविला. त्यास‘मध्यम वर्ग’किंवा ‘मध्यमा प्रतिपद’असे म्हटले आहे. राजांच्या आणि गणांच्या निरंतर चालू असलेल्या विग्रहांमुळे वा संग्रामांमुळे समाज, विशेषत: बहुजनसमाज अशांत व विपद्ग्रस्त होता. त्याकरिता भगवान बुद्धाने  दहा पारमितांचा व चार आर्यसत्यांचा उपदेश केला. दहा पारमिता म्हणजे दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, क्षांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा ह्या होत. ‘बुद्धलीलासारसंग्रहा’त बोधिसत्त्वाच्या पारमितासाधनेच्या आठ कथा प्रथम सांगितल्या आहेत. या ग्रंथाचे मुख्य तीन भाग असून पहिला भाग म्हणजे या आठ कथा होत. ही दहा पारमिता म्हणजे माणसांनी साध्य करावयाचे दहा अंतिम नैतिक धर्म होत. प्राचीन काळापासून आजपर्यंत झालेल्या नीतिशास्त्रांमध्ये या आदर्शाचे स्वयंपूर्णत्व केवळ भगवान बुद्धानेच सांगितले. बुद्ध धर्मातील एका संप्रदायात परमेश्वर म्हणजे पारमिताच होय, असा विचार कालांतराने रूढ झाला. पारमिता म्हणजे मानवाचे नैतिक जीवनाचे अंतिम स्वरूप होय. बुद्ध व तीर्थंकर यांनी उपदेशिलेल्या अहिंसा या परमाधर्माचा विधायक स्वरूपातला निष्कर्ष म्हणजे पारमिता होत. विशेषत: मैत्री पारमितेला म्हणजे विश्वव्यापी प्रेमतत्त्वाचा प्रभाव पडून बुद्धाच्या हयातीतच राजा अजातशत्रू, पसेनदिराजा, सिंह सेनापती, वैदिक ब्राह्मणांचे समुदाय, तपस्वी संप्रदाय बुद्धाकडे व बुद्धानुयायांकडे आकर्षिले गेले. बुद्धानंतर दोनशे वर्षांच्या कालावधीत भारतात मौर्य साम्राज्य स्थापित झाले आणि त्यातील श्रेष्ठ मौर्य सम्राट अशोक हा बुद्ध धर्माच्या आदेशाने भारला गेला व त्याने बुद्ध धर्माच्या प्रसाराला वेग आणला व याचे कारण विश्वव्यापी मैत्रीचा संदेश होय.

ईश्वर, आत्मा, परलोक, मरणोत्तर गती, पुनर्जन्म, जगाच्या उत्पत्तिस्थितिलयाचा कार्यकारणभाव इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह भारतात बुद्धाच्या काळी शिगेस पोहोचला होता. परलोक, पुनर्जन्म, ईश्वर, आत्मा इत्यादी गोष्टींवर विश्वास न ठेवणारे भौतिकवादी पंडितही त्या वेळी भारतात होते. अनेक आस्तिक व नास्तिक दर्शने वा तत्त्वज्ञाने उदयास येत होती. या प्रश्नांचा अंतिम नैतिक तत्त्वांशी संबंध जोडण्याचे प्रयत्न चालू होते. बुद्धाने असे सांगितले की ईश्वर, आत्मा, परलोक, मरणोत्तर गती यासंबंधीची तत्त्वे निश्चित होवोत न होवोत; अहिंसा, विश्वव्यापी मैत्री, विश्वव्यापी करुणा आणि सत्य त्याचप्रमाणे सत्याचे ज्ञान अथवा प्रज्ञा हीच मानवाची अंतिम उद्दिष्टे होत. वरील प्रश्न निश्र्चितपणे निकालात निघण्यासारखे नाहीत; ते अनिर्णीतच राहातात. नैतिक आदर्श हे मात्र मानवी दु:खाचा परिहार करण्याची निश्चिती साधने होत; तीच निश्चित साध्ये होत. हा बुद्धाचा नैतिक बुद्धिवाद नित्य अबाधित राहाणारा आहे. आजच्या सुधारलेल्या जगाला तर जवळच ठेवलेल्या विनाशातून वाचविणारा आहे. आत्मविषयक व विश्वविषयक तत्त्वज्ञानांच्या संघर्षातून बुद्धाने नैतिक तत्त्वज्ञान वेगळे काढले, ही बुद्धाची जगाला निखालस श्रेष्ठ देणगी आहे. या संदर्भात बुद्धाचे अनेक संवाद मार्गदर्शक ठरतात. त्या संवादांपैकी बुद्धाचा शिष्य मालुंक्यपुत्र नावाचा भिक्षू आणि स्वत:  भगवान यांचा संवाद लक्षात ठेवण्यासारखा आहे. (‘बुद्धलीलासारसंग्रह’, द्वितीयावृत्ती, पृष्ठे २६८-२६९.)