या परगण्यांतील लोकांमध्यें पूर्वी इतकीं भांडणें होत असत, कीं, त्यांचा निकाल करीत असतां ग्रामभोजकाला जेवण्याला सुद्धां फुरसत मिळत नव्हती; पण आतां ग्रामभोजकानें सारा दिवस तक्क्याशीं टेंकून जांभया देत बसावें, व कचेरीची वेळ संपल्यावर घरीं जावें, असा प्रकार सुरू झाला. ग्रामभोजकानें आपल्या परगण्यांतील लोकांमध्यें इतकें स्थित्यंतर कसें झाले, याची चौकशी करतां, मघ आणि त्याचे तीस अनुयायी यांनीं ही सगळी क्रांति घडवून आणिली असल्याचें त्याला आढळून आलें. तेव्हां या तिसांचीहि या प्रदेशांतून उचलबांगडी केल्याशिवाय हे लोक पूर्वस्थितीवर येणार नाहींत, असा विचार करून कांहीं जरूरीच्या कामासाठीं आपण मगधदेशाच्या राजाची भेट घेण्यास जातों, असें आपल्या हाताखालच्या लोकांनां सांगून त्यानें एकदम राजधानीचा रस्ता धरला.
मगधदेशाचा त्या काळचा राजा मोठा चैनी असे. त्याची भेट होणें फार कठिण असे. तथापि ग्रामभोजकानें आपल्याबरोबर आणलेला मोठा नजराणा राजाला देऊन मोठ्या प्रयत्नानें त्याची एकदांची भेट घेतली. राजानें ग्रामभोजकाच्या आगमनाचें कारण विचारल्यावर तो म्हणाला “महाराज, काय सांगावें! आमच्या प्रदेशांत तीस दरोडेखोर आणि त्यांचा नायक मघ यांनीं फारच कहर करून सोडला आहे. सारे लोक गांव सोडून पळत आहेत, व या दरोडेखोरांच्या भीतीनें आमच्या प्रदेशांत दुसरे लोक येत नाहींत. याप्रमाणें व्यापार-धंदा, शेती वगैरे सर्व कामें बंद पडलीं आहेत. यापुढें आपणाला आमच्या परगण्यांतच नव्हे, पण आसपासच्या सर्व प्रांतांत देखील कर वसूल करतां येणार नाही!”
राजा अतिशय संतापून म्हणाला “ही गोष्ट तुम्हीं मला कळविलीत हें उत्तम झालें. तुमच्याबरोबर मी कांहीं फौज देतों, तिच्या साहाय्यानें तुम्ही त्या दरोडेखोरांनां पकडून घेऊन या.”
ग्रामभोजकानें आपल्या परगण्यांत जाऊन मघाला व त्याच्या साथीदारांनां पकडलें. त्यांनीं कोणत्याहि प्रकारें ग्रामभोजकाचा प्रतिकार केला नाहीं. “तुम्हांला पकडण्यासाठीं राजाचा हुकूम आहे,”असें म्हटल्याबरोबर ते आपण होऊन स्वाधीन झाले. ग्रामभोजकानें त्यांच्या हातापायांत बेड्या घालून त्यांनां पकडून आणल्याची वर्दी राजाला दिली. त्या वेळीं राजा अंत:पुरांत होता. त्याला दरोडेखोरांनां पहाण्यास सवड नव्हती. त्यानें तेथूनच हुकूम सोडला, कीं “ दरोडेखोरांनां राजांगणांत पालथे पाडून त्यांच्या अंगावरून हत्ती चालवावा!”
राजाच्या हुकुमाप्रमाणें मघाच्या आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या बांधून त्यांनां पालथें पाडण्यांत आलें, व हस्तिशाळेंतून एक महोन्मत्त हत्ती त्यांच्यावर सोडण्यास सज्ज करण्यांत आला.
मघ आपल्या अनुयायांनां म्हणाला “मित्र हो, आजपर्यंत आपण सदाचरणांत काळ घालविला आहे. आतां आपणांपैकीं कांहींजणांनां असें वाटण्याचा संभव आहे, कीं, सदाचरणानेंच मनुष्य सुखी होतो असें नाहीं; आम्ही आमचें आयुष्य सत्कर्मामध्यें घालविलें असतां आमच्यावर हें संकट कसें ओढवलें? पण मित्र हो, या समयीं असला विचार देखील तुमच्या मनाला शिवूं देऊं नका. इहलोकींचे व्यवहार जरी न्यायाचे नसले, तरी परलोकीं आमच्या कर्माचें यथायोग्य फल आम्हांला मिळणार आहे. या लोकीं एकादा लबाड मनुष्य पुष्कळ संपत्ति मिळवितो, दुसरा एकादा सत्पुरुष आजन्म दारिद्र्यामध्यें लोळत असतो. तेव्हां इहलोकींच्या व्यवहारामध्यें माणसाला यथायोग्य न्याय मिळत नाहीं, हें उघड आहे. परंतु आमच्या कर्मांनी आम्ही इतके बद्ध झालों आहोंत, कीं, त्यांजपासून परलोकीं आमची सुटका होणें अत्यंत शक्य आहे. तेव्हां आमचीं कर्मेच आमचे रक्षक (पोलीस), व आमचीं कर्मेच आमचे न्यायाधीश होतील, हें पक्कें लक्षांत ठेवा. आतां तुमच्या मनाला वाईट वाटत असतां जर तुम्हांला मरण आलें, तर त्याचा परिणाम अत्यंत अनिष्ट होणार आहे. कां, कीं, मनुष्याच्या मनाला तळमळ लागून मरण आलें असतां पुनर्जन्मामध्यें तो हीन योनींत जन्म पावतो, असें ऋषिमुनींचें वचन आहे. म्हणून या प्रसंगीं तुमची मैत्री-भावना दृढ करा. जसें तुमचें लोकांवर प्रेम होतें, त्याचप्रमाणें तें तुमच्याविरुद्ध फिर्याद करणार्या ग्रामभोजकावर, तुम्हांला मारण्याचा हुकूम देणार्या राजावर व तुम्हाला मारण्यास प्रवृत्त झालेल्या या हत्तीवर असूं द्या. शत्रु, मित्र, उदासीन आणि आत्मा हा भेद सोडून सर्वांवर सारखी मैत्री असूं द्या. एका देहाचे जसे भिन्न अवयव असतात, तसेच आम्ही एका विश्वाचे अवयव आहोंत, ही समजूत ढळूं देऊं नका. आजपर्यंत केलेल्या सत्कृत्यांचें तुम्ही या प्रसंगीं सिंहावलोकन करा!”