बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 12

मघाच्या वचनाप्रमाणें त्या सर्वांनी त्या हत्तीवर, राजावर आणि ग्रामभोजकावर मैत्रीची भावना केली. त्यांच्या देहाला जरी हे प्राणी अपाय करणारे होते, तरी त्यांच्या प्रेमभरित अंत:करणाला ते हितकर्तेच वाटूं लागले. हा ग्रामभोजक, हा राजा आणि हा हत्ती हे आम्हांला या नश्वर जगांतून मुक्त करीत आहेत, तेव्हां यांनां आम्ही आमचे शत्रु कसें म्हणावें? असें ते म्हणूं लागले!

हत्ती हा प्राणी मोठी बुद्धिमान् असतो. त्याला मनुष्यापेक्षांदेखील दुसर्‍या प्राण्याचें अंत:करण अधिक ओळखतां येतें. जेव्हां मघाला आणि त्याच्या साथीदारांनां मारण्यासाठीं माहुतानें हत्ती पुढें आणिला, तेव्हां मोठ्यानें किंकाळी फोडून तो एकदम मागें सरला. कांहीं केल्या तो त्यांच्या अंगावरून जाईना! पुन: दुसरा, तिसरा, असे दोनचार भिन्नभिन्न हत्ती आणण्यांत आले; पण ते सर्व माहुताच्या अंकुशाला न जुमानतां किंकाळी फोडून मागें हटले. कोणत्याहि हत्तीपासून मघाला आणि त्याच्या साथीदारांनां उपद्रव पोंचला नाहीं!

हें वर्तमान राजाला समजतांच तो म्हणाला “या लोकांनां हत्तीचा मंत्र माहीत असला पाहिजे, किंवा यांच्याजवळ कांहीं औषध असलें पाहिजें, की, ज्याच्यायोगें हत्ती यांच्याजवळ जाण्यास धजत नाहीं.”

राजाच्या आज्ञेवरून बोधिसत्वाला व त्याच्या साथीदारांनां शिपायांनीं राजासमोर नेऊन उभें केलें. राजानें त्यांच्यापाशीं औषध आहे कीं काय, हे पाहण्यासाठीं त्यांची झडती घेवविली. परंतु कांहीं सांपडलें नाही. तेव्हां राजा त्यांनां म्हणाला “तुम्हांला हत्तीचा मंत्र माहीत असला पाहिजे. नाहींतर हत्ती तुमच्या अंगावरून चालून जात नाहीं हें कसें?”

बोधिसत्व म्हणाला “महाराज, आमचा मंत्र म्हटला, म्हणजे आजपर्यंत आम्ही एकनिष्ठेनें शीलाचें पालन करीत आलों आहों, जाणूनबुजून आम्हीं कोणत्याहि प्राण्याचा घात केला नाहीं; दुसर्‍याच्या वस्तूंचा आम्हीं अपहार केला नाहीं; परस्त्रियेला आम्ही मातेसमान मानतों; असत्य भाषण आम्हीं कधींहि केलें नाहीं; आणि मद्यादि मादक पदार्थांपासून आम्ही अलिप्त राहिलों आहों. याशिवाय आपल्या लोकांची सेवा आम्ही यथामति करीत आलों आहों. आमच्यावर एकाएकीं जेव्हां हा प्रसंग आला, तेव्हां मीं माझ्या मित्रांनां बजावलें, कीं, आम्हांला पकडणार्‍या ग्रामभोजकावर, मारण्याचा हुकूम देणार्‍या महाराजांवर व मारणार्‍या हत्तीवर आपण सर्वांनीं मैत्रीची भावना करावी, कोणत्याहि प्रकारें द्वेष आमच्या मनाला शिवतां कामा नये. आमच्या या शीलाचा आणि मैत्रीचा प्रभाव हाच काय तो आमचा मंत्र होय!”

राजानें आपले दूत पाठवून मघाच्या गांवाची व आसपासच्या प्रांताची खरी स्थिति काय आहे, याची चौकशी केली, तेव्हां त्याला आढळून आलें, कीं, बोधिसत्व व त्याचे साथीदार यांनीं त्या प्रांताची उत्तम सुधारणा केली आहे; तेथले लोक फारच सुखी असून परस्परांशीं ते अत्यंत प्रेमाने वागत आहेत. चोर्‍या, मारामार्‍या, फिर्यादीअर्यादी वगैरे गोष्टी त्या प्रांतांतून नामशेष झाल्या आहेत; तेव्हां राजानें त्या खोटी फिर्याद करणार्‍या ग्रामभोजकाला धरून एकदम फांशीं देण्याचा हुकूम केला, आणि त्याच्या जागीं मघाला नेमण्यांत आलें. तेव्हां बोधिसत्व राजाजवळ जाऊन त्यानें ग्रामभोजकाला माफी देण्याची विनवणी केली. तो म्हणाला “महाराज! हा ग्रामभोजक नसता, तर आम्हांला आपल्या दर्शनाचा योग आला नसता. आमच्या शीलाला आणि मैत्रीला कसोटीला लावून पहाण्याची यानें संधि आणून दिली, म्हणून हा आम्हांला प्रिय आहे. तेव्हां महाराजांनीं याला जीवदान द्यावें, अशी आमची नम्र विनंति आहे.”