[५]
महाजनकजातक
प्राचीन काळीं विदेहराष्ट्राच्या मिथिला नामक राजधानींत महाजनक राजा राज्य करीत असे. त्याला अरिष्टजनक आणि पौलजनक हे दोन पुत्र होते. महाजनकाच्या मरणानंतर अरिष्टजनकाला गादी मिळाली, व आपल्या धाकट्या भावाला त्यानें युवराज केलें. युवराजाचे आणि प्रधानमंडळाचें कांहीं कारणांमुळें पटेनासें झालें. तेव्हां त्यांनीं युवराजाचें व राजाचें वैमनस्य आणण्याचा एक कट रचला. राजाची त्यांनीं अशी समजूत करून दिली कीं, राजाला मारून युवराज गादी बळकावूं पहात आहे. अरिष्टजनकाचा स्वभाव उतावळा असल्यामुळें, आणि त्याला खोल विचार करण्याची सवय नसल्यामुळें, प्रधानांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्यानें पौलजनकाच्या पायामध्यें बेड्या ठोकून त्याला अंधारकोठडींत कोंडून ठेविलें.
पौलजनक तुरुंगांतून मोठ्या युक्तीनें सुटून पळाला, व त्यानें जंगलाचा आश्रय केला. तेथल्या लोकांनां वश करून घेऊन त्यानें राजाच्या विरुद्ध मोठें बंड उभारलें. आसपासचा मुलूख काबीज करून आपलें सैन्य वाढवीत वाढवीत त्यानें खुद्द मिथिला नगरीवर स्वारी केली. अरिष्टजनक आपल्या भावाला शासन करण्यासाठीं स्वत: रणांगणावर गेला; परंतु तो या लढाईंत पौलजनकाच्या योद्ध्यांकडून मारला गेला. हें वर्तमान तेव्हांच सर्व शहरांत पसरलें. अरिष्टजनकाची पट्टराणी गरोदर होती. पौलजनक आपल्या भावाचा सूड उगविण्यासाठीं आपणाला ठार मारील, असें वाटून तिनें पौलजनक राजा होण्यापूर्वीच कोठेंतरी पळून जाण्याचा बेत केला; परंतु तिला आपल्या दासीजनांचा देखील भरंवसा वाटेना. तेव्हां तिनें कोणत्याहि माणसाला नकळत आपले दागदागिने एका टोपलींत भरून त्यावर तांदूळ पसरले, आणि स्वत: जुनेंपुराणें लुगडें नेसून हीनवेषानें ती मिथिलेंतून बाहेर पडली. लोक नुकत्याच झालेल्या राजक्रांतीच्या गडबडींत असल्यामुळें तिला कोणीं ओळखिलें नाहीं.
नगराच्या बाहेर निघाल्यावर तिला एक गाडीवान भेटला. त्याच्या गाडींत बसून ती चंपानगराला गेली. तेथें एका नामांकित औदिच्य ब्राह्मणाची तिनें गांठ घेऊन सर्व वर्तमान त्याला विदित केलें. त्यानें ही आपली बहीण आहे असें लोकांनां सांगून तिचें आपल्या खर्या बहिणीप्रमाणेंच पालन केलें. नवमास पूर्ण झाल्यावर तिला एक मुलगा झाला. त्याला त्याच्या आज्याचें महाजनक हेंच नांव ठेवण्यांत आलें. त्या ब्राह्मणानें त्याला वेदांमध्यें आणि इतर शास्त्रांमध्यें पारंगत केलें. महाजनक आपल्या सोबत्यांबरोबर खेळत असतां त्याला हिणवण्यासाठीं ते म्हणत असत, कीं, 'हा विधवापुत्र मोठा दांडगा आहे!' महाजनकाला आपला बाप कोण हें ठाऊक नव्हतें. एके दिवशीं आपल्या आईजवळ जाऊन आपल्या बापाचें नांव सांगण्यासाठीं त्यानें अतिशय हट्ट धरला. तिनें त्याला खरी गोष्ट सांगितली. तेव्हांपासून विधवापुत्र म्हटलें असतां तो आपल्या सोबत्यांवर चिडत नसे; परंतु आपण मिथिलेचें तक्त कधींना कधीं काबीज करूं, अशी तीव्र महत्त्वाकांक्षा त्याच्या मनामध्यें एकसारखी वृद्धिंगत होत गेली.
महाजनक वयांत आल्यावर आपल्या आईला म्हणाला "आई, माझ्या वडिलांची गादी मिळविण्यासाठीं मी उत्कंठित झालों आहें. तुझ्यापाशीं बरोबर आणिलेलें कांहीं जडजवाहीर असेल, तर तें मला दे. तें विकून त्या भांडवलावर मी पुष्कळ पैसा कमवीन, व मोठें सैन्य जमवून माझ्या चुलत्यापासून माझ्या पित्याचें राज्य मी परत घेईन."