बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 22

दुसरा म्हणाला "हे पंडित, तूं या मनुष्यावर बिलकूल विश्वास ठेवूं नकोस. हा मोठा लबाड आहे. मी माझ्या घरचे हे बैल घेऊन बाजारांत विकावयाला जात असतां हा मनुष्य वाटेंत भेटला, व हे बैल आपले आहेत असा तंटा करूं लागला."

बोधिसत्व म्हणाला "मीं दिलेला न्याय तुम्हांला पसंत पडेल काय?"

त्या दोघांनी बोधिसत्वानें दिलेला निवाडा मान्य करण्याचें कबूल केलें. तेव्हां बोधिसत्वानें एकाला तेथें ठेवून दुसर्‍याला दुसर्‍या ठिकाणी नेऊन ठेविलें, व तेथें जमलेल्या सर्व लोकांसमक्ष पुन: एकवार सर्व हकीगत विचारून घेतली. त्या मनुष्यानेंहि आपण हे बैल बाजारांत विकण्यासाठीं घेऊन जात होतों, इत्यादि पूर्ववत् सांगितलें. तेव्हां त्याला बोधिसत्वानें असा प्रश्न केला, कीं, "या बैलांनां तूं आज काय चारलें आहेस?"

तो म्हणाला "मी यांनां तिळांची पेंड आणि तांदुळांची कांजी चारली आहे."

बोधिसत्वानें तेथें जमलेल्या सर्व मंडळीला त्याचें म्हणणें नीट ध्यानांत ठेवण्यास सांगून त्याला तेथून अन्य ठिकाणीं नेवविलें, आणि त्याच्या प्रतिपक्ष्याला तेथें आणिलें. त्यानें आपण झाडाखालीं निजलों असतां बैल जंगलांत पळून गेले, इत्यादि हकीगत सांगितल्यावर बोधिसत्व त्याला म्हणाला "पण तूं आज या जनावरांनां काय काय चारिलें आहेस?"

तो म्हणाला "मी यांनां दुसरें काय चारणार? सकाळपासून ते केवळ जंगलांतील गवत खाऊन आहेत."

बोधिसत्वानें सभास्थानांतील लोकांनां त्याचें हें म्हणणें नीट लक्षांत घेण्यास सांगितलें; आणि प्रियंगु वल्लीचीं पानें आणवून बारीक कुटून त्यांचें पाणी त्या बैलांनां पाजिलें. त्यायोगें बैलांनीं थोडक्या अवकाशांत मलोत्सर्ग केला. पण शेणामध्यें तिळांच्या पेंडीचा अंशदेखील दिसून आला नाहीं. तेव्हां बोधिसत्व त्या दोघांनांहि तेथें आणवून म्हणाला "जो गृहस्थ आपण निजलों असतां बैल जंगलांत शिरले असें म्हणतो, तो या बैलांचा खरा मालक आहे, व जो आपण तिळांची पेंड चारली असें म्हणतो, तो तोतया आहे."

बोधिसत्वानें दिलेला न्याय सभागृहांतील सर्व लोकांनां पसंत पडला. तोतयानें आपला गुन्हा कबूल केला. पुनरपि असलें दुष्कृत्य न करण्याविषयीं त्याला बोधिसत्वानें बजावून सांगितलें, व बैल खर्‍या मालकाच्या हवालीं केले. तेव्हां तेथें जमलेले सर्व लोक बोधिसत्वाच्या बुद्धिमत्तेची तारीफ करीत आपापल्या घरीं निघून गेले.

एके दिवशी एक स्त्री आपल्या मुलाला घेऊन महौषधाच्या तलावावर अंग धुण्यास आली. मुलाला कांठावर ठेवून अंग धुण्यासाठीं ती खालीं उतरली असतां एक यक्षिणी तेथें येऊन तिला म्हणाली "कायग, हा तुझा मुलगा आहे काय? हा किती तरी गोजिरवाणा दिसतो! याला मी थोडें दूध पाजूं काय?"

मुलाची आई म्हणाली "कांहीं हरकत नाहीं."

यक्षिणीनें त्या मुलाला पाजून व क्षणभर खेळवून त्याला घेऊन ती जाऊं लागली. तेव्हां तिचें व त्या मुलाच्या आईचें भांडण जुंपलें. तेथें जमलेल्या लोकांनीं त्या दोघींनां मुलासहवर्तमान बोधिसत्वासमोर आणून उभें केलें.

बोधिसत्व म्हणाला "माझा निवाडा तुम्ही कबूल कराल काय?"