बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 40

याप्रमाणें विचार करून ती देवता एकदम परलोकांत गेली, आणि इंद्राची भेट घेऊन ते त्याला हे वर्तमान कळविलें. इंद्र तिला म्हणाला “त्या चोराला क्रूर पापापासून परावृत्त करण्याचें सामर्थ्य माझ्या अंगी नाही. थोर पापांमुळे त्याची ज्ञानदृष्टि इंतकी मंद झाली आहे, की, मला ओळखण्याचें सामर्थ्य त्याच्या अंगी नाही. या पापमार्गापासून त्याला परावृत्त करण्याचा एकच उपाय मला सुचतो; तो हा, की, सुतसोम राजकुमाराची आणि त्याची गाठ घालून द्यावी. सुतसोम आपल्या शीलतेजानें त्याची पापबुद्धि जाळून टाकील आणि पुण्यबुद्धि प्रकाशित करील.”

इंद्राचे हे भाषण ऐकून देवता त्याच क्षणी आपल्या जागी आली, आणि भिक्षुवेषाने ब्रह्मदत्ताजवळ गेली. ब्रह्मदत्त आपली तलवार घेऊन तिला मारण्यास धांवला, परंतु तिचा पाठलाग त्याला करता आला नाही. तेव्हा तो म्हणाला “अरे भिक्षु मला भिऊन असा पळतोस का? तूं जर खराखुरा संन्यासी आहेस, तर जीविताची तुला इतकी पर्वा नसावी!”

भिक्षुवेषधारिणी देवता म्हणाली “अरे चोरा, मी पळत नसून स्थिरच आहे. परंतु तुझ्या या पापकर्मामुळें तूंच अस्थिर आहेस, जणू काय तूं इतस्तत: धावंत आहेस!”

हें त्या भिक्षूचें भाषण ऐकून ब्रह्मदत्त जरा वरमला व म्हणाला “मी जरी पापी आहे, तरी माझे वचन मी पाळीत आलों आहें. माझ्या देवतेला केलेल्या नवसाप्रमाणें उद्या मी शंभर राजकुमारांना मारून यज्ञ करणार आहे.”

भिक्षु म्हणाला “या बाबतीत देखील तूं लबाडी केली आहेस! देवता आपल्या प्रिय वस्तूचा बळी द्यावा अशी वहिवाट आहे, परंतु तुझ्या आवडत्या सुतसोमाला वगळून बाकी राजकुमारांनाच तूं बळी देत आहेस? या तुझ्या कृत्याने तुझी देवता कधीही प्रसन्न होणार नाही!”

असें बोलून देवता तेथेंच अंतर्धान पावली.

ब्रह्मदत्ताला या भिक्षूचे बोलणे खरे वाटलें. भिक्षुवेषानें आपली देवताच पुढे आली असावी, अशी त्याला शंका आली. तो आपणाशीच म्हणाला “मी सुतसोमाला वगळलें हे ठीक केले नाही. देवतांची तृप्ति करण्यासाठी खरें भक्त आपल्या मुलाचा देखील बळी देत असतात! मग सुतसोमानें बाळपणांत माझ्यावर थोडाबहुत उपकार केला होता, म्हणून त्याला बळी न देणे हे माझ्या देवतेला पसंत कसे पडेल?”

त्याच दिवशी सुतसोमाला धरून आणण्याचा ब्रह्मदत्तानें विचार केला, परंतु राजवाड्यांतून सुतसोमाला उचलून आणणें शक्य नव्हतें. आता कोणती युक्ति योजावी, अशा विवंचनेत ब्रह्मदत्त बसला असतानां त्याचें लक्ष्य आकाशातील तार्‍यांकडें गेलें.

ज्योति:शास्त्रांत त्याची बरीच गति असल्यामुळे आकाशांतील तार्‍यांकडे पाहून दुसर्‍या दिवशी सकाळी पुष्यनक्षत्राचा योग येणार आहे, हें त्याला समजलें. पुष्यनक्षत्राचा योग आला असतां राजे लोक आपल्या तलावावर किंवा नदीवर स्नानाला जात असत. ब्रह्मदत्तानें सुतसोमाला तलावांत स्नानाला उतरल्याबरोबर पकडून आणण्याचा बेत करून पहाटेंस इंद्रप्रस्थनगराबाहेर सुतसोमाने आपणासाठी बांधिलेल्या तलावांत एका कमलिनीखाली तो दडून बसला.

सुतसोम युवराज विद्येचा मोठा भक्त आहे, अशी कार्ति ऐकून तक्षशिला नगरीतील एक ब्राह्मण प्राचीन काळी कश्यप बुद्धानें झटलेल्या चार गाथा (श्लोक) पाठ करून इंद्रप्रस्थ नगराला आला. तो पुष्यनक्षत्राच्या योगाच्या पूर्वदिवशी इंद्रप्रस्थ नगराच्या जवळच्या गावी येऊन पोहोचला. रात्र फार झाल्यामुळे आणि थकवा आल्यामुळें त्याने असा विचार केला, की, आजची रात्र येथेंच मुक्काम करून उद्या सकाळीं युवराजाच्या दर्शनाला जावें.

सुतसोम पुष्यनक्षत्राच्या योगाच्या वेळी स्नानाला जात असतां वाटेंत या ब्राह्मणाची गांठ पडली. ब्राह्मणानें हात उभारून युवराजाला आशीर्वाद दिला. सुतसोम रथांतून खाली उतरला, आणि ब्राह्मण कोठून कां आला, याची त्याने विचारपूस केली.
ब्राह्मण म्हणाला, “महाराज, आपण विद्येचे मोठे भोक्ते आहं, अशी आपली किर्ती ऐकून तक्षशिलेहून मी येथपर्यंत चालत आलों आहे. मी मजबरोबर प्रत्येकी शंभर कार्षापण किमतीचे चार श्लोक आणिले आहेत, ते आपण ऐकून घ्यावे व आपणाला पसंत पडल्यास मला योग्य बिदागी द्यावी.”

सुतसोम म्हणाला “मी आतां स्नानाला चाललों आहें. पुष्यनक्षत्राचा योग असता स्नान करावें, असा शास्त्राचा नियम आहे. तेव्हा तुम्ही सध्या मी परत येईपर्यंत सांगतो त्या ठिकाणी विश्रांति घ्यावी.”