बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


बुद्धचरित्र (भाग दुसरा) 9

कांही पावले पुढे गेल्यावर सिद्धार्थाच्या मनांतून आपल्या आवडत्या कपिलवस्तूचे दर्शन घेण्याचा विचार आला. तेव्हा त्याने कंथकाला वळवून एकवार कपिलवस्तूवर नजर फेंकली, व तो छन्नाला म्हणाला “छन्न! माझ्या या आवडत्या नगराचा मी आज शेवटला निरोप घेत आहे. आज जसे आकाशांतील ढगांनी चंद्रदर्शन अस्पष्ट झाले आहे, तद्वत् परस्परविरोधी विचारांनी माझ्या मानसिक शांतीचाहि लोप झाल्यासारखा दिसत आहे. पण तिचा अगदीच लोप झालेला नाही. चंद्रावरील अभ्रे जाऊन हा चंद्र लवकरच आपल्या शीतकिरणांनी जगताला निववील, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. त्याचप्रमाणे माझ्या मनांतील परस्परविरोधी विचारांचे निरसन होऊन माझा शांतिचंद्र पूर्णपणे प्रकाशूं लागेल व त्यामुळे सर्व लोकांना सुख होईल, अशी मला बळकट आशा वाटत आहे; आणि असे झाले, तरच मी माझ्या या आवडत्या कपिलवस्तूची पुन: भेट घेईन; पण माझ्या प्रयत्नांत मला यश न आल्यास कपिलवस्तूचें हेंच शेवटले दर्शन होणार आहे! छन्न, चल आपण आतां राजगृहनगराचा मार्ग धरू. या नगराच्या आसपास पुष्कळ तपस्वी आहेत, असे माझ्या ऐकण्यांत आले आहे. ते मला खरा मार्ग दाखवून माझ्या शंकांचे समाधान करितील, अशी मी आशा बाळगितो.”

त्या दिवशी सिद्धार्थानें घोड्यावरून खाली न उतरता तीन राज्यें आक्रमण केली व तो दुसर्‍या दिवशी अनीम नांवाच्या नदीच्या कांठी आला. तेथे घोड्यावरून उतरून त्यानें त्याला छन्नाच्या स्वाधीन केले आणि म्हटले, “माझ्या आवडत्या छन्ना! आतां तूं कंथकाला घेऊन माघारा जा. येथून पुढे मी पायांनीच प्रवास करणार आहे. माझ्या या शूर कंथकाने मला फार मदत केली. याचा वियोग मला माझ्या आप्तांपेक्षांहि दु:सह होत आहे. तथापि भावि कर्तव्यावर नजर देऊन मला तो सहन केला पाहिजे.”
छ्न्न म्हणाला “हे आर्यपुत्र! आपल्याला एकटे टाकून मी कोणत्या तोंडाने कपिलवस्तूला जाऊं? शुद्धोदनमहाराजांनी आपली प्रवृत्ति विचारली असतां मी त्यांना काय सांगू? आपले व माझे आप्तइष्ट मला काय म्हणतील?”

सिद्धार्थ म्हणाला “छन्ना! तूं अशा विवंचनेत पडू नको. आजपर्यंत माझा शब्द तूं खाली ठेविला नाहीस. कंथकला सज्ज करून आण म्हणून सांगितल्याबरोबर ‘तुम्ही कोठे जाता’ हादेखील प्रश्न तूं मला विचारला नाहीस, पण आतां मात्र तू माझ्या सांगण्याप्रमाणें वागण्यास तयार नाहीस. हे माझे अलंकार नेऊन माझ्या पित्यासमोर ठेव, आणि त्याला माझा असा निरोप सांग, की, तुमचा पुत्र राजाच्या नश्वर सुखांत समाधान मानत नाही. जगामध्ये शाश्वत सुख आहे की, नाही याचा शोध करण्याचा त्याने निश्चय केला आहे; आणि जर त्याला अशा सुखाचा शोध लागला, तरच तो परत आपल्या दर्शनाला येईल; न लागला, तर त्याचा हा शेवटला नमस्कार समजावा.”

सिद्धार्थाचे भाषण चालले असता छन्नाच्या डोळ्यांतून एकसारखा अश्रुप्रवाह चालला होता. तो मोठ्याने सुस्कारून म्हणाला “आर्यपुत्र आजपर्यंत मी आपला शब्द खाली ठेविला नाही, ही गोष्ट खरी आहे, परंतु आपला माझा वियोग होण्याचा प्रसंगहि कधीच नाही. आपण माझ्याबरोबर असलां, तर वाटेल ती गोष्ट करण्यास मला कशाचीहि भीति वाटत नाही. पण आज आपण माझ्यापासून कायमचे दूर होऊ पहातां, जणू काय माझा आत्मा माझ्या जड देहाला सोडून चालला आहे. राजपुत्र! माझी आपल्याला हीच विनंति आहे की, आपण मला आपल्यापासून विभक्त करूं नये!”

सिद्धार्थ म्हणाला, ‘छन्न, तुझी स्वामिभक्ति वाखाणण्याजोगी आहे. पण लोकस्थितीची तुला अद्यापि नीट कल्पनी झालेली नाही. मी आणि तूं जरी एकत्र रहिलो, तरी शेवटी मृत्यू आम्हांला विभक्त करीलच करील. या निर्घृण मृत्यूच्या दाढेंतून सुटला, असा प्राणी कोण आहे? मृत्यू आईची आणि मुलाची, पित्याची आणि पुत्राची, पत्नीची आणि पतीची, मित्रमित्रांची आणि आप्तआप्तांची ताटातूट करण्यास कधीही मागे पुढे पहात नाही. तेव्हा हा कधींना कधी होणारा वियोग जर आजच घडला, तर त्यामुळे तूं शोकाकुल का व्हावेस? आणखी दुसरें असे आहे की, हा माझा वियोग काही कायमचा नव्हे. जर मला सद्धर्मबध- झाला आणि तो होईल अशी मला बळकट आशा आहे- तर माझी आणि तुझी पुन: भेट होणारच आहे. तेव्हा शोक आवरून तूं माझ्या सांगण्याप्रमाणे वाग.”

छन्नानें पुष्कळ आढेवेढे घेतले, पण सिद्धार्थापुढे त्याचे काही चालले नाही. सिद्धार्थाचे अलंकार घेऊन व कंथकाचा लगाम धरून तो कपिलवस्तूला जाणार्‍या रस्त्याकडे वळला; पण शूर कंथकाला आपल्या धन्याचा वियोग बिलकूल सहन झाला नाही. त्याने मोठ्यानें किंकाळी फोडून आपले अंग जमिनीवर टाकले, आणि तेथेच प्राण सोडला! कंथकाच्या मरणानें छन्नाच्या शोकाला पारावार राहिला नाही. परंतु आपल्या धन्याच्या आज्ञेपुढे त्याचे काही चालण्यासारखे नव्हतें. तो तसाच मोठ्या दु:खित अंत:करणाने कपिलवस्तूला गेला.