भाग तिसरा
बुद्धाचा उपदेश आणि परिनिर्वाण
[१]
गृहस्थाचीं कर्तव्यें
कोणे एके समयीं बुद्धगुरू राजगृहांतील वेणुवनामध्यें रहात होता. त्या कालीं सिगाल (शृगाल) नांवाचा एक तरुण कुलपुत्र शहरांतून सकाळींच बाहेर येऊन स्नान करून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, खालची आणि वरची या सहा दिशांनां नमस्कार करीत होता.
बुद्ध राजगृहामध्यें पिंडपातासाठीं (भिक्षेसाठीं) जात असतां त्याला पाहून म्हणाला “हे ग्रहपतिपुत्र, तूं हें काय चालविलें आहेस?”
सिगाल म्हणाला “भदन्त, बापानें मरतेवेळीं सहाहि दिशांची पूजा करीत जा. असें मला सांगितल्यावरून मी या दिशांनां नमस्कार करीत आहें.”
बुद्ध म्हणाला “परंतु हा तुझा नमस्कारविधि आर्यांच्या पद्धतीला अनुसरून नाहीं.”
तेव्हां सिगालानें आर्यांच्या रीतीप्रमाणें सहा दिशांचा नमस्कारविधि कोणता, हें सांगण्याविषयीं बुद्धाला विनंति केली.
बुद्ध म्हणाला “ज्या आर्यश्रावकाला सहा दिशांची पूजा कर्तव्य असेल, त्यानें चार कर्मक्लेशांपासून मुक्त झालें पाहिजे, चार कारणांमुळे पापकर्म करितां कामा नये, आणि संपत्तिनाशाच्या सहा द्वारांचा त्यानें अंगीकार करतां कामा नये. या चवदा गोष्टी जर त्यानें संभाळल्या, तर सहा दिशांची पूजा करावयाला तो योग्य होईल. प्राणघात, चोरी, व्याभिचार, आणि असत्य भाषण हे चार कर्मक्लेश समजावे. यांपासून आर्यश्रावकानें दूर राहिलें पाहिजे. छंदामुळें, द्वेषामुळें, भयामुळें आणि मोहामुळें अज्ञजन पाप करितात; परंतु आर्यश्रावकानें यांपैकीं कोणत्याहि कारणानें पापाला प्रवृत्त होतां कामा नये. जो या कारणामुळें पापाला प्रवृत्त होतो, त्याची कृष्णपक्षांतील चंद्राप्रमाणें कीर्ति क्षीण होत जाते. पण यांपैकीं कोणत्याहि कारणानें जो पापाला वश होत नाहीं, त्याची कीर्ति शुल्कपक्षांतील चंद्राप्रमाणें वृद्धिंगत होत जाते.”
“हे गृहपतिपुत्र! मद्यपान, रात्रींचें बाहेर हिंडणें, नाटकांतमाशांचे व्यसन, जुगार, दुष्टांची संगति आणि आळस ही सहा संपत्तिनाशाची द्वारें होत.”
“दारुच्या योगें संपत्तीचा क्षय होतो हें सांगावयाला नकोच. याशिवाय दारूमुळें कलह आणि रोग वाढत असतात. दारू दुष्कीर्तीची जननीच आहे. ती लज्जेला ठार मारिते आणि बुद्धीला दुर्बळ करिते. हे गृहपतिपुत्र, ज्याला रात्रींचे बाहेर हिंडण्याचे व्यसन लागतें, त्याचा स्वत:चा देह सुरक्षित रहात नाही; त्याची बायको व मुलें हीं देखील सुरक्षित रहात नाही; त्याची संपत्ति त्याला संभाळतां येत नाही; आपणाला कोणी ओळखील या भयानें तो ग्रस्त होतो; खोटें बोलण्याची त्याला सवय लागतें, आणि अनेक पीडा त्याच्यामागें लागत असतात. ज्याला नाटकांचे आणि तमाशांचें व्यसन लागतें, तो कोठें नाच, कोठें गायन, कोठें तमाशा यांच्याच शोधांत असतो. (आपल्या कामाचें त्याला स्मरण रहात नाहीं.) जुगारी मनुष्याचा जुगारांत जर जय झाला, तर त्यामुळें त्याचा इतर जुगारी लोक मत्सर करितात; पराजय झाला, तर तो शोकाभिभूत होतो. त्याच्या संपत्तीचा नाश होतो, हे निराळें सांगावयाला नकोच. त्याचे आप्तमित्र त्यांच्या वचनावर विश्वास ठेवीत नाहींत; त्यांच्याकडून त्याचा वारंवार अपमान होतो; व त्याच्याशीं कोणी नवीन नातें जोडूं इच्छीत नाहीं. कांकी, हा मनुष्य कुटुंबाची काळजी घेण्यास समर्थ नाहीं, असें त्याला वाटत असतें. एकाद्या मनुष्याला दुष्ट संगति लागली म्हणजे घूर्त, दारुबाज, लबाड, चोर वगैरे सर्व प्रकारच्या हलकट लोकांचा त्याला सहवास घडतो व त्यामुळें दिवसेंदिवस तो निकृष्ट स्थितीला जातो. आळशी मनुष्य आज फार थंडी म्हणून आपलें काम करीत नाही; आज अतिशय उष्मा म्हणून काम करीत नाही; आज फार सांज झाली म्हणून काम करीत नाही; तर आज फारच सकाळ म्हणून काम करीत नाही? अशा रीतीनें आजचें काम उद्यांवर टाकिल्यामुळें त्याला नवीन संपत्ति मिळविता येत नाही; आणि त्याच्या पूर्वार्जित संपत्तीचा मात्र नाश होत असतो.
“चार कर्मक्लेशांचा, चार पापांच्या कारणांचा आणि विपत्तीच्या सहा द्वारांचा त्याग केल्यावर गृहस्थानें सहा दिशांच्या पूजेला आरंभ करावा; पण त्या सहा दिशा कोणत्या? आईबाप पूर्वदिशा समजावी; गुरू दक्षिणदिशा समजावी; बायकोमुलें पश्चिमदिशा, सखसोयरे उत्तरदिशा, दास आणि मजूर खालची दिशा व श्रमण आणि ब्राह्मण वरची दिशा समजावी.