बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 2

“हे गृहपतिपुत्र, पूर्वदिशा जे आईबाप, त्यांच्या पूजेचीं ही पांच अंगे आहेत:- (१) त्यांचें काम करणें; (२) त्यांचें पोषण करणें; (३) कुलांत चालत आलेलें सत्कार्य चालू ठेवणें; (४) त्यांच्या संपत्तीचे वांटेकरी होणें; आणि (५) जर कोणी त्यांपैकी जीवंत नसेल, तर त्यांच्या नांवें दानधर्म करणें. या पांच अगांनी जर आईबापांची पूजा केली, तर ते पांच प्रकारांनी आपल्या मुलावर अनुग्रह करितात:- (१) पापापासून त्यांचे निवारण करितात; (२) त्याला कल्याणकारक मार्गाला लावितात; (३) त्याला कलाकौशल्य शिकवितात; (४) योग्य स्त्रीशी त्याचें लग्न करून देतात; व (५) योग्य वेळीं आपली मिळकत त्याच्या स्वाधीन करितात.

“दक्षिणदिशा जे गुरू त्यांच्या पूजेचीं हीं पांच अंगे होत:- (१) गुरू जवळ आले, तर उठून उभें रहाणें; (२) ते आजारी असले तर त्यांची सेवा करणे; (३) ते शिकवतील, तें श्रद्धापूर्वक समजून घेणें (४) त्यांचे कांही काम पडल्यास तें करणे; आणि (५) ते जी विद्या शिकवितील तिचें उत्तम रीतीनें ग्रहण करणें. या पांच अंगांनी गुरूची पूजा केली असतां ते शिष्यावर पांच प्रकारांनी अनुग्रह करितात:- (१) चांगला आचार शिकवितात; (२) उत्तम रीतीनें विद्या शिकवितात; (३) आपणाला येत असलेली सर्व विद्या ते शिष्याला शिकवितात; (४) आपल्या आप्तमित्रांमध्यें त्याचे गुण वर्णन करितात; आणि (५) कोठें गेला, तरी आपल्या शिष्याला पोटापाण्याची अडचण पडूं नये अशी व्यवस्था करितात.

“हे गृहपतिपुत्र, पश्चिमदिशा जी पत्नी तिच्या पूजेची हीं पांच अंगें होत:- (१) तिला मान देणें; (२) तिचा अपमान होऊं न देणें; (३) एक पत्नीव्रत आचरणें; (४) घरचा कारभार तिच्यावर सोपविणें; आणि (५) वस्त्रालंकारांची तिला उणीव पडूं न देणें, या पांच अंगांनी जर पतींने पत्नीची पूजा केली, तर ती आपल्या पतीवर पांच प्रकारांनी अनुग्रह करितें:- (१) घरांत चांगली व्यवस्था ठेवितें; (२) नोकरचाकरांनां प्रेमानें संभाळते; (३) पतिव्रता होते; (४) पतीनें मिळविलेल्या संपत्तीचे रक्षण करितें, उधळेपणा करीत नाही; आणि (५) सगळ्या गृहकृत्यांत दक्ष होते.

“हे गृहपतिपुत्र, उत्तरदिशा जे सखेसोयरे त्यांच्या पूजेची ही पांच अंगे होत:- (१) त्यांनां देण्याजोग्या वस्तु देणे; (२) त्यांच्याशी प्रिय भाषण करणें; (३) त्यांच्या उपयोगीं पडणें; (४) त्यांनां समान भावानें वागविलें; आणि (५) त्यांच्याशी निष्कपट वर्तन ठेवणें. या पांच अंगांनी जर गृहस्थानें सख्यासोयर्‍यांची पूजा केली, तर ते त्या गृहस्थावर पांच प्रकारांनी अनुग्रह करितात:- (१) बेसावध असतां एकाएकीं काही संकट आलें, तर त्या वेळीं ते याचें रक्षण करितात; (२) अशा प्रसंगी याच्या संपत्तीचेंहि ते रक्षण करितात; (३) संकटामुळे घाबरून गेला असतां, ते धीर देतात; (४) विपत्कालीं सोडून जात नाहींत; आणि (५) त्याच्यामागें त्याच्या संततीवरहि उपकार करितात.

“हे गृहपतिपुत्र, खालची दिशा जे सेवक, त्यांच्या पूजेचीं हीं पांच अंगे होत:- (१) त्यांचें सामर्थ्य पाहून त्यांनां काम सांगणें; (२) त्यांनां योग्य वेतन देणें; (३) आजारी पडले, तर त्यांची शुश्रुषा करणें; (४) वारंवार त्यांनां उत्तम भोजन देणें; आणि (५) वेळोवेळी उत्तम कामगिरीबद्दल त्यांनां बक्षीस देणें. या पाच अंगांनी धन्यानें नोकरांची पूजा केली असतां ते आपल्या धन्यावर पांच प्रकारांनी अनुग्रह करितात. (१) धनी उठण्यापूर्वी ते उठतात; (२) धनी निजल्यावर निजतात; (३) धन्याच्या मालाची चोरी करीत नाहीत; (४) उत्तम त-हेनें काम करितात; आणि (५) धन्याचें यश गातात.”

“हे गृहपतिपुत्र, वरची दिशा जे श्रमणब्राह्मण (साधुसंत) त्यांच्या पूजेची हीं पांच अंगे होत:- (१) कायेनें त्यांचा आदर करणें; (२) वाचेनें त्यांचा आदर करणें; (३) मनानें त्यांचा आदर करणें; (४) भिक्षेला आले असतां, त्यांनां आडकाठी न करणें; आणि (५) त्यांच्या उपयोगी वस्तु त्यांना देणें. या पांच अंगांनी गृहस्थानें जर साधुसंतांची पूजा केली, तर ते त्यावर सहा प्रकारांनीं अनुग्रह करितात:- (१) पापापासून त्याचें निवारण करितात; (२) त्याला कल्याणकारक मार्गाला लावितात; (३) प्रेमपुरस्सर त्यावर अनुकंपा करितात; (४) त्याला उत्तम धर्म शिकवितात; (५) शंकानिवारण करून त्याच्या मनाचें समाधान करितात; आणि (६) त्याला स्वर्गाचा मार्ग दाखवितात.

“हे गृहपतिपुत्र, दान, प्रियवचन, अर्थचर्या म्हणजे उपयोगी पडणें आणि समानात्मता म्हणजे दुसर्‍याला आपणासारखें वागविणें हीं चार लोकसंग्रहाची साधनें आहेत. आईबापांनी जर या साधनांचा उपयोग केला नसता, तर केवळ जन्म दिला म्हणून मुलांनी त्यांचा गौरव केला नसता. सुज्ञ मनुष्य या चार साधनांचा यथायोग्य उपयोग करून जगामध्यें योग्यतेला चढतात.”

हा बुद्धाचा उपदेश ऐकून सिगाल म्हणाला “भगवन्! हा आपला उपदेश कितीतरी सुंदर आहे. एकाद्या मनुष्यानें झांकलेली वस्तु उघड करून दाखवावी, किंवा डोळसाला अंधारांत दिसावें या हेतूनें मशाल धरावी, अथवा वाट चुकलेल्या मनुष्याला सरळ मार्गाला लावावें, त्याप्रमाणे भगवंतानें आपल्या धर्माचें उत्तम स्पष्टीकरण केलें. मी भगवंताला, धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जातों. यावज्जीव मी आपला उपासक आहे, या नात्यानें माझा अंगीकार करा.”