बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 6

“गृहस्थहो, ‘आपल्या स्त्रीशीं परक्यानें व्याभिचार केला असतां आपणाला खपत नाही; तेव्हां आपण परदारागमन केलें, तर तें दुसर्‍याला कसे खपेल?’” असा विचार करून आर्यश्रावक परदारागमनापासून विरत होतो; व्याभिचारकर्म न करण्याविषयीं तो इतरांनां उपदेश करितो, व अव्याभिचारी आचरणाची स्तुति करितो.

“गृहस्थहो, परक्यानें खोटी साक्ष देऊन आपलें केलेलें नुकसान आपणाला आवडत नाहीं; तेव्हां असत्य भाषणानें मी दुसर्‍याची हानि केली असतां त्याला ती कशी आवडेल? असा विचार करून आर्यश्रावक असत्य भाषणापासून परावृत्त होतो, दुसर्‍यालाहि खरें बोलण्याविषयीं उपदेश करितो, आणि प्रामाणिकपणाची प्रशंसा करितो.”

“गृहस्थहो, परक्यानें चहाडी करून आपणामध्ये आणि आपल्या मित्रांमध्ये वितुष्ट पाडिलें असतां तें आपणास खपत नाहीं. तेव्हां मी जर चहाडीच्या योगें इतर लोकांमध्ये फूट पाडूं लागलों, तर तें त्यांनां कसें आवडेल? असा विचार करून आर्यश्रावक चहाडी करीत नाहीं, चहाडी न करण्याविषयी तो इतरांनां उपदेश कारितो, व तडजोड करणार्‍या माणसांची स्तुति करितो.”

“गृहस्थहो, परक्याने शिवीगाळ केली असतां ती आपणाला आवडत नाही; त्याचप्रमाणे आपण केलेली शिवीगाळ दुसर्‍याला आवडणार नाही.” असा विचार करून आर्यश्रावक वाईट शब्द बोलण्याचें सोडून देतो, सभ्य भाषण करण्याविषयीं इतरांनां उपदेश कारितो, आणि संभावित भाषणाची स्तुति करितो.

“गृहस्थहो, ‘परका मनुष्य आपणापाशीं येऊन वृथा बडबड करूं लागला, तर त्याचा आपणाला कंटाळा येतो; तेव्हां आपण निरुपयोगी संभाषण करून दुसर्‍याचा वेळ घेतला असतां तें त्याला कसें आवडेल? असा विचार करून आर्यश्रावक वृथा भाषणापासून विरत होतो, निरुपयोगी भाषण न करण्याविषयीं लोकांना उपदेश करितो, व मितभाषणाची स्तुति करितो.’”

“गृहस्थहो, अशा आर्यश्रावकाची बुद्धावर, धर्मावर आणि संघावर श्रद्धा जडते. त्याचें शील अत्यंत परिशुद्ध होतें. कांकी, प्राणघात, चोरी, व्याभिचार, असत्य भाषण, चहाडी, वाईट शब्द आणि वृथा भाषण या सात पापकर्मांपासून मुक्त होऊन तो सदाचरणानें वागतो.”