बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 17

[१७]
त्रैविद्य ब्राह्मण आणि ब्रह्मसायुज्यता

एकदां बु्द्धगुरू कोसल देशांत संचार करीत असतां मनसाकट नांवाच्या ब्राह्मणग्रामाला पोहोंचला. तेथें मनसाकटाच्या उत्तरेला अचिरवती नदीच्या तीरीं एका आंबराईंत तो रहात होता.

त्या वेळीं मनसाकट गांवांत कांहीं निमित्तानें प्रसिद्ध ब्राह्मण रहात असत. त्यांपैकीं वासिष्ठ आणि भारद्वाज हे दोघे तरुण ब्राह्मण संध्याकाळीं फिरावयाला निघाले असतां मार्गामार्गासंबंधानें वाद करूं लागले. वासिष्ठाचें म्हणणें असें होतें, कीं, आपल्या गुरूनें-पौष्करसादि ब्राह्मणानें-उपदेशिलेला मार्गच काय तो ब्रह्मसायुज्यता मिळविण्याचा सरळ मार्ग आहे.' पण भारद्वाजाचें म्हणणें असें होतें, कीं, 'आपल्या गुरूनें-तारुक्ष्य ब्राह्मणानें-उपदेशिलेला मार्गच ब्रह्मसायुज्यतेचा खरा मार्ग आहे.' ते दोघे परस्परांचें समाधान करूं शकले नाहींत. तेव्हां ते बुद्धाजवळ आले आणि त्यांनीं बुद्धाला आपला मतभेद कळविला.

तेव्हां बुद्ध म्हणाला "वासिष्ठ, पण तुमचा मतभेद कां असावा, हें मला समजत नाहीं. तुमच्या आचार्यांचे मार्ग इतके भिन्न कां असावे?"

वासिष्ठ म्हणाला "सरळ मार्ग कोणता आणि दूरचा मार्ग कोणता, एवढ्याचसंबंधानें आमचा वाद आहे. आध्वर्य ब्राह्मण, तैत्तिरिय ब्राह्मण, छांदोग्य ब्राह्मण, आणि ब्राह्मचर्य ब्राह्मण, हे सर्व भिन्नभिन्न मार्ग उपदेशीत असतात. तथापि जशा एकाद्या गांवाला जाण्याच्या लांबच्या किंवा जवळच्या वाटा त्या गांवाला जातात, त्याचप्रमाणें निरनिराळ्या ब्राह्मणांनीं उपदेशिलेले दूरचे किंवा जवळचे मार्ग शेवटीं ब्रह्मसायुज्यतेलाच जाऊन मिळतात."

बुद्ध म्हणाला "वासिष्ठ, तूं हे सर्व मार्ग ब्रह्मसायुज्यतेलाच जाऊन मिळतात असें म्हणतोस. परंतु या सर्व ब्राह्मणांपैकीं ब्रह्मदेवाला ज्यानें साक्षात् पाहिलें असा एकादा तरी ब्राह्मण आहे काय?"

"नाहीं, भो गौतम." वासिष्ठानें उत्तर दिलें.

बुद्ध म्हणाला "ब्राह्मणाच्या सात आचार्यपरंपरांपर्यंत एकाद्या तरी आचार्यानें ब्रह्मदेवाला साक्षात् पाहिलें आहे काय?"

"नाहीं, भो गौतम."

बुद्ध म्हणाला "वामदेव, विश्वामित्र, वसिष्ठ, अंगीरस, भृगु, इत्यादि जे वेदमंत्रकर्ते, वेदमंत्रांचे प्रवर्तक, त्या ऋषींनीं देखील ब्रह्मदेवाला साक्षात् पाहिलें होतें काय?"

"नाहीं, भो गौतम."

"वासिष्ठ, याप्रमाणें ब्राह्मणांनीं, ब्राह्मणांच्या आचार्यांनीं आणि ब्राह्मणांनां पूज्य असलेल्या ऋषींनीं देखील ब्रह्मदेवाला साक्षात् पाहिलें नाहीं. असें असतां आजकालचे ब्राह्मण त्या ब्रह्मदेवाशीं सायुज्यता मिळविण्याचा रस्ता सांगत आहेत, हें विलक्षण नव्हे काय?"

"होय- हें विलक्षण दिसतें खरें." वासिष्ठ म्हणाला.

"तर मग वासिष्ठ, ब्राह्मणांच्या या मार्गोपदेशाला अंधपरंपरा म्हटलें पाहिजे. हे वासिष्ठ, हे जे चंद्रसूर्य आकाशामध्यें प्रकाशत आहेत, व ब्राह्मण रोज ज्यांचीं स्तोत्रें गातात आणि पूजा करितात, त्या चंद्रसूर्यांप्रत जाण्याचा मार्ग कोणता, हें ब्राह्मण सांगूं शकतील काय?"

"नाहीं, भो गौतम."

"हे वासिष्ठ, ज्यांनां ब्राह्मण पहातात आणि ज्यांची पूजा करितात, त्या चंद्रसूर्यांप्रत जाण्याचा मार्गदेखील ब्राह्मणांनां दाखवितां येत नाही. तर मग ज्याला त्यांनीं पाहिलें नाहीं, ज्याला त्यांच्या अचार्यांनी किंवा ऋषींनीं पाहिलें नाहीं, त्या ब्रम्ह्याच्या सायुज्यतेचा मार्ग ब्राह्मण उपदेशीत आहेत, हें विलक्षण नव्हे काय?"