बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 28

(२४)
विषयांची गोडी, विषयांपासून दु:ख आणि त्यांपासून मुक्तता


एके समयीं बुद्धगुरू श्रावस्तीमध्यें रहात असतां भिक्षूंना म्हणाला "भिक्षुहो, विषयांची गोडी कोणती? डोळ्याला आवडणारी रूपें, कानाला आवडणारे शब्द, नाकाला आवडणारे सुगंध, जिव्हेला आवडणारे रस, आणि त्वचेला आवडणारे मृदुस्पर्श, या पंचेंद्रियांच्या विषयांपासून मनुष्याला जें सुख होतें, त्यालाच मी विषयांची गो असें म्हणतों.

"पण भिक्षुहो, या विषयामध्यें दोष कोणता? एकादा तरुण होतकरू कारकुनी करून, व्यापारधंदा करून, शेतकी करून, किंवा सरकारी नोकरी करून, आपला निर्वाह करितो. आपल्या धंद्यामुळें त्याला अनंत ताप होतो, तथापि विषयोपभोगाच्या वस्तु मिळविण्यासाठीं तो रात्रंदिवस खटपट करीत असतो. एवढी मेहनत करून जर तो या वस्तूंचा त्याला लाभ झाला नाही, तर तो शोकाकुल होऊन आपला प्रयत्न व्यर्थ गेला, या विवंचनेनें विचारमूढ होतो. बरें, यदाकदाचित् त्याच्या उद्योगांत त्याला यश आलें, आणि इच्छिलेल्या वस्तु त्याला मिळाल्या, त्याचें दुष्ट राजांनी आणि चोरांनी हरण करूं नये, अग्नि आणि उदक यांपासून त्यांचा नाश होऊं नये, आणि अप्रिय दायादांपासून त्यांनां अपाय होऊं नये, म्हणून तो रात्रंदिवस त्या वस्तूंचा संभाळ करण्यांत गढून जातो, व त्यामुळें त्याच्या मनाला फार त्रास होतो. पण एवढा बंदोबस्त केला असतां देखील राजेलोक किंवा दरोडेखोर त्यांची संपत्ति लुटतात; आगीनें किंवा उदकानें त्या संपत्तीचा नाश होतों, अथवा अप्रिय दायाद तिचें हरण करितात. अशा प्रसंगी त्या गृहस्थाला अत्यंत दु:ख होतें.

"आणखी भिक्षुहो, या विषयासाठींच राजेलोक राजांबरोबर भांडतात, क्षत्रिय क्षत्रियांबरोबर भांडतात, ब्राह्मण ब्राह्मणांबरोबर भांडतात, वैश्य वैश्यांबरोबर भांडतात, आई मुलाबरोबर भांडते, मुलगा आईबरोबर भांडतो, बाप मुलाशी भांडतो, बहीण भावाबरोबर भांडते, भाऊ बहिणीबरोबर भांडतो, आणि मित्र मित्रांबरोबर भांडतात! त्यांच्या या कलहाचा परिणाम कधींकधीं असा होतो, कीं, ते हातांनीं, दगडांनीं, दांड्यांनीं, किंवा शस्त्रांनीं एकमेकांवर प्रहार करितात, व त्यामुळें मरण पावतात, अथवा मरणांतिक दु:ख भोगतात.

"आणखी भिक्षुहो, या विषयांच्या प्राप्तीसाठींच लोक लढाईला सज्ज होतात, व भयंकर संग्रामांत प्रवेश करितात. तेथें शस्त्रास्त्रांनी त्यांनां मरण येतें, किंवा जखमा वगैरे होऊन ते मरणांतिक दु:ख भोगतात. दुसरे कांही लोक विषयोपभोगासाठी चोर्‍या करितात, दरोडे घालतात, पांथस्थ लोकांना लुटतात, किंवा परस्त्रीगमन करितात. त्यांना पकडून राजेलोक नानाप्रकारें दंड करीत असतात. राजपुरुष त्यांना फटके मारितात; त्यांचे हातपाय तोडितात; त्यांचे नाककान कापितात; किंवा त्यांचा शिरच्छेद करितात. अशा रीतीनें विषयलोभामुळें ते मरण पावतात, किंवा मरणांतिक वेदना भोगीत असतात.

"आणखी भिक्षुहो, याच विषयभोगासाठीं मनुष्यप्राणी कायेनें, वाचेनें, आणि मनानें इहलोकी दुष्कर्माचरण करून मरणोत्तर दुर्गतीला जातात.

"भिक्षुहो, विषयांची आसक्ति सोडून देण्यामुळेंच मनुष्याची त्यांपासून मुक्तता होते. (केवळ बाह्यात्कारी विषयाचा त्याग केला, तर त्यांपासून मनुष्य मुक्त होतो असें नाही.)

"भिक्षुहो, याप्रमाणें जे श्रमणब्राह्मण विषयाची गोडी, विषयांतील दोष आणि विषयांपासून मुक्तता तथार्थतया जाणतात, ते स्वत: विषयाचा त्याग करितील, व दुसर्‍याला तसें करण्याविषयी उपदेश करतील, हें संभवनीय आहे.

"भिक्षुहो, सौंदर्यार्ची गोडी कोणती? एकादी अत्यंत सुस्वरूप तरुण ब्राह्मणकन्या, क्षत्रियकन्या अथवा वैश्यकन्या पाहून जें सुख उत्पन्न होतें, तीच सौंदर्याची गोडी होय.

"पण या सौंदर्यात दोष कोणता? भिक्षुहो, तीच तरुणी जेव्हां वृद्ध होते, तिची पाठ वांकते, हातांत काठी घेतल्याशिवाय तिला चालतां येत नाहीं, तिचे सर्व अवयव लटपट कांपत असतात, दांत निघून जातात, केस पांढरे होतात, मान हलत असते, तोंडाला सुरकुत्या पडलेल्या असतात, तेव्हां तें तिचें पूर्वीचे सौंदर्य नष्ट होऊन विकृत होतें कीं नाही?''

"होतें भदंत,'' भिक्षु ह्मणाले.

"हाच त्या सौंदर्याचा दोष आहे, असें मी ह्मणतों. भिक्षुहो, त्याच सुंदर स्त्रीचें प्रेत स्मशानात पडलेलें कावळ्यांनी किंवा कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेलें अथवा अन्य रीतीनें विकृत झालेलें जर तुमच्या पहाण्यांत आलें, तर तें पूर्वीचे सौंदर्य नष्ट होऊन त्याच्या जागीं विकार उत्पन्न झाला, असें तुम्हाला वाटणार नाही काय?''

"होय भदंत,'' भिक्षूंनी उत्तर दिले.

"भिक्षुहो, सौंदर्याविषयी आसक्ति सोडून देणें हाच सौंदर्यापासून उत्पन्न होणार्‍या भयांतून मुक्त होण्याचा खरा मार्ग होय. सौंदर्याची गोडी कोणती, त्यांत दोष कोणता, व त्यापासून मुक्तता कशी होते, हें ज्या श्रमणब्राह्मणांला यथार्थतया समजलें, ते स्वत: सौंदर्यापासून मुक्त होतील, व त्यापासून मुक्त होण्याचा मार्ग इतरांनां शिकवतील, हें संभवनीय आहे.''