बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 36

(३२)
शेतकरी कोणत्या शेतांत प्रथम बीं पेरील?


एके वेळीं बुद्धगुरु नालंदा नांवाच्या गांवी रहात होता. तेथें असिबंधक ग्रामणीचा पुत्र त्याजपाशीं येऊन त्याला नमस्कार करून एका बाजूला बसल्यावर त्याला म्हणाला, "भगवनं, आपण प्राणिमात्रावर दया करितां, हें खरें नव्हे काय?''

"होय ग्रामणी, तथागत सर्व प्राण्यांवर दया करितो.''

"तर मग भगवन्, कित्येकांना आपण आस्थापूर्वक धर्मोपदेशक करितां व कित्येकांबद्दल इतकी काळजी घेत नाही, हें कसे?''

बुद्ध म्हणाला "हे ग्रामणी, एकाद्या शेतकर्‍याचीं उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशीं तीन प्रकारचीं शेतें असलीं, तर तो कोणत्या शेतांत प्रथम बीं पेरील?''

बुद्ध म्हणाला "भिक्षु आणि भिक्षुणी उत्तम शेतांप्रमाणें आहेत. सर्वस्वाचा त्याग करून तीं मला शरण आलीं आहेत. तेव्हां त्यांनां मीं प्रथमत: धर्मोपदेश करावा, हें योग्य नव्हे काय? उपासक आणि उपासिका या मध्यम शेताप्रमाणें आहेत. त्यांनां मीं तदनंतर उपदेश करीत असतों. पण इतर पंथांचे परिव्राजक वगैरे लोक हे कनिष्ठ शेतासारखे आहेत. त्यांनांदेखील मी उपदेश करितों. कांकी, एकाद्या दुसर्‍या वाक्याचा ते अर्थ समजले, तर तेवढ्यानें देखील त्यांचे कल्याण होईल!''

(३३)
सिंह सेनापति


एके समयीं बुद्धगुरु वैशालीमध्ये महावनांत रहात होता. त्या वेळी कांही प्रख्यात लिच्छवी राजे संथागारांत (नगर मंदिरांत) कांही कारणाकरितां जमले असतां बुद्धासंबंधाने गोष्टी निघाल्या. त्यांतील बहुतेकांनीं बुद्धाची फार स्तुति केली. ती ऐकून सिंहसेनापतीला बुद्धदर्शनाची इच्छा झाली. पण तो निर्ग्रंथाचा उपासक असल्यामुळें निर्ग्रंथाच्या मुख्य गुरूला-नाथपुत्राला- भेटल्यावांचून एकाएकीं बुद्धाची भेट घेणें त्याला प्रशस्त वाटेना. तो नाथपुत्राजवळ जाऊन त्याला म्हणाला "भदंत, मी बुद्धाची भेट घेऊं इच्छीत आहें.''

नाथपुत्र म्हणाला "सिंहा! तूं अक्रियावादी आहेस काय? गौतम हा पक्का अक्रियावादी आहे, आणि तूं क्रियावादी असतां त्याची भेट घेऊं इच्छितोस हें योग्य नाहीं.''

हें आपल्या गुरूचें भाषण ऐकून सिंहानें बुद्धदर्शनाला जाण्याचा विचार रहित केला. पुन: एकदोनदां संथागारांत त्यानें बुद्धाची स्तुति ऐकिली; परंतु नात्रपुत्राच्या आग्रहामुळें बुद्धदर्शनाला जाण्याचा आपला बेत त्याला पुन: तहकूब करावा लागला. शेवटी सिंहानें नाथपुत्राला विचारल्यावांचूनच बुद्धाची भेट घ्यावयाचा निश्चय केला, व मोठ्या लवाजम्यानिशीं महावनांत येऊन बुद्धाला नमस्कार करून तो एका बाजूला आसनावर बसला. नंतर सिंह बुद्धाला म्हणाला "भदंत, पुष्कळ लोक आपणाला अक्रियावादी म्हणत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणें आपण खरोखरच अक्रियावादी आहांत काय?''

बुद्ध म्हणाला "सिंहा, एका अंशीं मला अक्रियावादी म्हणतां येण्याजोगें आहे. पापविचारांची क्रिया करूं नये, पापविचारांचा नाश करावा, पापविचार मनामध्यें देखील येऊं देऊं नयेत, असा मी उपदेश करीत असतों. या दृष्टीने पाहिलें असतां मी अक्रियावादी आहें.

"पण दुसरा एकादा जर मला क्रियावादी ह्मणूं लागला, तर त्याचें ह्मणणें देखील खोटें म्हणतां यावयाचे नाहीं. कांकी, पुण्यप्रद विचारांची क्रिया करावी, कुशल मनोवृत्तींची अभिवृद्धी करावीं, सदिच्छेला अनुसरून वर्तन करावें, असा मी उपदेश करीत असतों. या दृष्टीने पाहिलें असतां मी क्रियावादी आहें.

"सिंहा, दुसरा एकादा मनुष्य मला उच्छेदवादी म्हणूं शकेल. कांकी, अकुशल मनोवृत्तींचा उच्छेद करण्यासाठी मी उपदेश करीत असतों. या दृष्टीने पाहिलें असतां मी उच्छेदवादी आहें.''

सिंह म्हणाला, "भगवन्, आपल्यासंबंधानें माझा अत्यंत गैरसमज झाला होता; पण हा आपला गोड उपदेश ऐकून तो दूर झाला. आजपासून मीं आपणाला, आपल्या धर्माला आणि संघाला शरण जातों. उपासक या नात्यानें आपण माझा अंगीकार करा.''