बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 40

(३५)
राजा अजातशत्रु आणि श्रामण्याच्या फलाविषयीं प्रश्न


पौर्णिमेच्या उपोसथाच्या दिवशीं रात्रिसमयीं राजा अजातशत्रु आपल्या अमात्यांसह राजवाड्याच्या गच्चीवर बसला होता. त्या वेळीं चंद्रप्रकाशानें सर्व प्रदेशाला अत्यंत रमणीयता आली होती. राजा आपल्या अमात्यांकडे पाहून उद्गारला "आजची रात्र कितीतरी रमणीय आहे! किती तरी सुंदर आहे! या वेळीं एकाद्या प्रसिद्ध श्रमणाची किंवा ब्राह्मणाची भेट घेतली असतां आमचें मन प्रसन्न होईल. असा श्रमण किंवा ब्राह्मण या राजगृहामध्यें सध्या कोण आहे?''

त्या अमात्यांतील एकजण म्हणाला "महाराज, पूरण काश्यप हा सध्या येथें रहात आहे. पुष्कळ लोकांचा तो गुरू आहे, हें आपण जाणतच आहां.''

दुसरा अमात्य म्हणाला "मक्खलि गोसाल हा फार प्रिसद्ध धर्मप्रवर्तक सध्या येथें आहे. त्याच्या दर्शनाला महाराज गेले असतां तो महाराजांच्या चित्ताचें समाधान करील, असें मला वाटतें!''

तिसर्‍या अमात्यानें अजित केसकंबलाच्या दर्शनाला जाण्याविषयीं अजातशत्रूला विनंति केली. चौथ्यानें पकुध कात्यायनाची स्तुति करून राजानें त्याच्या दर्शनाला जावें, अशी सूचना पुढें आणिली. पांचव्याने संजय बेलठ्ठपुत्राची थोरवी गाऊन त्याच्या भेटीला जाण्याविषयीं राजाचें मन वळविण्याचा प्रयत्न केला. सहाव्यानें निर्ग्रंथ नाथपुत्राच्या दर्शनाला जाण्याविषयीं राजाला विनंति केली. परंतु अजातशत्रु यांपैकीं एकाला देखील कांहीच उत्तर न देतां उगाच राहिला.

जीवक कौमारभृत्य नांवाचा प्रसिद्ध वैद्य मगधराजाच्या दरबारीं होता. तो या वेळीं अजातशत्रूच्याजवळ बसला होता. अजातशत्रु त्याला म्हणाला "सौम्य जीवक, यासंबंधानें तूं कांहीच बोलत नाहींस, हें काय?''

जीवक म्हणाला "महाराज, सध्यां बुद्ध भगवान् माझ्या आम्रवनांत रहात आहे. जर आपली मर्जी असेल तर आपण त्या भगवंताच्या दर्शनाला जाऊं.''

अजातशत्रु म्हणाला "तर मग हत्ती सज्ज करावयास सांग.''

राजाच्या हुकुमाप्रमाणें जीवकानें पुष्कळ हत्ती आणि हत्तिणी सज्ज करून सगळी तयारी असल्याची राजाला वर्दी दिली. राजा प्रत्येक हत्तिणीवर आपल्या अंत:पुरांतील एकेका स्त्रीला बसवून आपण एका उत्तम गजावर आरूढ होऊन आपल्या जीवकादि अमात्यांसहवर्तमान मोठ्या थाटानें बुद्धदर्शनाला निघाला.

आम्रवनाच्या जवळ आल्यावर अजातशत्रु घाबरून गेला, आणि जीवकाला ह्मणाला "मौम्य जीवक! मला तूं फसवीत तर नाहींसना? माझ्या शत्रूच्या हाती देण्यासाठी मला येथें आणिलें नाहींसना? साडेबाराशें भिक्षूंचा संघ येथें रहात असतां एकाचा देखील बोलण्याचालण्याचा शब्द ऐकूं येत नाही, हें मोठें आश्चर्य नव्हे काय?''