बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.


बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 45

बुद्ध म्हणाला "तूं ही गोष्ट नि:शंकपणें सांगत आहेस; परंतु तुला प्राचीन बुद्धांसंबंधानें सर्व माहिती आहे काय? आणि जे पुढें होणारे बुद्ध आहेत, त्यांच्या स्वभावासंबंधानें तुला कल्पना करतां येईल काय?''

सारिपुत्त म्हणाला "भगवन्! मला प्राचीन बुद्धांची माहिती नाहीं, किंवा भविष्यत्कालीन बुद्धांच्या स्वभावाची देखील कल्पना करितां येत नाही.''

बुद्ध म्हणाला "बरें, सारिपुत्त, माझ्यातरी स्वभावाची तुला यथार्थतया कल्पना झाली आहे काय?''

"नाहीं भगवन्,'' सारिपुत्तानें उत्तर दिलें.

"तर मग सारिपुत्त, माझ्यावर तुझी अत्यंत श्रद्धा आहे तशी दुसर्‍या कोणाचीहि नाहीं, असें कसें म्हणतां येईल?''

सारिपुत्त म्हणाला "भगवन्, जरी मला प्राचीन बुद्धांची माहिती नाहीं, पुढें होणार्‍या बुद्धांच्या स्वभावाची मला कल्पना करितां येत नाहीं, व आपल्या गंभीर स्वभावाचीहि यथार्थतया मला कल्पना झालेली नाहीं, तथापि आपल्या बुद्धत्वाबद्दल मला शंका राहिली नाहीं. आपण जो धर्मोपदेश केला, तद्वारा आपल्या थोरवीबद्दल माझी खात्री झाली आहे. जो कोणी प्राचीन काळीं बुद्ध झाले असतील, ते चित्ताचीं पांच आवरणें दूर सारून सात बोध्यंगांची भावना केल्यानेंच झाले असावे, पुढें होणारे बुद्ध देखील याच मार्गानें होतील, व आपण देखील अशाच तऱ्हेने बुद्ध झालां आहां, अशी माझी खात्री झाली आहे.''

नालंदा गांवीं कांही दिवस राहिल्यावर बुद्धगुरु पाटलिग्रामला गेला. बुद्ध आपल्या गांवी आला आहे ही बातमी ऐकून पाटलिग्रामवासी उपासक त्याच्या दर्शनाला आले, व त्यांनी आपल्या आवसथागारांत (धर्मशाळेंत) येऊन रहाण्याची बुद्धाला विनंति केली. बुद्धगुरु उपासकांच्या विनंतीला मान देऊन आवसथागारांत गेला, व तेथें पादप्रक्षालन करून मधल्या खांबाला टेंकून पूर्वेला तोंड करून बसला. भिक्षुसंघहि पादप्रक्षालन करून त्या आवसथागारामध्यें येऊन बसले.

तेव्हां बुद्ध त्यांना म्हणाला "गृहस्थहो, शीलभ्रष्ट मनुष्याची पांच प्रकारें हानि होत असते. (१) दुराचरणामुळे त्याच्या संपत्तीचा नाश होतो; (२) त्याची अपकीर्ति  होते; (३) कोणत्याहि सभेमध्यें त्याचें तेज पडत नाहीं; (४) त्याला शांतपणें मरण येत नाहीं; आणि (५) मरणोत्तर तो दुर्गतीप्रत जातो.

"गृहस्थहो, सदाचरणी मनुष्याला त्याच्या सदाचरणापासून पांच फायदे होत असतात. (१) सदाचरणामुळें त्याच्या संपत्तीची अभिवृद्धी होते; (२) लोकांमध्यें त्याची कीर्ति होते; (३) कोणत्याहि सभेमध्यें त्याचें तेज पडतें; (४) त्याला शांतपणें मरण येतें; आणि (५) मरणोत्तर तो सुगतीप्रत जातो.''

त्या वेळीं पाटलि गांवाजवळ पाटलिपुत्र नावाचें शहर बांधण्याचें काम चाललें होतें. अजातशत्रूनें सुनीध आणि वस्सकार या दोन अमात्यांनां पाटलिपुत्र बांधण्याच्याकामावर योजिलें होतें. वज्जींच्या स्वार्‍या मगधदेशावर होऊं नयेत, या उद्देशानें गंगेच्या कांठी हें नवीन शहर बांधण्यांत येत होतें.